स्वागत नव्या पुस्तकांचे

स्वागत नव्या पुस्तकांचे

द प्रॉफेट, द मॅडमन
प्रकाशक - रिया पब्लिकेशन्स, कोल्हापूर (riyapublications@gmail.com)  / पृष्ठं - १८४/ मूल्य - २२० रुपये

खलिल जिब्रान या प्रतिभावंत लेखक, कवी, जीवनसमीक्षकाच्या दोन पुस्तकांचा हा अनुवाद. वेगवेगळ्या गोष्टी सांगत, अनुभव मांडत, दाखले देत खलिल जिब्रान जीवनाचं तत्त्वज्ञान मांडतो. अतिशय तरलपणे लिहिलेले आणि कोणत्याही काळात लागू होणारे, वाचकाला स्वत-ची नवी ओळख करून देणारे त्याचे लघुनिबंध सुरेख आहेत. ‘द प्रॉफेट’ आणि ‘द मॅडमन’ या पुस्तकांचा एकत्रित अनुवाद या पुस्तकात करण्यात आला आहे. दोन्ही पुस्तकांत खलिल जिब्राननं एका विशिष्ट सूत्रामध्ये सुरेख तत्त्वज्ञान मांडलं आहे. ‘दान’, ‘आनंद आणि शोक’, ‘आत्मज्ञान’ अशा किती तरी विषयांवर त्यांनी ‘द प्रॉफेट’मध्ये चिंतन केलं आहे. ‘द मॅडमन’मध्ये मांडलेल्या लघुकथा तर विलक्षण आहेत. वाचनाबरोबरच मनात अर्थांचे खेळ मांडणारा हा संग्रह. डॉ. सहदेव चौगुले-शिंदे यांनी अनुवाद केला आहे.

रूपेरी सिंधू
प्रकाशक - मेहता पब्लिशिंग हाऊस,
पुणे (०२०-२४४७६९२४) / पृष्ठं - ८०/ मूल्य - १२५ रुपये

रिओ ऑलिंपिक्‍स स्पर्धेत रौप्यपदक मिळवणाऱ्या पी. व्ही. सिंधू हिची ओळख करून देणारं हे पुस्तक. अतुल कहाते यांनी ते लिहिलं आहे. बॅडमिंटन या खेळाविषयी आणि सिंधूचे प्रशिक्षक पी. गोपीचंद यांच्याविषयीही कहाते यांनी माहिती करून दिली आहे. सिंधूची जडणघडण कशी झाली, बॅडमिंटनपटू म्हणून ती कशी घडत गेली, हे त्यांनी नेमकेपणानं लिहिलं आहे. रिओ ऑलिंपिक्‍ससाठी सिंधूनं कशी तयारी केली, प्रत्यक्ष काय-काय घडामोडी घडत गेल्या, हेही त्यांनी उलगडून दाखवलं आहे. तिच्या आणि गोपीचंद यांच्या काही मुलाखतींचाही पुस्तकात समावेश आहे.

वय सरता (वि)सरता
प्रकाशक - मधुश्री प्रकाशन, पुणे (९८५०९६२८०७) / पृष्ठं - २४४ / मूल्य - ३५० रुपये

नंदिनी देव यांनी वेगवेगळे लेख, कथा, कविता, सुभाषितवजा गोष्टी, कोडी यांचं केलेलं हे संकलन. देव यांनी लहानपणापासून अक्षरधन जपलं, विचार केला, त्यातूनच त्यांचं हे सर्जनशील लेखन तयार झालं. छोट्यांसाठी आणि मोठ्यांसाठी दोघांसाठीही हे पुस्तक असल्यामुळं त्यांनी दोन्ही वयोगटांना योग्य वाटेल, अशा प्रकारे त्याची विभागणी केली आहे. मोठ्यांना वाचायला आवडतील असे काही ललित लेख, कथा, कविता त्यांनी संकलित केल्या आहेत. लहान मुलांसाठी सुभाषितवजा गोष्टी लिहिल्या आहेत, कविता आहेत आणि गमतीशीर शब्दखेळही आहेत.

युनेस्कोच्या यादीतील जगप्रसिद्ध भारतीय स्थाने
प्रकाशक - ज्ञानेश प्रकाशन, नागपूर (०७१२-२२२७४७९) / पृष्ठं - २३२/ मूल्य - ३०० रुपये

युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थानांच्या यादीत भारतातल्या वेगवेगळ्या स्थळांचा समावेश झाला आहे. या वेगवेगळ्या ठिकाणांची एकत्रित माहिती करून देणारं हे पुस्तक डॉ. भाग्यश्री काळे-पाटसकर यांनी लिहिलं आहे. त्या त्या स्थळांचं महत्त्व, त्यांचं वैशिष्ट्य, तिथलं सांस्कृतिक, कलात्मक, ऐतिहासिक वैभव या गोष्टी त्यांनी उलगडून दाखवल्या आहेत. ताजमहालापासून महाबलीपुरमपर्यंत वेगवेगळ्या ३५ ठिकाणांचा परिचय त्यांनी करून दिला आहे. त्या त्या ठिकाणचा इतिहासही त्यांनी सांगितला आहे. त्या ठिकाणी कसं जायचं, काय बघायचं, इतर कोणत्या गोष्टी करायच्या अशा गोष्टीही त्यांनी सांगितल्या आहेत. पूरक छायाचित्रांचा वापरही केल्यामुळं आणखी उपयुक्त झालं आहे.

