स्वागत नव्या पुस्तकांचे

स्वागत नव्या पुस्तकांचे

बाजिंद
प्रकाशक - मेहता बुक सेलर्स, कोल्हापूर (mehtabooksellers@gmail.com) / पृष्ठं - १५८/ मूल्य - १८० रुपये

अगदी वेगळ्या विषयावरची, खिळवून ठेवणारी ही ऐतिहासिक रहस्यकथा. स्वराज्यप्रेम, बुद्धिचातुर्य, युद्धांचा थरार या सगळ्याला रहस्याची, भावनांची जोड देऊन गुंफलेली ही कादंबरी. खंडोजी, सावित्री, वस्तादकाका, सखाराम, बाजिंद अशा वेगवेगळ्या पात्रांचा वापर करून, कल्पनांची जोड देऊन पैलवान गणेश मानुगडे यांनी ती लिहिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे गुप्तहेर बहिर्जी नाईक आणि एकूणच स्वराज्याविषयीचा आदर आणखी वाढेल, अशा पद्धतीनं मानुगडे यांनी लिहिलेली ही कादंबरी. वेगवेगळ्या कथा एकमेकांत मिसळत आणि ‘फ्लॅशबॅक’ तंत्राचा वापर करत त्यांनी तिची रचनाही रोचक केली आहे. थरारक चित्रण, धक्के आणि नाट्यमय घटनांमुळं वाचकांची उत्कंठा शेवटपर्यंत कायम राहते.

चंदनाची झाडं
प्रकाशक - पद्मगंधा प्रकाशन, पुणे (७३५०८३९१७६) / पृष्ठं - १०४ / मूल्य - ८० रुपये.

सेवाभावी वृत्तीनं काम करणाऱ्या लोकांना समजून घेण्याचा प्रयत्न लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) प्रफुल्ल जोशी यांनी या पुस्तकात केला आहे. रुग्णांसाठी काम करणारे अरुणचंद्र कोंडेजकर, कारगिलमधल्या जवानांसाठी काम करणाऱ्या-सहली घेऊन जाणाऱ्या अनुराधा प्रभुदेसाई, पाण्याच्या प्रदूषणाशी ‘दोन हात’ करणारे शैलेंद्र पटेल, अनाथालयांतून बाहेर पडणाऱ्या मुला-मुलींसाठी काम करणारे सागर रेड्डी, विजयाताई लवाटे यांचा वारसा चालवणारे ‘मानव्य’ संस्थेचे शिरीष आणि उज्ज्वला लवाटे, सामान गोळा करून योग्य व्यक्तींपर्यंत त्या पोचवणाऱ्या ज्योती सचदे अशा वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वांचा परिचय जोशी यांनी करून दिला आहे. या लोकांच्या आगळ्यावेगळ्या कामांबाबत सर्वसामान्यांच्या मनात उभ्या राहणाऱ्या शंकांचं निरसन यांनी योग्य पद्धतीनं करून घेतलं आहे.

मना दर्पणा
प्रकाशक - चपराक प्रकाशन, पुणे (०२०-२४४६०९०९) / पृष्ठं - ९६/ मूल्य - १०० रुपये.

प्रल्हाद दुधाळ यांनी विविध विषयांवर लिहिलेल्या लेखांचं हे संकलन. अतिविचार करण्याची सवय, चिडचिड, धीर धरणं, कौतुकाची भूक, खरं सुख अशा वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी चिंतन केलं आहे. नेहमीच्याच घटनांकडं, प्रसंगांकडं वेगळ्या दृष्टिकोनातून पाहत त्यांनी वेगळे विचार मांडले आहेत. स्वत-मध्ये सकारात्मक बदल करण्याच्या दृष्टीनं उपयुक्त लेख त्यांनी लिहिले आहेत.

जैविध्य
प्रकाशक - ऊर्जा प्रकाशन, पुणे (०२०-२५४३२३७४) / पृष्ठं - ३६ / मूल्य - ४० रुपये.

जैवविविधता या विषयावर संवादात्मक पद्धतीनं लिहिलेल्या माहितीचं हे संकलन. विलास गोगटे यांनी ते लिहिलं आहे. अगदी अवघड असा हा विषय गोगटे यांनी आजोबा आणि त्यांची नात यांच्यातल्या संवादाच्या रुपातून लिहिला आहे आणि जैवविविधतेशी संबंधित वेगवेगळे मुद्दे समजावून सांगितले आहेत.

कथा पांडुरंगाच्या
प्रकाशक - उत्कर्ष प्रकाशन, पुणे (०२०-२५५३७९५८) / पृष्ठं - १२४ / मूल्य - १२५ रुपये

पंढरपूरच्या विठ्ठलाशी संबंधित नवी माहिती, नवे विचार देणारं हे पुस्तक वा. ल. मंजूळ यांनी लिहिलं आहे. हस्तलिखितांतून सापडलेलं विठ्ठलसहस्रनाम आणि इतर माहिती, अविंध संतांची विठ्ठलभक्ती, विठ्ठल मंदिरातली धार्मिक स्थळं आणि त्यांचा दुर्लक्षित इतिहास, पंढरपूरचा वास्तुवारसा, विठ्ठलावर संशोधन करणारे परकी संशोधक, विठ्ठलाव्यतिरिक्तचं पंढरपूर अशा वेगवेगळ्या विषयांवर मंजूळ यांनी लिहिलं आहे. हस्तलिखितांतून आढळणारी संतचरित्रं, वेगवेगळ्या राज्यांतला विठ्ठल, कृष्णाचा विठ्ठल कसा झाला, विठ्ठल- पांडुरंग याविषयी माहिती देणाऱ्या हस्तलिखितांची सूची अशी माहितीही पुस्तकांत आहे.

