स्वागत नव्या पुस्तकांचे

स्वागत नव्या पुस्तकांचे

समीक्षेचा रियाज
प्रकाशक - चेतक बुक्‍स, पुणे (९८२२२८०४२४) / पृष्ठं - २४०/ मूल्य - ३६० रुपये

गेली अनेक वर्षं पुस्तक परीक्षण करणाऱ्या डॉ. नीलिमा गुंडी यांचं हे पुस्तक. त्यांनी निवडक पन्नास परीक्षणांचं संकलन त्यात केलं आहे. नव्या, जुन्या आणि सगळ्याच प्रकारांतल्या पुस्तकांची परीक्षणं डॉ. गुंडी यांनी लिहिली. त्यांतलं वैविध्य या पुस्तकातून जाणवतं. ‘एका रानवेड्याची शोधयात्रा’, ‘झुंबर’, ‘समग्र बालकवी’ अशा अनेक पुस्तकांतलं सौंदर्य लेखिकेनं उलगडून दाखवलं आहे. अतिशय आस्थेनं आणि बारकाईनं त्यांनी या पुस्तकांचं परीक्षण केल्याचं जाणवतं.

कांगारूंच्या देशा...
प्रकाशक - संगीता मानकर  (०२०- ४१२०३०९०) / पृष्ठं - ९४ / मूल्य - १२५ रुपये

ऑस्ट्रेलिया हा खऱ्या अर्थानं विविधतेनं नटलेला देश. या देशाचं प्रवासवर्णन विश्‍वनाथ मानकर यांनी लिहिलं आहे. मेलबर्न, सिडनी, ब्ल्यू माउंटन अशा अनेक ठिकाणच्या सफरींचे अनुभव त्यांनी लिहिले आहेत. ऑपेरा हाउससारख्या सगळ्यांना माहीत असलेल्या ठिकाणापासून ज्युएल केव्ह्‌ज, मॅंड्युरिंग विअर धरण, बॅलेरेटची सोन्याची खाण, ॲपोस्टॉल्स अशा अनेक ठिकाणांचं त्यांनी वर्णन केलं आहे. ऑस्ट्रेलियातल्या ॲबोरिजनल्सविषयीही लिहिलं आहे. केवळ प्रवासवर्णन न करता तिथं आलेले अनुभव, वेगळी- रंजक माहिती अशा गोष्टींची जोड मानकर यांनी दिल्यामुळं पुस्तक वाचनीय झालं आहे.

अध्यात्म दर्पण
प्रकाशक - स्नेहल प्रकाशन, पुणे (०२०- २४४५०१७८) / पृष्ठं - ३०२/ मूल्य - ३२५ रुपये

डॉ. मधुसूदन बागडे यांनी लिहिलेलं हे पुस्तक. वेगवेगळ्या संतांच्या कार्याची माहिती, संतवाणी आणि एकूणच अध्यात्म या विषयावर त्यांनी लेखन केलं आहे. ज्ञानेश्‍वर महाराज, तुकाराम महाराज, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, रामदास स्वामी अशा संतांच्या जीवनावर, त्यांच्या कार्यावर त्यांनी प्रकाश टाकला आहे. या संतांच्या रचनांचेही अर्थ त्यांनी उलगडून दाखवले आहेत. संत म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, आत्मज्ञान कसं प्राप्त होतं आदी तात्त्विक विषयांची चर्चाही त्यांनी केली आहे.

स्वानंद साम्राज्य
प्रकाशक - सुपर्ण प्रकाशन, पुणे (९३२५४३८३७२) / पृष्ठं - १६४ / मूल्य - २३० रुपये

धर्मानंद भोसरेकर यांनी केवळ आध्यात्मिक दृष्टिकोनातून लिहिलेलं हे वेगळ्या प्रकारचं आत्मकथन आहे. भोसरेकर यांनी या क्षेत्राशी संबंधित वेगवेगळ्या व्यक्तींच्या भेटी घेतल्या, अनेक मठांना भेटी दिल्या, त्यांनी स्वत-ही आध्यात्मिक कार्य केलं. त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे काही अनुभवही आले. या सर्व गोष्टींवर त्यांनी या पुस्तकात
लिहिलं आहे.

करिअर कन्फ्युजन की हॅप्पी जर्नी?
प्रकाशक - एकवीरा प्रकाशन, पुणे (८८०५९८१६७३) / पृष्ठं - २१६/ मूल्य - १८० रुपये

कोणतंही करिअर शोधणं, ते निवडणं आणि प्रत्यक्ष त्यादृष्टीनं प्रवास करणं हा भाग विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी अतिशय कष्टाचा. डॉ. श्रीराम गीत यांनी हाच भाग सोपा करून दाखवला आहे. दहावीपासून अगदी डॉक्‍टरेटपर्यंतचे किती तरी टप्पे त्यांनी वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून उलगडून दाखवले आहेत. स्व-अभ्यास, डिजिटल युग, परदेशी करिअर, प्राधान्य कशाला द्यायचं, पॅकेज आणि पगार, सध्या आपण कुठं आहोत ते कसं ओळखायचं, शिक्षक आणि पालक यांच्यातला सहजसंवाद, पदवीनंतर काय अशा अनेक मुद्द्यांवर त्यांनी मार्गदर्शन केलं आहे. करिअरबाबतचा गोंधळ कमी करणं आणि त्यादृष्टीनं उपयुक्त माहिती देणं अशा दोन्ही गोष्टी त्यांनी सहजपणे केल्या आहेत.

