स्वागत नव्या पुस्तकांचे

स्वागत नव्या पुस्तकांचे

पाणपसारा
प्रकाशक - साकेत प्रकाशन, औरंगाबाद  (०२४०-२३३२६९२) / पृष्ठं - २१६ / मूल्य - २२५ रुपये

पाणी हा सगळ्याच जीवांना आधार देणारा घटक. लोकसंख्या वाढत असली, तरी जलस्रोत तितकेच असल्यामुळं पाण्याचं व्यवस्थापन खूप महत्त्वाचं आहे. पाण्याशी संबंधित समस्या दिवसेंदिवस उग्र होत चालल्या आहेत. जलधोरण, जसस्रोतांची हाताळणी, सिंचन, नागरी पाणीपुरवठा अशा अनेक विषयांवर या विषयातले तज्ज्ञ प्रा. विजय दिवाण यांनी लिहिलं आहे. नद्यांच्या शाश्‍वत व्यवस्थापनाची गरज, नदीजोड प्रकल्पांची उपयुक्तता, धरणं, जलनियोजनाबाबतची अकार्यक्षमता, मराठवाड्यातलं समन्यायी पाणीवाटप अशा अनेक विषयांवर त्यांनी मतं मांडली आहेत.

चंद्रगुप्त (व चाणक्‍य)
प्रकाशक - वरदा बुक्‍स, पुणे (०२० - २५६५५६५४) / पृष्ठं - २८८ / मूल्य - ३०० रुपये

हरी नारायण आपटे यांनी एकशे दहा वर्षांपूर्वी लिहिलेली ही कादंबरी. सम्राट चंद्रगुप्त आणि चाणक्‍य यांच्याविषयी इतिहासात फार कमी माहिती आहे. तो काळ अतिशय विलक्षण होता. आपटे यांनी तो काळ कादंबरीतून उभा केला आहे. ‘करमणूक’ या मासिकातून ही कादंबरी क्रमश- प्रसिद्ध झाली होती आणि नंतर ती पुस्तकस्वरूपातही आली होती. ‘मुद्राराक्षस’ या नाटकाचा आणि इतर माहितीचा आपटे यांनी त्यासाठी प्रामुख्यानं आधार घेतला होता. आता त्यात योग्य ते संस्कार करून ही कादंबरी नव्यानं वाचकांपुढं सादर करण्यात आली आहे.

भटकंतीवर बोलू काही...
प्रकाशन - काँटिनेंटल प्रकाशन, पुणे (०२०-२४३३७९८२) / पृष्ठं - १२६ / मूल्य - १५० रुपये

प्रतिमा दुरुगकर यांनी लिहिलेल्या या पर्यटनविषयक लेखांचं हे संकलन. ‘आडवाटेचा निसर्ग’, ‘स्थापत्यातील सौंदर्य’, ‘ऐतिहासिक ठेवा’ आणि ‘हेरिटेज वॉक’ अशा चार विभागांमध्ये त्यांनी स्वत-ची मुशाफिरी मांडली आहे. महाबळेश्‍वरमधल्या वेगळ्या वाटांपासून आणि दापोलीतल्या वेगळ्या स्थानांपासून हैदराबाद, कुमाऊपर्यंत अनेक ठिकाणांवर त्यांनी लिहिलं आहे. स्पेनमधल्या प्रवासाचंही त्यांनी वर्णन केलं आहे आणि दिल्ली, जयपूरमधल्या ‘हेरिटेज वॉक’वरही वर त्यांनी लिहिलं आहे. त्या त्या भागाचा इतिहास, भूगोल, पर्यटकांसाठीची आकर्षणं अशा गोष्टींचा समावेश आहे.

