स्वागत नव्या पुस्तकांचे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

गैराट
प्रकाशक - श्रीविद्या प्रकाशन, पुणे (०२० - २४४५८४५५) / पृष्ठं - १६८ / मूल्य - २७५ रुपये

गैराट
प्रकाशक - श्रीविद्या प्रकाशन, पुणे (०२० - २४४५८४५५) / पृष्ठं - १६८ / मूल्य - २७५ रुपये

गावांमध्ये उद्योगधंदे आले, लक्ष्मी आली आणि गावातलं माणूसपणही संपलं. अनेक जण अचानक अतिश्रीमंत झाले आणि त्यांच्यात कमालीचा बदल झाला. जमिनीला भाव आला आणि नात्यांमधला भाव कमी झाला. या सगळ्याचंच चित्रण करणारी सोपान खुडे यांची ही कादंबरी. अनेक गावांमध्ये सध्या सुरू असलेल्या गोष्टींचं योग्य चित्रण त्यांनी या कादंबरीत केलं आहे. दत्ता नावाच्या एका तरुणाची ही कादंबरी असली, तरी खरंतर ती अशा प्रकारच्या अनेकांची कादंबरी आहे. पैशानं अनेक गोष्टी खरेदी करता येतात; पण माणसं कशी तुटत जातात, हे खुडे कादंबरीत सांगतात. वाचकांना विचार करायला लावणारी, बदल नेमकेपणानं उभे करणारी ही कादंबरी.

साहित्यिक दर्पण दैनंदिनी २०१७
प्रकाशक - कुलसचिव, डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ (०२०-२७८०५००१)

पिंपरीच्या डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठानं साहित्यिक दर्पण दैनंदिनी तयार केली आहे. कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांची ही संकल्पना. प्रत्येकी चार महिन्यांच्या तीन स्वतंत्र विभागांत ही दैनंदिनी मांडण्यात आली आहे. वेगवेगळ्या साहित्यिकांच्या जन्मतारखा, त्यांचं साहित्य, त्यांना मिळालेले पुरस्कार आदी तपशील हे या दैनंदिनीचं वैशिष्ट्य. त्या-त्या दिवसाच्या पानावरही जन्म दिवस आणि जयंतींच्या नोंदी आहेत. आतापर्यंतच्या अखिल भारतीय मराठी साहित्यिक संमेलनाच्या अध्यक्षांची यादी, साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्यांची यादी अशाही नोंदी या दैनंदिनीत आहेत.

भूक आणि गरिबी
प्रकाशक - निर्मल प्रकाशन, नांदेड (०९४२२८७०३९३) / पृष्ठं - १६० / मूल्य - २०० रुपये

महार रेजिमेंटमध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडलेले आणि नंतरही आंबेडकरी चळवळीसाठी, स्वत-च्या समाजासाठी, गावासाठी झटणारे डी. पी. झगडे यांचं हे आत्मकथन. गरिबीचे चटके भोगलेल्या झगडे यांनी नंतर योग्य जाण ठेवत डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ नामांतर, राजगडनगर गावाची निर्मिती आणि इतर अनेक प्रकारचं काम केलं. त्यांनी या सगळ्या प्रवासाचं नेमकं आणि प्रांजळ वर्णन या पुस्तकात केलं आहे. कोणताही आडपडदा न ठेवता, त्यांनी स्वत-च्या विचारांना मुक्तपणानं वाट करून दिली आहे. अनेक गोष्टींचं परखडपणे विश्‍लेषणही त्यांनी केलं आहे.

