स्वागत नव्या पुस्तकांचे

स्वागत नव्या पुस्तकांचे

योजकस्तत्र दुर्लभ
प्रकाशक - ज्ञानेश प्रकाशन, नागपूर (०७१२-२२२७४७९) / पृष्ठं - २२४/ मूल्य - २५० रुपये

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनप्रवासाविषयी डॉ. भा. ना. काळे यांनी लिहिलं आहे. मोदी यांचे सुरवातीचे दिवस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचं नातं, गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या नावीन्यपूर्ण गोष्टी अशा वेगवेगळ्या गोष्टींवर काळे यांनी प्रकाश टाकला आहे. मोदी यांनी पंतप्रधान म्हणून घेतलेले अनेक निर्णय, त्यांनी पाडलेल्या प्रथा यांच्याविषयीही त्यांनी चर्चा केली आहे. अगदी ‘सर्जिकल स्ट्राइक’ आणि नोटबंदीपर्यंतच्या निर्णयांचीही मीमांसा पुस्तकात समाविष्ट आहे.

श्री क्षेत्र पंढरपुरातील मठांचा इतिहास
प्रकाशक - उत्कर्ष प्रकाशन, पुणे (०२०-२५५३२४७९) / पृष्ठं - १६०/ मूल्य - १५० रुपये

पंढरपूरमधला विठ्ठल हे फक्त महाराष्ट्राचंच नव्हे तर देशभराचं दैवत. आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या वाऱ्यांना तिथं अवघा महाराष्ट्र लोटतोच; पण इतरही वर्षभर पंढरपूर भाविकांनी गजबजलेलं असतं. या भाविकांच्या वास्तव्यासाठी अनेक मठ आणि फड पंढरपुरात आहेत. ज्येष्ठ संशोधक वा. ल. मंजुळ यांनी या मठांबाबत संशोधन करून त्यांचा इतिहास लिहिला आहे. एकूण ३६ मठांचा इतिहास त्यांनी लिहिला आहे आणि काही मठांचा गोषवाराही घेतला आहे. त्या त्या मठाशी संबंधित वंशावळ, तिथल्या परंपरा, वैशिष्ट्यं अशा वेगवेगळ्या गोष्टींचा मागोवा त्यांनी घेतला आहे. मठाचं उत्पन्न, त्यांचं सामाजिक कार्य, व्यवस्था, त्यांचे उपयोग अशा गोष्टीही त्यांनी मांडल्या आहेत. वेगवेगळ्या दिंड्यांचाही धांडोळा त्यांनी घेतला आहे.

सफर हंपी-बदामीची
प्रकाशक - स्नेहल प्रकाशन, पुणे (०२०-२४४५०१७८) / पृष्ठं - १३६ / मूल्य - १६० रुपये

चालुक्‍य आणि विजयनगर ही दक्षिण भारतातली अतिशय बलाढ्य राजघराणी. अनुक्रमे हंपी आणि बदामी इथं आणि परिसरात या साम्राज्याचे अवशेष मंदिरं आणि इतर स्थापत्त्यांच्या रूपांत दिसतात. या स्थळांची आणि परिसराची ओळख आशुतोष बापट यांनी करून दिली आहे. नुसती भटकंती नव्हे, तर कला, संस्कृती, स्थापत्त्यशास्त्र, मूर्तिशास्त्र अशा वेगवेगळ्या गोष्टीही त्यांनी ओघात उलगडून दाखवल्या आहेत. त्या परिसरातली वेगवेगळी मंदिरं, त्यांतली शिल्पं, त्यांची वैशिष्ट्यं अशा गोष्टी पुस्तकात आहेत. पूरक छायाचित्रांचाही समावेश असल्यामुळं तिथं पर्यटनासाठी जाणाऱ्यांना उपयोग होऊ शकेल.