मिलेट - जादुई धान्य
प्रकाशक - वन्यजीव विभाग नाशिक, कळसूबाई- हरिश्‍चंद्रगड वन्यजीव विभाग, अकोले, जि. नगर / पृष्ठं - २०/ मूल्य - १०० रुपये

कळसूबाई- हरिश्‍चंद्रगड परिसरात पिकवल्या जाणाऱ्या भरडधान्यांच्या (मिलेट्‌स) प्रजातींविषयी नीलिमा जोरवर (ranvanvala@gmail.com) यांनी लिहिलेली ही पुस्तिका. राळा, बार्टी/भादली, बाजरी, ज्वारी, नाचणी, वरई यांच्याविषयी त्यांनी माहिती दिली आहे. या धान्यांची वैशिष्ट्यं, त्यांची उपयुक्तता, त्यांतून होणारं पोषण, त्यांच्यातली सूक्ष्म पोषकद्रव्यं, जीवनसत्त्वं आदी बाबींविषयी त्यांनी लिहिलं आहे. आरोग्य सुरक्षा, जनावरांच्या चाऱ्याची सुरक्षा, शेतकऱ्यांच्या उपजीविकेची सुरक्षा आदी गोष्टींचाही त्यांनी ऊहापोह केला आहे. मिलेट्‌सचा वापर करून तयार करायच्या काही पाककृतीही पुस्तकात आहेत.

शिका वक्तृत्व मोदी स्टाइलने
प्रकाशक - विश्‍वकर्मा पब्लिकेशन्स, पुणे. (०२० - २०२६११५७) / पृष्ठं - १६८/ मूल्य - १९९ रुपये

वीरेंद्र कपूर यांच्या ‘स्पीकिंग द मोदी वे’ या पुस्तकाचा हा अनुवाद. अनघा देशपांडे यांनी तो केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तृत्वशैलीची उकल कपूर यांनी करून दाखवली आहे. मोदी यांची साध्य आणि साधन यांची अचूक जाण, स्वयंशिस्त आणि साधेपणा, श्रोत्यांना अनुसरून भाषणांत बदल करण्याची शैली, संकल्पना तर्कशुद्धतेनं मांडण्याची कला, खास शब्दकोश आदी वैशिष्ट्यं त्यांनी मांडली आहेत. ठिकठिकाणी उदाहरणंही आणि ठळक मुद्देही त्यांनी दिले आहेत.

श्रमिकांचा नेता भाई उद्धवराव
प्रकाशक - ग्रंथाली मुद्रण सुविधा केंद्र, मुंबई
(०२२- २४२१६०५०) / पृष्ठं - २३४/ मूल्य - २५० रुपये

शेतकरी कामगार पक्षाच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या उद्धवराव पाटील यांची विचारसंपदा संग्रहित स्वरूपात मांडणारं हे पुस्तक. उद्धवरावांनी शेकापला वैचारिक अधिष्ठान दिलं, शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांचा आयुष्यभर पाठपुरावा केला. त्यांच्या गुणवैशिष्ट्यांवर या पुस्तकात प्रकाश टाकण्यात आला आहे. उद्धवरावांनी लिहिलेले काही लेख, त्यांची काही गाजलेली भाषणं यांचा पुस्तकात समावेश आहे. त्यांनी आत्मकथन स्वरूपात लिहिलेला एक विस्तृत लेखही पुस्तकात आहे. याशिवाय प्रा. एन. डी. पाटील, मधुकर भावे, जगन फडणीस, डॉ. गोपाळराव देशमुख आदींनी उद्धवरावांविषयी मनोगत व्यक्त केलं आहे. काही बातम्या, शोकसंदेश आदींचाही पुस्तकात समावेश आहे. भारत गजेंद्रगडकर यांनी संपादन केलं आहे. व्ही. के. देशमुख आणि धनंजय पाटील यांनी संपादन साह्य केलं आहे.