मराठी संतांच्या हिंदी भक्तिरचना
प्रकाशक - सोहम क्रिएशन अँड पब्लिकेशन, पुणे (www.sohamcreation.org) / पृष्ठं - ३१२ / मूल्य - ३०० रुपये

अनेक मराठी संतांनी हिंदीतूनही भक्तिरचना सादर केल्या. जयश्री नातू यांनी त्यांचा धांडोळा घेऊन हे पुस्तक लिहिलं आहे. संत नामदेव महाराज, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, समर्थ रामदास स्वामी, संत रंगनाथ स्वामी, माधव महाराज, संत गुलाबराव महाराज, माणिक महाराज अशा किती तरी संतांनी हिंदीतूनही रसाळ काव्यं लिहिली आणि भक्तीचा मळा फुलवला. नातू यांनी त्या सर्वांचा धांडोळा घेतला आहे. जवळजवळ पन्नास संतांच्या हिंदीतल्या निवडक भक्तिरचना त्यांनी या पुस्तकात मांडल्या आहेत. त्या त्या रचनेचा भावार्थ, तिच्याबद्दल चिंतनही त्यांनी मांडलं आहे. त्या त्या रचनेचं वैशिष्ट्य, तिची शब्दकळा याही गोष्टी पुस्तकात आहेत.

देवानंपिय, पियदसी राजो-अशोक
प्रकाशक - व्हिजन पब्लिकेशन्स, पुणे (www.visionpune.com) / पृष्ठं - १०४ / मूल्य - १०० रुपये

जगाच्या इतिहासात स्वत-चा अमीट ठसा उमटवलेल्या सम्राट अशोकाविषयी डॉ. हेमा साने यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. सम्राट अशोकानं एक आचारसंहिता तयार केली आणि तिच्या पालनासाठी, प्रचारासाठी शिलालेख आणि स्तंभलेख तयार केले. हे लेख कुठं आढळतात, त्यांच्यातली लिपी कोणती, त्यांचं स्वरूप काय, त्यांचं वैशिष्ट्य काय अशा अनेक गोष्टींवर डॉ. साने यांनी प्रकाश टाकला आहे. त्याकाळची सामाजिक स्थिती, अशोकाचे पर्यावरणीय विचार, त्याचा नीतिधर्म, अशोक आणि बौद्ध धर्म या गोष्टींविषयी त्यांनी विवेचन केलं आहे. सम्राट अशोकाचा जीवनपट, त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू, अशोक वृक्ष यांच्याविषयीही पुस्तकात माहिती मिळते.

आम्ही फक्त आनंद देतो
प्रकाशक - प्रियांजली प्रकाशन, पुणे (९८५०९६२८०७) / पृष्ठं - २०४ / मूल्य - ३०० रुपये

अनिल अभ्यंकर यांनी लिहिलेल्या विनोदी एकांकिकांचा हा संग्रह. अनेक स्पर्धांत एकांकिका सादर होत असल्या तरी, प्रत्यक्षात फार कमी एकांकिका पुस्तकरूपात येतात. अभ्यंकर यांनी छोट्या-छोट्या कार्यक्रमात सादर करता येतील, अशा तेरा एकांकिका या संग्रहात समाविष्ट केल्या आहेत. सोसायटीचं अध्यक्षपद, एकावर एक ‘फ्री’ मिळण्याचे प्रकार, भाड्यानं माणसं आणण्याचे प्रसंग, आंबे, अमेरिकेचं वाढतं प्रस्थ, बाटली आणि चहाचं भांडण, असे मध्यमवर्गीयांच्या नेहमीच्या जीवनाशी निगडित विषय निवडले आहेत. सादर करायला आणि नुसत्या वाचायलाही गंमतीशीर वाटतील, अशा या एकांकिका आहेत.

मैत्री अशी आणि तशी
प्रकाशक - मेहता प्रकाशन, पुणे (०२०-४४७६९२४) / पृष्ठं - २२४ / मूल्य - २५० रुपये

मैत्री हे अतिशय हळुवार असं नातं. अनेकदा किरकोळ किंवा गंभीर कारणांमुळं ही मैत्री अपायकारक वळणावर येते आणि ते नातं जवळजवळ तुटतंच. तेच नातं पुन्हा कसं जोडायचं, विचार कसा करायचा, मूळ कसं शोधायचं आदींविषयी या पुस्तकात ऊहापोह करण्यात आला आहे. मैत्री या विषयावर संशोधन करणाऱ्या जॅन येगर यांनी लिहिलेल्या ‘व्हेन फ्रेंडशिप हर्टस’ या पुस्तकाचा हा मराठी अनुवाद. सुप्रिया वकील यांनी तो केला आहे. मित्र म्हणजे नक्की काय, मैत्री जोडण्यापूर्वी अपायकारक लोक कसे ओळखायचे, मित्रच मित्रांना का दुखावतात, मैत्री वाचवता येऊ शकते का, नव्यानं सुरवात कशी करायची, तडे गेलेली मैत्री पुढं कशी निभवायची अशा अनेक गोष्टींवर पुस्तकात मार्गदर्शन करण्यात आलं आहे.