भरती-ओहोटी
प्रकाशक - स्वयंदीप प्रकाशन, पुणे (९४०३१३९०४९) / पृष्ठं - ११०/ मूल्य - १२० रुपये

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या आष्टा कासार या गावातून गरीबीतून संघर्ष करत केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्रात ग्रंथपालपदापर्यंत पुढं आलेल्या आणि विविध कामं करून, लेखनाद्वारे आंबेडकरी चळवळ, विचार पुढं नेणाऱ्या डॉ. दत्तात्रय गायकवाड यांचं हे आत्मकथन. लहानपणीचा संघर्ष, गावातली स्थिती, थायलंडमधून बुद्धमूर्ती मागवून तिची प्रतिष्ठापना करण्याचं काम, गावातलं ग्रंथालय सुरू करण्याचं काम, पी. एचडीसाठीचा संघर्ष, महात्मा जोतिबा फुले फेलोशिपबाबतचे अनुभव अशा वेगवेगळ्या गोष्टींबाबत डॉ. गायकवाड यांनी मोकळेपणानं लिहिलं आहे. दोन कथा आणि त्यांच्या एका लेखावर आलेल्या प्रतिक्रियाही त्यांनी पुस्तकात समाविष्ट केल्या आहेत.

भारतातील सार्वजनिक ग्रंथालय कायदे
प्रकाशक - युनिव्हर्सल प्रकाशन, पुणे (०२०-२४४५०९७६)/ पृष्ठं - २२६ / मूल्य - ३५० रुपये

श्‍याम दाइंगडे यांनी लिहिलेलं हे पुस्तक. सार्वजनिक ग्रंथालयांविषयी आज बरीच पुस्तकं उपलब्ध असली, तरी ग्रंथालय कायद्यांविषयी मराठीतून माहिती फारच कमी प्रमाणावर उपलब्ध आहे. तीच गोष्ट लक्षात घेऊन दाइंगडे यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. वेगवेगळी राज्य, केंद्रशासित प्रदेशांमधल्या ग्रंथालय कायद्यांची कलमनिहाय माहिती, त्यांचं संक्षिप्त स्वरूप, विविध ग्रंथालय अधिनियमांचा तुलनात्मक अभ्यास आणि ग्रंथालय कायदे अस्तित्वात असलेल्या राज्यांमधल्या सेवांचा तुलनात्मक अभ्यास पुस्तकात समविष्ट आहे. महाराष्ट्र ग्रंथालय कायद्याची सविस्तर ओळख त्यांनी करून दिलीच आहे, शिवाय इतर १८ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या सार्वजनिक ग्रंथालय कायद्यांचीही माहिती त्यांनी दिली आहे.

द व्हाइट एप्रन
प्रकाशक - उत्कर्ष प्रकाशन, पुणे (०२०- २५५३२४७९) / पृष्ठं - १७६/ मूल्य - २५० रुपये

डॉ. एस. एम. जैन हे वैद्यकीय क्षेत्रातले तज्ज्ञ. डॉक्‍टरांना घालाव्या लागणाऱ्या ‘व्हाइट एप्रन’प्रमाणंच त्यांनी आयुष्यभर स्वच्छपणे ‘प्रॅक्‍टिस’ केली. त्याचीच कहाणी त्यांनी या पुस्तकात मांडली आहे. अकोल्यातले दिवस, वैद्यकीय शिक्षण, आंतरजातीय विवाह केल्यामुळं आलेले अनुभव, नंतर नगरमध्ये केलेली प्रॅक्‍टिस, भारती विद्यापीठात केलेलं अध्यापन, रूबी हॉल क्‍लिनिकमध्ये केलेलं काम... अशा सगळ्या गोष्टींवर त्यांनी प्रांजळपणानं लिहिलं आहे. वैद्यकीय व्यवसायात चालू असलेल्या गोष्टी, त्यांनी पाळलेली तत्त्वं, त्यांचे अनुभव या गोष्टींवरही त्यांनी सविस्तर लिहिलं आहे. काही डॉक्‍टरांची पत्रंही त्यांनी जोडली आहेत. वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित लोक अनेकदा कामाच्या व्यापामुळं स्वत-चे अनुभव लिहीत नाहीत, त्या पार्श्‍वभूमीवर डॉ. जैन यांचं हे आत्मकथन उल्लेखनीय आहे.