आहुती
प्रकाशक - प्राजक्त प्रकाशन, पुणे (९८९०९५६६९५) / पृष्ठं - ५६८/ मूल्य - ५०० रुपये

सुधाकर गुंजाळ यांची ही कादंबरी. काम, क्रोध, मद, मोह, मत्सर अशा विकारांनी व्यापलेल्या मनातल्या भावना आणि स्पंदनांची निसर्ग प्रतिमांच्या माध्यमातून ते गुंफण करतात. आसक्ती आणि विरक्ती या परस्परविरोधी जाणिवांत स्वत-च्या मुक्तीचा शोध घेणाऱ्या एकाची कहाणी गुंजाळ मांडतात. अतिशय काव्यात्म पद्धतीनं मांडलेली, आध्यात्मिक चिंतनाचा वलय लाभलेली वेगळ्या विषयावरची कादंबरी.

संमेलनाध्यक्षाची आत्मकथा
प्रकाशक - चेतक बुक्‍स, पुणे (९८२२२८०४२४) / पृष्ठं - २३० / मूल्य - ३०० रुपये

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी अध्यक्षपदाच्या काळातल्या घटनांवर लिहिलेलं हे पुस्तक. सबनीस यांच्या निवडीआधी आणि नंतरही अनेक वाद झाले, वेगवेगळ्या घटना घडल्या, अनेक उल्लेखनीय गोष्टीही झाल्या. या सगळ्यांविषयी सबनीस यांनी खास त्यांच्या शैलीत सडेतोडपणे लिहिलं आहे. अनेक गोष्टींबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे, काहींबाबत कारणमीमांसा केली आहे, काहींबाबत चिंतनही केलं आहे. या प्रवासात भेटलेल्या माणसांविषयी, वेगळ्या अनुभवांविषयीही त्यांनी लिहिलं आहे. ‘संवादपर्व’ आणि ‘संघर्षपर्व’ अशा दोन भागांत त्यांनी मांडणी केली आहे. अध्यक्षपदासाठीची निवडप्रक्रिया, सबनीस यांच्या पत्नी आणि मुलगा यांची मनोगतं, त्यांनी या काळात केलेले कार्यक्रम, त्यांची पुस्तकं, पुरस्कार या गोष्टीही पुस्तकात समाविष्ट आहेत.

आधुनिक प्रवचने बालमित्रांसाठी
प्रकाशन - अनुश्री प्रकाशन, पुणे (९५२७३११५८५) / पृष्ठं - १५६ / मूल्य - १६० रुपये

सध्याच्या आधुनिक पिढीतल्या मुलांना समजावीत, अशी प्रवचनं शैलजा सबनीस यांनी लिहिली आहेत. ज्ञानेश्‍वरीतल्या अठरा अध्यायांवर आधारित एकूण २१ प्रवचनं त्यांनी लिहिली आहेत. या अध्यायांतल्या एक किंवा दोन ओव्या निवडून त्यांनी मुलांना समजेल अशा भाषेत त्यांचं सार समजावून सांगितलं आहे. ताजी उदाहरणं, गोष्टी या गोष्टींचा समावेश सबनीस यांनी केला आहे आणि त्यांची भाषाही ओघवती, सोपी आहे.

सफर देखण्या ओडिशाची
प्रकाशक - स्नेहल प्रकाशन, पुणे (०२० - २४४५०१७८) / पृष्ठं - २०० / मूल्य - २५० रुपये

मंदिरांची, ऐतिहासिक वारशाची संपन्नता लाभलेल्या ओडिशाविषयी आशुतोष बापट यांनी लिहिलेलं हे पुस्तक. या राज्याची संस्कृती, तिथल्या परंपरा, कलावैशिष्ट्यं, इतिहास अशा अनेक गोष्टींची त्यांनी ओळख करून दिली आहे. जगन्नाथपुरी, कोणार्क, कटक, उदयपूर- खंडगिरी लेणी, हिरापूर अशा ठिकाणांची माहिती या पुस्तकात आहे. चिलिका सरोवर, नंदनकानन प्राणिसंग्रहालय, सिमलीपाल अभयारण्य, हिराकूड धरण, भुवनेश्‍वरचं संग्रहालय अशी ठिकाणंही या पुस्तकात भेटतात. ओडिशातले आदिवासी, तिथली खाद्यसंस्कृती, कोरापुट हा दागिना, पिपली आर्ट, ओडिशा दिवस यांचीही माहिती बापट यांनी करून दिली आहे. पूरक छायाचित्रांचाही पुस्तकात समावेश आहे.