यात्रा निसर्गाची व धार्मिक स्थळांची (भाग ४)
प्रकाशक - आदिमाता प्रकाशन, पुणे (०२०-२५४५८४२७) / पृष्ठं - १९६ / मूल्य - १७५ रुपये.

रंजना उन्हाळे यांनी वेगवेगळ्या धार्मिक, पर्यटनस्थळांना भेट देऊन लिहिलेली ही प्रवासवर्णनं. अगदी पुण्याजवळच्या बनेश्‍वरपासून कच्छच्या रणापर्यंत अनेक ठिकाणी त्यांनी केलेल्या मुशाफिरीचं वर्णन या पुस्तकात केलं आहे. त्या त्या ठिकाणी नक्की काय बघायचं, कसं जायचं, तिथली वैशिष्ट्यं वगैरे सगळ्या गोष्टी उन्हाळे यांनी दिल्या आहेत. कारवार, तारकर्ली, अष्टविनायक, हंपी, गया, पंढरपूर अशा वेगवेगळ्या ठिकाणांविषयी त्यांनी लिहिलं आहे. ठिकाणांची माहिती मुद्देसूद, नेमकी असल्यामुळं
ती उपयुक्त ठरेल.

पुनित
प्रकाशक - ग्रंथाली मुद्रण सुविधा केंद्र, मुंबई (०२२-२४२१६०५०) / पृष्ठं - ११० / मूल्य - १२५ रुपये

पी. ए. आत्तार यांचा हा कथासंग्रह. स्त्रीच्या जीवनाचे वेगवेगळे भावबंध त्यांनी या संग्रहात उलगडून दाखवले आहेत. शाळेत शिक्षिका आणि समुपदेशक या नात्यानं काम करताना त्यांना स्त्रियांची दु-खं, समस्या, व्यथा जवळून बघायला मिळाल्या. त्यांतून त्यांच्या कथा फुलत गेल्या आहेत. स्त्रीची वेगवेगळी रूपं दाखवणाऱ्या ‘पोरकी’, ‘पांगारा’, ‘देवतारी’, ‘देवदूत’ अशा वेगवेगळ्या २१ कथा पुस्तकात समाविष्ट आहेत.

मराठी गझल - प्रवाह आणि प्रवृत्ती
प्रकाशक - शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर (०२४२२-२१०४४४) / पृष्ठं - २०० / मूल्य - २६० रुपये.

डॉ. अविनाश सांगोलेकर यांनी मराठी गझलविषयी लिहिलेल्या लेखांचं हे संकलन. मराठी गझलेविषयी प्रसिद्ध झालेल्या विविध समीक्षालेखांचा समावेश त्यांनी या पुस्तकात केला आहे. मराठी गझलेच्या उगमापासून अगदी नव्या गझलकारांच्या पुस्तकांपर्यंत अनेक गोष्टींची मीमांसा त्यांच्या पुस्तकात येते. माधव ज्युलियन, सुरेश भट यांच्यापासून प्रसाद कुलकर्णी, हृदय चक्रधर आदी नव्या गझलकारांपर्यंतचा मागोवाही या पुस्तकातून येतो. वेगवेगळी उदाहरणं सांगत त्यांनी गझलेचं सौंदर्य उलगडून दाखवलं आहे.

करूया मैत्री निसर्गाशी
प्रकाशक - रिनायसन्स पब्लिकेशन, पुणे (०२०-२४४५९३६९) / पृष्ठं - १०४ / मूल्य - १७० रुपये

निसर्गाशी संबंधित वेगवेगळ्या गोष्टी लहान मुलांना समजावून सांगण्यासाठी सुजाता लेले यांनी लिहिलेलं हे पुस्तक. सोपेपणानं माहिती सांगण्याची पद्धत, नेमकी माहिती, पूरक छायाचित्रं यांमुळं पुस्तक वेधक झालं आहे. निसर्ग कसा अनुभवायचा हे त्यांनी सुरवातीलाच सांगितलं आहे. त्यानंतर ११ वेगवेगळ्या सचित्र कहाण्यांतून त्यांनी निसर्गाची माहिती सांगितली आहे. वृक्ष वल्लरी, हत्ती, वाघ-सिंह-चित्ते-बिबटे, मांसाहारी प्राणी, चलचर आणि उभयचर, शाकाहारी प्राणी, बिळातले प्राणी, जंगलातले पक्षी, छोट्या आकाराचे पक्षी, पाळीव पक्षी आणि प्राणी; तसंच फुलपाखरं-मधमाश्‍या इत्यादींशी संबंधित माहिती त्यांनी वेगवेगळ्या प्रकरणांतून
सांगितली आहे.

