स्वागत नव्या पुस्तकांचे

स्वागत नव्या पुस्तकांचे

चांगभलं चांगभलं
प्रकाशक - सनय प्रकाशन, पुणे (९८६०४२९१३४) / पृष्ठं - १३६ / मूल्य - १२० रुपये.

राम लोखंडे यांनी लिहिलेल्या ग्रामीण कथांचा हा संग्रह. यातल्या अनेक कथा ‘सकाळ’च्या ‘पुणे जिल्हा टुडे’ आवृत्तीतल्या ‘गुदगुल्या’ पुरवणीत प्रसिद्ध झाल्या आहेत. अस्सल ग्रामीण वातावरणनिर्मिती, खटकेबाज संवाद, ठसकेबाज पात्रं, नाट्यपूर्ण घडामोडी आणि धक्कातंत्राचा वापर करत साधलेला शेवट असं या कथांचं वैशिष्ट्य आहे. माणसांच्या स्वभावांचे किती तरी पदर लोखंडे उलगडून दाखवतात. प्रसंगनिष्ठ विनोदांवर त्यांनी भर दिला आहे. वाचता-वाचता वाचकाला अंतर्मुख
करणाऱ्या या कथा.

सिनेमाचे दिवस
प्रकाशक - कौशिक प्रकाशन, सातारा (९८२२०१६२९९)/ पृष्ठं - २९६ / मूल्य - ३६० रुपये

साताऱ्यातील चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक अरुण गोडबोले यांनी त्यांच्या चित्रपटांशी संबंधित आठवणी या पुस्तकात लिहिल्या आहेत. साताऱ्यासारख्या चित्रपटनिर्मितीचं फारसं वारंही नसलेल्या शहरात ‘कशासाठी प्रेमासाठी!’ या चित्रपटाद्वारे गोडबोले यांनी या विश्‍वात पदार्पण केलं. त्यानंतरही ‘नशीबवान’, ‘धुमाकूळ’, ‘बंडलबाज’ अशा वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांची त्यांनी साताऱ्यात निर्मिती केली. ‘राम-रहीम’ या चित्रपटाचं दिग्दर्शनही त्यांनी केलं. या सगळ्या काळात आलेले वेगवेगळे अनुभव, मिळालेले धडे, किस्से, भेटलेली माणसं अशा सगळ्या गोष्टींवर गोडबोले यांनी लिहिलं आहे. यानिमित्तानं चित्रपटांचं लेखन, चित्रीकरण, सेन्सॉर सर्टिफिकेट, त्याच्याशी संबंधित आर्थिक गणितं, माणसांचे स्वभाव, सर्जनशीलता अशा किती तरी गोष्टींवर प्रकाश पडतो. गोडबोले यांनी चित्रपटसृष्टी सोडूनही बराच काळ लोटल्यामुळं या क्षेत्राबाबत तटस्थपणानं चिंतनही केलं आहे.

सावल्या
प्रकाशक - उत्कर्ष प्रकाशन, पुणे (०२०- २५५३७९५८) / पृष्ठं - २५२ / मूल्य - २५० रुपये

प्रियांका कर्णिक यांनी लिहिलेली ही कादंबरी. ऊर्वी या तरुणीची मनोवस्था सांगणारी. हॉस्टेलमध्ये एका मैत्रिणीबाबत घडलेल्या घटनेमुळं आधीच संवेदनशील झालेल्या ऊर्वीचं मन घरातल्या एका प्रसंगामुळं आणखी सैरभैर होतं. यानिमित्तानं उलगडत जाणारे धागे-दोरे, ऊर्वीचा नियोजित पती देवेन, तिचे वडील अजय, त्यांची मैत्रीण मेघना, तिचा पती मनोज यांचे मानसिक हिंदोळे मांडत कादंबरीचं सूत्र उलगडतं. मुलींची मानसिकता, स्त्री-पुरुष संबंध, पूर्वग्रह, अयोग्य कल्पना, कलात्म नाती अशा कितीतरी गोष्टींना कर्णिक स्पर्श करतात.

माझा मराठीचा बोलु कौतुके
प्रकाशक - सुविद्या प्रकाशन, पुणे / पृष्ठं - १६६ / मूल्य - १६० रुपये

माधव राजगुरू यांच्या षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त मराठी भाषेविषयी विचार मांडणारं हे पुस्तक तयार करण्यात आलं आहे. मराठी अभिजात आहे का, मराठी भाषा आणि संगणक, महाराष्ट्रातल्या बोलीभाषांचं सर्वेक्षण आणि भवितव्य, मराठी भाषा आणि इंग्रजी माध्यम शिक्षण, बोलीभाषांचं संवर्धन अशा वेगवेगळ्या विषयांवर साहित्यिक आणि विचारवंतांनी लेख लिहिले आहेत. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, हरी नरके, महेश कुलकर्णी, सत्त्वशीला सामंत, विलास खोले, अरुण जाखडे आदींचे लेख पुस्तकात समाविष्ट आहेत. डॉ. यशवंत पाटणे यांनी संपादन केलं आहे. डॉ. मंदा नांदूरकर, विनोद सिनकर यांनी साह्य केलं आहे.