कशी आहे प्रकृती?
प्रकाशक - दीर्घायू इंटरनॅशनल, पुणे (०२०- २५३८२१३०) / पृष्ठं - ११६/ मूल्य - २०० रुपये

डॉ. पां. ह. कुलकर्णी यांनी लिहिलेलं हे पुस्तक. प्रकृतीविषयी, जीवनाविषयी त्यांनी लिहिलं आहे. आयुर्वेदाचं तत्त्व, आपली प्रकृती कशी समजून घ्यायची, दिनक्रम कसा असला पाहिजे, कोणते अन्नपदार्थ खाल्ले पाहिजेत, कोणते टाळले पाहिजेत... अशा वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केलं आहे. योग्य ठिकाणी आकृत्या, तक्ते यांचाही समावेश केला आहे. याशिवाय गीतेतलं तत्त्वज्ञान, ज्ञानेश्‍वरीतलं तत्त्वज्ञान, जगावं कसं अशा विषयांवरही त्यांनी चिंतन केलं आहे. काही वैयक्तिक अनुभवही त्यांनी मांडले आहेत.

उत्कृष्ट वक्ता व्हा
प्रकाशक - साकेत प्रकाशन, औरंगाबाद (०२४०- २३३२६९२) / पृष्ठं - १४४ / मूल्य - १५० रुपये

वक्तृत्वकला ही फक्त दैवी देणगी नसते, ती विकसितसुद्धा करता येते. ही कला विकसित कशी करायची याविषयी सारंग टाकळकर यांनी लिहिलेलं हे पुस्तक. वक्‍त्याच्या वैशिष्ट्यांपासून भाषणासाठी मुद्दे काढण्यापर्यंत वेगवेगळ्या गोष्टींबद्दल त्यांनी माहिती लिहिली आहे. भाषणाचं स्वरूप कसं निश्‍चित करायचं, आत्मविश्‍वास कसा मिळवायचा, पेहराव कसा ठेवायचा, माईकचा वापर कसा करायचा, श्रोत्यांना सामावून कसं घ्यायचं, मुद्द्यांची तर्कसंगती कशी ठेवायची, कोणत्या गोष्टी टाळायच्या अशा वेगवेगळ्या गोष्टींबाबत त्यांनी मुद्देसूद पद्धतीनं माहिती दिली आहे. राजकीय आणि कॉर्पोरेट क्षेत्रातल्या भाषणांचं वेगळेपणही त्यांनी पटवून दिलं आहे.

निवृत्तीशील मनाकडे
प्रकाशक - जे. कृष्णमूर्ती विचारमंच, पुणे (९४२२३५०३५०) / पृष्ठं - ६४ / मूल्य - ६० रुपये

अनेक जण ज्येष्ठ नागरिक झाले, तरी मनानं निवृत्तीशील होत नाहीत. हा ज्येष्ठत्वाकडून निवृत्तीशील मनाकडं करण्याचा प्रवास हा बराचसा आध्यात्मिक भाग असतो, असं तत्त्वचिंतक जे. कृष्णमूर्ती यांनी म्हटलं आणि ते सूत्रबद्ध पद्धतीनं मांडलं. त्यांच्या याच मांडणीचं विवेचन डॉ. कमलेश सोमण यांनी केलं आहे. ‘एकटेपणातून एकाकीपणाकडे’, ‘गुणात्मक परिवर्तनाकडे’, ‘ज्येष्ठांच्या समस्या - काही निरीक्षणे’ अशा विविध लेखांतून सोमण यांनी कृष्णमूर्ती यांचं तत्त्वज्ञान मांडलं आहे. त्याला पूरक उदाहरणं देत त्यांनी हा विषय नेमकेपणानं मांडला आहे.