गोष्ट एका करानाची
प्रकाशक - मेहता पब्लिशिंग हाउस, पुणे
(०२०- २४४७६९२४) / पृष्ठं - १६२ / मूल्य - १९५ रुपये

प्रशांत महासागरातल्या ‘आयलॅंड ऑफ द ब्ल्यू डॉल्फिन्स’ नावाच्या एका बेटावर घडलेली ही आगळीवेगळी कहाणी. एकेकाळी या बेटावर ‘इंडियन्स’ची वस्ती होती. ते एका जहाजात बसून पूर्वेकडं निघून गेले; पण कराना नावाची बारा-तेरा वर्षांची मुलगी तिथंच मागं राहिली. जवळजवळ १८ वर्षं ती या बेटावर एकटीच राहिली. अनेक संकटं येऊनही ती खचली नाही. तिच्या या सत्य कहाणीला कल्पित प्रसंगांची जोड देऊन स्कॉट ओडेल यांनी ही कादंबरी लिहिली आहे. ही कादंबरी म्हणजे आशावादाची, धडपडीची, नव्या शोधांची, जीवनेच्छेची कहाणी आहे. मैत्रेयी जोशी यांनी अनुवाद
केला आहे.

खेळ फाशांचा
प्रकाशक - काँटिनेंटल प्रकाशन, पुणे (०२०- २४३३७९८२) / पृष्ठं - १६२ / मूल्य - १७० रुपये

जयश्री कुलकर्णी यांनी लिहिलेल्या गूढ कथांचा हा संग्रह. हा कथाप्रकार सध्या कमी होत चालला असताना कुलकर्णी यांनी तो आणला आहे. या प्रकारच्या कथा लिहिणं हे एक आव्हान असतं, कारण वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवावं लागतं. जयश्री कुलकर्णी यांनी एखाद्या चित्रपटाच्या पटकथेसारखी मांडणी करून आणि नेमके तपशील पेरून ती कामगिरी साध्य केली आहे. मराठी कथाविश्‍वातला गूढ कथेचा प्रवासही त्यांनी या पुस्तकात उलगडून दाखवला आहे. एकूण दहा वेगवेगळ्या वातावरणातल्या कथांचा या संग्रहात समावेश आहे.

आजचा श्‍याम घडताना
प्रकाशक - व्यास क्रिएशन्स, नौपाडा, ठाणे (पश्‍चिम) (०२२- २५४४७०३८) / पृष्ठं - २६८/
मूल्य - २५० रुपये

साने गुरुजी यांच्या मातु-श्री यशोदा साने यांच्या स्मृतिशताब्दी वर्षानिमित्त तयार केलेलं हे पुस्तक. कालचा श्‍याम कसा घडला ते सांगणाऱ्या ‘श्‍यामची आई’ पुस्तकातले संपादित भाग या पुस्तकात आहेत आणि उद्याचा श्‍याम घडवण्यासाठी नक्की काय करायला पाहिजे, याविषयी महाराष्ट्रातल्या जाणकारांनी विचारमंथनही केलं आहे. उत्तम कांबळे, अच्युत गोडबोले, रेणू गावस्कर, डॉ. विजया वाड, संजय भास्कर जोशी, डॉ. विकास आमटे, डॉ. स्नेहलता देशमुख आदींनी विचार मांडले आहेत. आजचा श्‍याम कसा आहे याविषयी सिंधूताई सपकाळ, डॉ. संगीता बर्वे, किरण केंद्रे आदींनी मतं व्यक्त केली आहेत. डॉ. मुरलीधर गोडे,
श्री. वा. नेर्लेकर यांनी संपादन केलं आहे.

साभार पोच

  •  भाषिणी / गझल संग्रह / गझलकार - विद्याधर ब्रह्मे (९४२२०२२९१७)/ एकवीरा प्रकाशन, पुणे (९८२२८८२५०९) / पृष्ठं - ४८ / मूल्य - ६० रुपये
  •  उंदीरमामा गेले जत्रेला / बालवाङ्‌मय / लेखिका - सरिता वैद्य / सुरेश एजन्सी, पुणे (०२०- २४४७०७९०) / पृष्ठं - ४४ / मूल्य - ६० रुपये
  •  श्‍वासातले तराणे / कविता संग्रह / कवयित्री - संगीता म्हसकर / दिलीपराज प्रकाशन, पुणे (०२०- २४४८३९९५) / पृष्ठं - ७० / मूल्य - ८० रुपये
  •  पाणीबाणी / पाणी या विषयावरील विविध कवितांचा संग्रह / संपादन - प्रभाकर साळेगावकर / ग्रंथाली, मुंबई (०२२- २४२१६०५०), यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई (०२२- २२०४५४६०) / पृष्ठं - १४६ / मूल्य - १६० रुपये
  •  चिकन सूप फॉर द सोल - फॅमिली मॅटर्स भाग १ आणि २ / कौटुंबिक जिव्हाळ्याच्या कथा / संपादन आणि संकलन - जॅक कॅनफिल्ड, मार्क व्हिक्‍टर हॅन्सन, ॲमी न्यूयॉर्क, सुसान एम. / अनुवाद - रेवती सप्रे/ मेहता पब्लिशिंग हाउस, पुणे (०२०- २४४७६९२४) / पृष्ठं - १९०, १६८ (अनुक्रमे) / मूल्य - २०० रुपये (प्रत्येकी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com