शब्द चिंतन
प्रकाशक - अनुश्री प्रकाशन, पुणे (९५२७३११५८५) / पृष्ठं - १६० / मूल्य - १५० रुपये

प्रा. डॉ. बाबूराव उपाध्ये यांनी लिहिलेल्या साहित्यविषयक आणि चिंतनपर लेखांचा हा संग्रह. साहित्यविषयक घटना, प्रसंग, साहित्यिक अशा अनेक गोष्टींवर उपाध्ये यांनी लिहिलं आहे. एक जिज्ञासू, रसिक, वाचक, श्रोता या नात्यानं त्यांनी केलेलं हे लेखन. ‘स्त्रीवादी लेखन’, ‘संतसाहित्य’, ‘मराठी प्रेमकविता’, ‘ग्रामकवी’, ‘पत्र वाङ्‌मय’, ‘लेखनाचं मुक्तांगण’, ‘महानुभावीय साहित्य’, ‘साठोत्तरी मराठी कविता’, ‘शालिवाहन शक’ असे अनेक विषय त्यांनी लेखनातून हाताळले
आहेत.

आपण हिंदू का नाही?
प्रकाशक - सुगावा प्रकाशन, पुणे (०२०-२४४७८२६३) / पृष्ठं - ११२ / मूल्य - १२० रुपये

प्रा. मर्झबान जाल यांनी या पुस्तकात राजकीय हिंदुत्ववाद आणि त्याचा भारतातल्या ‘फॅसिझम’च्या उदयामध्ये आणि वाढीमध्ये असलेली भूमिका यांच्यासंदर्भात चर्चा केली आहे. मार्क्‍सवादी आणि फ्रॉइडवादी विश्‍लेषणातून निष्पन्न होणाऱ्या संकल्पनांचा मिलाफ साधून त्यांतून लेखकानं राजकारणावर, विचारसरणीवर प्रकाश टाकला आहे. हिंदुत्ववादी विचारसरणीमुळं समस्या कशा निर्माण होतात, यासंबंधी त्यांनी वेगवेगळे संदर्भ मांडत, युक्तिवाद करत विश्‍लेषण
केलं आहे.

साभार पोच

  •  जगद्‌गुरू श्रीमत्‌ शंकराचार्य / चरित्र / लेखक - पंडित दीनदयाळ उपाध्याय/ अनुवाद - लक्ष्मण टोपले /
  • मोरया प्रकाशन, पुणे (९२२३५०१७९७) / पृष्ठं - ११२ / मूल्य - ६० रुपये
  •  ठाणे नगरपालिका ते महानगरपालिका / माहितीपर / लेखक - श्री. वा. नेर्लेकर (९८९२७५२५३) /
  • व्यास क्रिएशन्स, नौपाडा, ठाणे (पश्‍चिम) (९९६७८३९५१०) / पृष्ठं - १९२ / मूल्य - २२५ रुपये
  •  ऋग्वेदातील निवडक सूक्ते / आध्यात्मिक / लेखिका - रंजना उन्हाळे (०२०-२५४५९५३९)/
  • आदिमाता प्रकाशन, पुणे (०२०-२५४५८४२७) / पृष्ठं - २२० / मूल्य - २५० रुपये
  •  गुलमोहर / कवितासंग्रह / कवी - सूर्यकांत आंगणे (९६६४८३२०८५)/
  • सिद्धार्थ प्रकाशन, मुंबई / पृष्ठं - ६८/ मूल्य - ७५ रुपये
  •  निर्णायक युद्ध / कवितासंग्रह / कवी - रसपाल शेंदरे (९०९६६८८१९७८)/
  • संवेदना प्रकाशन, खापरखेडा (जि. नागपूर) / पृष्ठं - ५६/ मूल्य - १२० रुपये
  •  अनुवाद चंपकम / संस्कृत स्तोत्रांचा समवृत्त भावानुवाद / अनुवादक - अरुंधती दीक्षित (९८२३०१९५६६)/ ग्रांथाली प्रकाशन, मुंबई (०२२-२४२१६०५०) / पृष्ठं - १६२/ मूल्य - १८० रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com