डेफ असलो तरीही...
प्रकाशक - ग्रंथाली मुद्रण सुविधा केंद्र, मुंबई (०२२- २४२१६०५०) / पृष्ठं - १२८ / मूल्य - १५० रुपये

कर्णबधिरांसाठी काम करणाऱ्या आणि ‘डेफ ॲक्‍शन ग्रुप’च्या (९८९२२११९४६) अध्यक्षा उषा धर्माधिकारी यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. या क्षेत्रात काम करताना भेटलेल्या अनेक कर्णबधिरांच्या प्रेरणादायी आणि वेदनादायी कहाण्याही त्यांनी पुस्तकात मांडल्या आहेत. कर्णबधिरांची संवादक्षमता, त्यांचा व्यक्तिमत्त्वविकास, त्यांच्या शिक्षणाची दुरवस्था, त्यांच्या क्षेत्रातली समाजसेवा, त्यांची व्यवसायासंबंधीची क्षमता अशा अनेक गोष्टींचाही ऊहापोह धर्माधिकारी यांनी केला आहे. साइन लॅंग्वेज, कॉक्‍लिअर इम्प्लांट, सहृदय समुपदेशन केंद्र यांचीही माहिती त्यांनी पुस्तकात दिली आहे. या क्षेत्रात काम करताना सुचलेल्या कविता आणि किस्सेही पुस्तकात आहेत. धर्माधिकारी यांच्या काही सहकाऱ्यांनीही लेखन केलं आहे.

समाधानात जगावं कसं?
प्रकाशक - उद्‌वेली बुक्‍स, ठाणे (पश्‍चिम) (०२२-२५८१०९६८) / पृष्ठं - ९६ / मूल्य - २०० रुपये

अनेक जण आपल्या जगण्यात, कामात कधीच समाधानी नसतात. अशांना समाधानात जगण्यासाठीचे कानमंत्र देणारं हे पुस्तक. लिओ बबाऊता यांच्या ‘द लिट्‌ल बुक ऑफ कंटेंटमेंट’ या पुस्तकाचा हा अनुवाद डॉ. गतिप्रिया विद्यासागर यांनी केला आहे. समाधान आणि असमाधान या दोन शब्दांमधला आणि वृत्तींमधलाही फरक समजावून सांगण्यापासून ते प्रत्यक्ष परिपूर्ण समाधानापर्यंत कसं जायचं तिथपर्यंत अनेक छोट्या-छोट्या गोष्टी बबाऊता यांनी सांगितल्या आहेत. ‘आपले काल्पनिक आदर्श आणि अपेक्षांवर नजर ठेवा’, ‘दुसऱ्यांच्या वागणुकीवरून आपली लायकी ठरवू नका’, ‘आपल्या नात्यामध्ये एक परिपूर्ण व्यक्ती बना’ असे वेगवेगळे कानमंत्र पुस्तकात आहेत.

साभार पोच

  •  नारळ लागवडीची पंचसूत्री समस्या आणि उपाय / कृषिविषयक / लेखक - डॉ. दिलीप नागवेकर, डॉ. विजय देसाई / चेतक बुक्‍स, पुणे (९८२२२८०४२४) / पृष्ठं - १७६ / मूल्य - १६० रुपये
  •  पाठ- कंबरदुखी आणि संपूर्ण उपचार / वैद्यकीय / लेखक - डॉ. मंगेश पानट / साकेत प्रकाशन, औरंगाबाद (०२४०- २३३२६९२) / पृष्ठं - १४४ / मूल्य - १५० रुपये
  •  छोट्यांसाठी अद्‌भुत गंमत / बालवाङ्‌मय / लेखिका - कमला कळके  (०२२-२५४२६६९९)/ उद्वेली बुक्‍स, ठाणे (पश्‍चिम) (०२२-२५८१०९६८) / पृष्ठं - ९२ / मूल्य - १०० रुपये
  •  स्तोत्र सुमनांजली (भाग ५)/ धार्मिक/ निरूपण - रंजना उन्हाळे  (०२०-२५४९५३९)/ आदिमाता प्रकाशन, पुणे (०२०-२५४५८४२७) / पृष्ठं - २२० / मूल्य - २५० रुपये
  •  नागपूरकर भोसल्यांची बखर/ ऐतिहासिक / संपादक - रा. रा. वामन दाजी ओक / वरदा प्रकाशन, पुणे (०२०-२५६५५६५४) / पृष्ठं - २१४ / मूल्य - २२० रुपये
  •  काळोखाची अवेळ / कवितासंग्रह / कवी - अशोक बागवे / संवेदना प्रकाशन, पुणे (९७६५५५९३२२) / पृष्ठं - ७८ / मूल्य - १०० रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com