मराशी
प्रकाशक - ऋद्धी प्रकाशन, उरळी कांचन, जि. पुणे (९९६०९८४१७०) / पृष्ठं - १६८ / मूल्य - २५० रुपये

नामदेव भोसले यांनी पारधी समाजाविषयी लिहिलेलं हे पुस्तक. ते त्यांनी मराठी आणि पारधी बोलीभाषा अशा दोन्ही प्रकारे मांडलं, लिहिलं आहे. या समाजाचं शोषित- कष्टमय जीवन, त्यांच्यातल्या चाली-रीती, महिलांबाबतचे नियम, सामाजिक स्थिती अशा अनेक गोष्टी या पुस्तकात आहेत. या समाजाबाबतची माहिती, त्यांच्यातले शकुन- अपशकुन, अंधश्रद्धा, महिलांविषयीचे नियम, जात पंचायती, शिक्षण अशा गोष्टींविषयी भोसले यांनी स्वतंत्र लेख लिहिले आहेत. या समाजाविषयीच्या काही कवितांचंही संकलन या पुस्तकात आहे. या समाजात नेहमी वापरल्या जाणाऱ्या शब्दांचा कोष, त्यांतलं व्याकरण, सरावासाठीची वाक्‍यं अशा गोष्टी हे या पुस्तकाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. अतिशय मेहनत घेऊन भोसले यांनी पुस्तक लिहिलं आहे. काही पूरक छायाचित्रांचाही समावेश पुस्तकात करण्यात आला आहे.

स्मार्ट सिटी- सर्वांसाठी
प्रकाशक - राजहंस प्रकाशन, पुणे (०२० - २४४७३४५९) / पृष्ठं - २१४ / मूल्य - ३५० रुपये

‘स्मार्ट सिटी’ हा केंद्र सरकारचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प. सुलक्षणा महाजन यांनी त्यांच्या पुस्तकातून स्मार्ट सिटी म्हणजे काय आणि स्मार्ट सिटी कोणासाठी या दोन प्रश्‍नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला आहे. खेडी आणि शहरं, नगरं आणि महानगरं अशा संकल्पना त्यांनी पुस्तकात विशद केल्या आहेत. स्मार्ट सिटी संकल्पनेचा आणि त्याबाबतच्या सिद्धांतांचाही ऊहापोह त्या करतात. जगभरातला स्मार्ट सिटी संकल्पनेचा प्रवास त्यांनी अधोरेखित केला आहे आणि रिओ दी जानेरो या शहराची स्मार्ट सिटी संकल्पनेच्या अनुषंगानं त्यांनी चर्चा केली आहे. भारतातलं स्मार्ट सिटी अभियान, ते कधी कसं सुरू झालं, महाराष्ट्राचा त्यात वाटा काय इत्यादी माहितीही पुस्तकात आहे. महाजन यांनी त्यांची या प्रयोगाबाबतची निरीक्षणंही नोंदवली आहेत.

बालवीरांच्या साहसी कथा
प्रकाशक - साकेत प्रकाशन, औरंगाबाद, (०२४०-२३३२६९२) / पृष्ठं - ७२ / मूल्य - ७० रुपये

लहान मुलांच्या प्रेरक, साहसी कथांचा हा संग्रह. रवी राजमाने यांनी तो लिहिला आहे. अनेक संकटांमधून, संघर्षांमधून सकारात्मक दिशेनं वाटचाल करणाऱ्या, प्रेरणा देणाऱ्या, संस्कार करणाऱ्या या कथा आहेत. किशोर, कुमारांबरोबर सर्वच वयोगटांतल्या वाचकांना आवडतील अशा या कथा आहेत. ‘किशोर’मध्ये प्रसिद्ध झालेल्या सत्यकथांचा त्यांनी पुस्तकात समावेश केला आहे. राजमाने यांच्या परिसरातली ही मुलं त्यांच्या वर्तनानं स्वत-चा आदर्श ठेवतात.