करंट ग्राफ वार्षिकी २०१७
प्रकाशक - राष्ट्रचेतना प्रकाशन, मुंबई (९३२३१५९०१५) / पृष्ठं - २३२/ मूल्य - १५० रुपये.

स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी चालू घडामोडींचं ज्ञान नेमक्‍या स्वरूपात उपलब्ध होणं खूप आवश्‍यक असतं. त्याच दृष्टीनं स्टील फ्रेम सिव्हिल्स इंडिया एज्युकेशन बुक्‍सनं या वार्षिकांकाची निर्मिती केली आहे. फक्त माहितीचा फापटपसारा न मांडता योग्य वर्गीकरण करून मांडणी करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी, राष्ट्रीय घडामोडी, आर्थिक घडामोडी, राज्यविशेष, विविध पुरस्कार, योजना आणि मोहिमा, नियुक्‍त्या, संरक्षण, पुस्तकं, चर्चेतल्या व्यक्ती अशा वेगवेगळ्या विभागांमध्ये मुद्देसूद माहिती देण्यात आली आहे. योग्य ठिकाणी मुद्दे, टेबल्स, आकडेवारी आदी गोष्टींचाही वापर करण्यात आला आहे.

अपंगांसाठी मार्गदर्शिका-शासनाचे निर्णय
प्रकाशक - नवल फाउंडेशन, पुणे (९८२२९१९२७७) / पृष्ठं - १७२ / मूल्य - १६० रुपये

अपंगांशी संबंधित विविध शासन निर्णयांची माहिती देणारं हे पुस्तक ॲड. रामदास म्हात्रे यांनी लिहिलं आहे. अपंगांसाठीचे नियम, त्यांच्यासाठीच्या योजना, त्यांच्यासाठीच्या आवश्‍यक बाबी अशा सगळ्या गोष्टींची माहिती त्यांनी तपशिलानं आणि नेमकेपणानं दिली आहे. अंपंगासाठीच्या राखीव जागा, शिक्षणाशी संबंधित सुविधा, प्रवास सवलत, शिष्यवृत्त्या, वेगवेगळ्या योजनांमधून मिळू शकणारं निवृत्तिवेतन, आरोग्य योजना, खासगी क्षेत्रांत मिळू शकणाऱ्या रोजगाराच्या संधी, कर्ज योजना अशा विविध गोष्टी पुस्तकात आहेत. या क्षेत्रात काम करणाऱ्या वेगवेगळ्या संस्थांच्या माहिती, वेगवेगळे अर्ज, माहितीचे तक्ते, संपर्क कुणाशी साधायचा आदी सर्व उपयुक्त बाबींचा समावेश पुस्तकात करण्यात आला आहे.

शोध श्रीलंकेचा
प्रकाशक - परममित्र पब्लिकेशन्स, नौपाडा, ठाणे (पश्‍चिम) (९९६९४९६६३४) / पृष्ठं - ११८ / मूल्य - १५० रुपये.

श्रीलंकेची वेगळी ओळख करून देणारं हे पुस्तक डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी लिहिलं आहे. श्रीलंकेचा इतिहास, रामायणाच्या तिथं असलेल्या खुणा, बौद्ध राजवटीचा उदय, सिंहली-तमीळ संघर्ष, एलटीटीईचा उदय आणि अस्त आणि आजची श्रीलंका अशा सगळ्या गोष्टींचा वेध त्यांनी घेतला आहे. प्रवासवर्णन, ताजे संदर्भ अशा गोष्टींचीही जोड दिल्यामुळं पुस्तक वाचनीय झालं आहे.

साभार पोच

  •  बिनभिंतीची शाळा/ कुमारांशी संबंधित कथासंग्रह/लेखिका - लता गुठे /भरारी प्रकाशन, मुंबई (९८७०६१७१२४) / पृष्ठं - ४८ / मूल्य - ६० रुपये
  •  म्हैसपालन / पशुपालनविषयक माहिती / लेखिका - सीमा महाजन / चेतक बुक्‍स, पुणे (९८२२८०४२४) / पृष्ठं - १०४ / मूल्य - १०० रुपये
  •  मथितार्थ / कवितासंग्रह / कवी - श्रीपाद भालचंद्र जोशी / ग्रंथाली, मुंबई (०२२-२४२१६०५०) / पृष्ठं - ११८/ मूल्य - १२५ रुपये
  •  सुविचारमाला / संकलक - विजय रेडकर / मनोविकास प्रकाशन, पुणे (०२०-६५२६२९५०) / पृष्ठं - ५६ / मूल्य - ४० रुपये
  •  चैतन्य गुरू गोरक्षनाथ / आध्यात्मिक / लेखक - जयराज साळगावकर / परममित्र पब्लिकेशन्स, नौपाडा, ठाणे (पश्‍चिम) (९९६९४९६६३४) / पृष्ठं - ३२८ / मूल्य - ३५० रुपये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com