जनता दरबार
प्रकाशक - जनता दरबार प्रकाशन, पुणे (९३२५२००२१०) / पृष्ठं - ३७४ / मूल्य - ७७५ रुपये

लेखिका-निवेदिका स्वाती पाटणकर यांनी लिहिलेलं हे पुस्तक. दूरदर्शनच्या ‘सह्याद्री’ वाहिनीवर त्यांनी ‘जनता दरबार’ याच नावाची मालिका सादर केली. वेगवेगळ्या सरकारी योजनांना कसा प्रतिसाद मिळतो आहे, जनतेची त्यांच्याबाबत काय मतं आहेत, योजनेत नक्की काय आहे, आदी आढावा घेणारी ही मालिका त्यांनी सादर केली. जात पडताळणीपासून चारावाटप उपक्रमापर्यंत अनेक योजनांचा त्यांनी आढावा घेतला. या प्रत्येक भागाचं विश्‍लेषण त्यांनी या पुस्तकात केलं आहे. ते-ते भाग सादर करताना काय अनुभव आले, चित्रीकरण कसं केलं, वेगवेगळ्या घटकांची प्रतिक्रिया कशी होती अशा अनेक गोष्टी त्यांनी पुस्तकातून मांडल्या आहेत. त्या योजनांचे तपशील, त्यांचं महत्त्व, पूरक छायाचित्रं अशा गोष्टींचाही त्यांनी पुस्तकात समावेश केला आहे. मालिकेच्या एकूण ५३ भागांविषयी त्यांनी
लिहिलं आहे.

प्रशासनातले समाजशास्त्र
प्रकाशक - स्वयंदीप प्रकाशन, पुणे (९९२२२२४६८६) / पृष्ठं - १४२ / मूल्य - १५० रुपये

माजी सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांनी लिहिलेल्या लेखांचं हे संकलन. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून पुढे आलेल्या खोब्रागडे यांनी विविध प्रशासकीय पदांवर काम करताना शोषित, वंचित वर्गाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. ‘सरकारी मानसिकता’ झुगारून त्यांनी अनेक उपक्रम राबवले, त्यांत त्यांना यशही आलं. हे उपक्रम राबवत असताना खोब्रागडे यांना वेगवेगळे अनुभव आले, अनेक प्रसंगांना सामोरं जावं लागलं, काही ठिकाणी कठोर व्हावं लागलं, तर काही ठिकाणी योग्य संवाद साधत समस्यांचं निराकरण करावं लागलं. या सगळ्या गोष्टींबद्दल त्यांनी या पुस्तकात सविस्तर आणि स्पष्टपणे लिहिलं आहे. ‘अधिकाऱ्यांचे दौरे’, ‘कर्मचारी दिन’, ‘महिला वाहिनी’, ‘नकाराची एक सकारात्मक चूक’, ‘वंचितांच्या वस्तीकडे लक्ष द्या’, आदी लेख प्रेरणादायी आहेत. अधिकाऱ्यांनी कशा प्रकारे वागलं पाहिजे, दृष्टिकोन कसा विस्तारला पाहिजे, सगळ्या घटकांचा विचार कसा केला पाहिजे आदींबाबतही खोब्रागडे यांनी
चिंतन केलं आहे.