पत्रास कारण की...
प्रकाशक - काषाय प्रकाशन, पुणे (९०११३७२०२३) / पृष्ठं - २०८ / मूल्य - २०० रुपये

डॉ. नयनचंद्र सरस्वते यांनी लिहिलेलं हे कथन. एका संवेदनशील लेखिकेनं टिपलेला अतिशय वेगळ्या प्रकारचा संघर्ष, त्यातून तिला येणारं आत्मभान, तिनं तयार केलेलं तत्त्वज्ञान असे किती तरी पैलू असणारं हे कथन आहे. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मानसिक, भावनिक संघर्ष करायला लागूनही आई, वडील, भाऊ, आजी अशा वेगवेगळ्या नात्यांकडं किती तटस्थपणे बघता येतं, याचा हा आदर्श नमुनाच आहे. वडिलांविषयी भावना व्यक्त करणारी अनेक पुस्तकं आतापर्यंत आली असली, तरी हे पुस्तक वेगळं आहे, ते वाचकालाही लेखिकेच्या संघर्षाच्या प्रवासात ओढून घेतं. संघर्षाच्या या प्रवासातल्या अनेक छोट्या छोट्या गोष्टी संवदेनशील मनावर किती ओरखडे उमटवतात आणि ते ओरखडे उमटूनही त्यांच्याकडंच त्रयस्थपणे बघण्याची ताकदही कशी देतात, तेही या पुस्तकातून समजतं. पत्रांचा ‘फॉर्म’ लेखिकेनं हाताळला आहे आणि त्यामुळं वेगवेगळे धागे उलगडणंही त्यांना शक्‍य झालं आहे.

न ऐकलेली गोष्ट, फुगा
प्रकाशक -  भाषा मल्टिमीडिया, पुणे
(bhashaa.multimedia@gmail.com) /
पृष्ठं - २२ (प्रत्येकी) / मूल्य - ८५ रुपये (प्रत्येकी)

लहान मुलांचं भावविश्‍व खूप निरागस, तरल असतं. स्वाती राजे यांनी या दोन पुस्तकांत हे भावविश्‍व संवेदनशीलपणे चितारलं आहे. बालसाहित्यात बऱ्याचदा जुनाट विषय, विशिष्ट शब्द असतात आणि हल्लीच्या मुलांना त्यात रस वाटत नाही. या पुस्तकांत मात्र हल्लीच्या मुलांशी संबंधित, त्यांना जवळचं वाटणारं विश्‍व निवडलं आहे आणि तरल प्रसंगांतून योग्य तो धडाही दिला आहे. रस्त्यावर फुगे विकणाऱ्या मुलाला बघून, वासराचं दु-ख बघून शहाणी, समंजस झालेली दोन शहरी मुलं या पुस्तकांतून भेटतात. लहानांबरोबर मोठ्यांनासुद्धा विचार करायला लावतील, अशी ही छोटेखानी पुस्तकं. चंद्रमोहन कुलकर्णी यांनी शब्दांना चित्रांची जोड दिल्यामुळे पुस्तकं आणखी देखणी, अर्थपूर्ण झाली आहेत.

-------------------------------------------------------------------------
साभार पोच

  •  आनंदचांदणं / कवितासंग्रह / कवी - शरद अत्रे (९७६३६४२३५४)/ प्रकाशक - स्वरमहिमा प्रकाशन, पुणे (९९७५६२१५४४) / पृष्ठं - १२०/ मूल्य - १५० रुपये
  •  उर्दू शायरीचे रस रंग / रसग्रहण / आस्वादक - डॉ. मुकुंद महाजन / उत्कर्ष प्रकाशन, पुणे (०२० - २५५३७९५८) / पृष्ठं - ११० / मूल्य - १०० रुपये
  •  जयहिंद ते जयभारत / कविता आणि रसग्रहण / कवी - माधव राजगुरू (९४२३५६९०८४), संपादन - डॉ. विठ्ठल सोनवणे / सीमा पब्लिकेशन, पुणे / पृष्ठं - ६४ / मूल्य - ७० रुपये

-------------------------------------------------------------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com