सर्वस्पर्शी डॉ. बाबासाहेब आंबेडकर
प्रकाशक - डायमंड पब्लिकेशन्स, पुणे (०२०- २४४५२३८७) / पृष्ठं - २९२ / मूल्य - २०० रुपये

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं जीवन आणि कार्य हा प्रेरणा देणाऱ्या किरणांचा अखंड स्रोत. त्यांनी केलेलं मूलगामी चिंतन, विचार, अध्ययन, त्यांचं व्यक्तिमत्त्व या सर्व गोष्टींचा वेध घेणारं हे पुस्तक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मूल्यदृष्टी, त्यांचं विचारविश्‍व आणि त्यांचं व्यक्तिमत्त्व आणि कार्य अशा तीन विभागांत मांडणी करण्यात आली आहे. त्यांची धर्म संकल्पना, लोकशाही संकल्पना, त्यांचा सामाजिक मूल्यविषयक दृष्टिकोन, त्यांची स्वातंत्र्याची संकल्पना अशा गोष्टींबाबत अनेक मान्यवरांनी लेखन केलं आहे. त्यांचे शैक्षणिक विचार, चळवळींबाबतचे विचार, त्यांच्या शेतीविषयक विचारांची वर्तमान उपयुक्तता, जातिव्यवस्थेचं राजकीय अर्थशास्त्र अशा विषयांचीही मांडणी करण्यात आली आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंचाही वेध घेण्यात आला आहे. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठानं डॉ. आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त पुस्तकाचं नियोजन केलं आहे. डॉ. पी. विठ्ठल आणि डॉ. नागोराव कुंभार यांनी संपादन केलं आहे.

समान नागरी कायदा
प्रकाशक - चंद्रकला प्रकाशन, पुणे (०२०- २४३३२७२७) / पृष्ठं - ९६ / मूल्य - १०० रुपये

मुजफ्फर हुसैन यांच्या ‘समान नागरिक कानून की दस्तक’ या पुस्तकाचा हा मराठी अनुवाद, अवंती महाजन यांनी तो केला आहे. या कायद्याशी संबंधित इतिहास, त्याच्या संदर्भात संसदेत झालेली चर्चा, गोव्यातला समान नागरी कायदा, हा कायदा कशासाठी, अशा वेगवेगळ्या गोष्टींचा वेध हुसैन यांनी घेतला आहे. त्यानिमित्तानं घटस्फोट, बहुविवाह, ई-मेलद्वारे तलाक, हिंदू कोड बिल आदी मुद्द्यांचीही त्यांनी चर्चा केली आहे.

बिहार, बंगाल, झारखंडमध्ये मराठे व चित्पावन यांचे स्थानांतर
प्रकाशक - सक्‍सेस पब्लिकेशन्स, पुणे (०२०- २४४३३३७४) / पृष्ठं - १८४ / मूल्य - २५० रुपये

महाराष्ट्रामधले मराठा आणि चित्पावन यांचं बंगाल, बिहार आणि झारखंडमध्ये झालेल्या स्थानांतराविषयी पुनीतकुमारसिंह यांनी केलेलं हे संशोधन. अडीचशे- तीनशे वर्षांपूर्वी या वर्गानं महाराष्ट्रातून स्थानांतर करण्यामागची पार्श्‍वभूमी, त्यावेळची परिस्थिती, इतक्‍या लांब त्यांनी केलेला संघर्ष, त्यांची कामगिरी अशा सगळ्या गोष्टींचा वेध घेण्याचा प्रयत्न लेखकानं केला आहे. स्थानांतर या विषयावर संशोधन करता करता लेखकाला अनेक प्रश्‍नांची उत्तरं मिळाली, काही नवीन प्रश्‍न निर्माण झाले. त्या सर्वांचा वेध त्यांनी या पुस्तकात घेतला आहे. काहींच्या बाबतीत हे स्थानांतर सकारात्मक वळण देणारं ठरलं. अनेक लोकांशी बोलून, संदर्भ तपासून त्यांनी पुस्तक सिद्ध केलं आहे. महाराष्ट्रीय लोकांनी महाराष्ट्राबाहेर केलेल्या कामगिरीचा तो एक प्रकारे गौरवच आहे. त्यांच्या मूळ पुस्तकाचा अनुवाद प्रा. नीला महाडिक यांनी
केला आहे.

गंमतगोष्टी
प्रकाशक - अनुश्री प्रकाशन, पुणे (९९२३१०३६०८)/ पृष्ठं - ११२ / मूल्य - १०० रुपये

लहान मुलांना गोष्टी आवडतात. संगीता पुराणिक यांनी हीच गोष्ट लक्षात घेऊन या आधुनिक बोधकथा लिहिल्या आहेत. आताच्या पिढीच्या जवळचे वाटणारे शब्द, त्यांचं भावविश्‍व, आधुनिक गोष्टी या लक्षात घेऊन पुराणिक यांनी त्या लिहिल्या आहेत. प्रत्येक गोष्ट काही तरी धडा देऊन जाते. कधी वेळेचं महत्त्व, कधी आहाराचं महत्त्व, कधी चांगल्या सवयींची उपयुक्तता सांगत त्यांनी त्या फुलवल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com