---------------------------------------------------------------------------------
तांत्रिक दृष्टिकोनातून सेंद्रिय शेती

प्रकाशक - सकाळ प्रकाशन, पुणे (०२०-२४४०५६७८) / पृष्ठं - २०६ / मूल्य - २४० रुपये
सेंद्रिय शेतीची सध्या बरीच चर्चा असली तरी, अनेकांना अजूनही तिच्याबाबत, तांत्रिक गोष्टींबाबत नेमकी माहिती नाही. प्रशांत नाईकवाडी यांनी हीच गोष्ट लक्षात घेऊन हे पुस्तक लिहिलं आहे. सेंद्रिय शेतीशी संबंधित वेगवेगळ्या संकल्पना, अनुषंगिक बाबी, तिचे घटक, आवश्‍यक गोष्टी यांच्याबाबत त्यांनी सविस्तरपणे लिहिलं आहे. सेंद्रिय शेती म्हणजे नक्की काय, तिचा उद्देश, सेंद्रिय खतांचे प्रकार आणि फायदे, सेंद्रिय कर्ब, माती परीक्षण, तणांचं व्यवस्थापन, जैविक कीड आणि रोग नियंत्रण, शेतावर बनवता येणारे रोग आणि कीड प्रतिबंधक सेंद्रिय अर्क यांच्यावर नाईकवाडी यांनी लिहिलं आहे. गांडूळ खत, गोमाता, जमितीतले सूक्ष्मजंतू आदींचं महत्त्वही त्यांनी समजावून सांगितलं आहे. वेगवेगळे तक्ते, छायाचित्रं, सांख्यिकी माहिती यांचाही समावेश केल्यामुळं त्यांचा प्रत्यक्ष उपयोग करणं सोपं पडू शकतं.

कांगारू- ऑस्ट्रेलियन क्रिकेट आणि पर्यटनाचा जिवंत अनुभव
प्रकाशक - सकाळ प्रकाशन, पुणे (०२०-२४४०५६७८) / पृष्ठं - ६४ / मूल्य - १२० रुपये

मुक्त क्रीडा पत्रकार सुनंदन लेले यांनी लिहिलेलं हे पुस्तक. पुस्तकाच्या नावातच म्हटल्याप्रमाणं ऑस्ट्रेलियातल्या अनेक घटना, प्रसंगांचा जिवंत अनुभव देणारं रसाळ वर्णन त्यांनी केलं आहे. वार्तांकनाच्या निमित्तानं लेले सात वेळा ऑस्ट्रेलियाला गेले. दर वेळी नवीन काही बघितल्याचा, नवीन शिकल्याचा आनंद त्यांना मिळाला. या दौऱ्यांदरम्यान केलेली भटकंती, भेटलेली माणसं, मनावर कोरले गेलेले प्रसंग, जुळलेले मैत्रीचे बंध अशा अनेक गोष्टींवर लेले यांनी खुसखुशीतपणे लिहिलं आहे. महेंद्रसिंह धोनीनं केलेल्या पोळ्या, फिल ह्यूजचं अकाली निधन, सिडनीतलं ओलिस नाट्य, हर्ष भोगले यांच्याबरोबरची मैत्री, सर डॉन ब्रॅडमन यांच्या घराची भेट अशा किती तरी गोष्टी या पुस्तकात भेटतात. मेलबर्न, रेन फॉरेस्ट, कांगारू बेट अशा ठिकाणांविषयीही लेले यांनी लिहिलं आहे.

---------------------------------------------------------------------------------
साभार पोच

  •  काटेसावर / कवितासंग्रह / कवयित्री - उषा मेहता (९८३३०८४२८३)/ ग्रंथाली प्रकाशन, मुंबई (०२२-२४२१६०५०) / पृष्ठं - ८८ / मूल्य - १२५ रुपये
  •  बालाघाटची गाणी/ बालकविता / कवी - सय्यद अल्लाउद्दीन (९४२१३४९१५९)/ इसाप प्रकाशन, नांदेड / पृष्ठं - ३० / मूल्य - ५० रुपये
  •  स्थावर मालमत्ता (नियमन आणि विकास) अधिनियम आणि आदर्श नियम २०१६ / माहितीपर / लेखक - ॲड. सुधीर बिरजे/ अजित प्रकाशन, पुणे (१८००३०७०२१०१)/ पृष्ठं - १९६ / मूल्य - २४५ रुपये.

---------------------------------------------------------------------------------

Web Title: welcome new books