स्वागत नव्या पुस्तकांचे

स्वागत नव्या पुस्तकांचे

श्रीकृष्ण एक अभ्यास
प्रकाशक - परममित्र पब्लिकेशन्स, नौपाडा, ठाणे (पश्‍चिम) (९९६९४९६६३४/ पृष्ठं - २२०/ मूल्य - २५० रुपये

श्रीकृष्ण हा देव आणि अनेकरंगी व्यक्तिमत्त्व. त्याचे विविध पैलू उलगडून दाखवणारं, त्याच्याविषयी चिंतन करणारं हे पुस्तक. पांडुरंगशास्त्री आठवले, धनश्री लेले, डॉ. यशवंत पाठक, चंद्रकांत जोशी, डॉ. कालिंदी नवाथे, डॉ. प्रज्ञा आपटे, डॉ. यशवंत साधू आदी विविध लेखकांनी श्रीकृष्णावर लिहिलेल्या लेखांचं संकलन त्यात आहे. केवळ आध्यात्मिक दृष्टीनं विचार न करता तार्किक दृष्टिकोनातून श्रीकृष्णाला समजून घेण्याचा हा प्रयत्न आहे. देविदास पोटे यांनी संकलन केलं आहे.

जंगल रुजवणारा पायेंग आणिक काही माणसं
प्रकाशक - ऊर्जा प्रकाशन, पुणे (०२०-२५४३२३७४) / पृष्ठं - ७२/ मूल्य - ८० रुपये

झाडं लावत पर्यावरणाचं रक्षण करणाऱ्या अजब माणसांविषयी माहिती देणारं हे पुस्तक. आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीच्या काठी चाळीस वर्षं प्रयत्न करून तब्बल तेराशे एकरांचं जंगल तयार करणाऱ्या यादव पायेंग नावाच्या एका अवलियाची माहिती या पुस्तकात आहे. याचबरोबर सुमारे तीन लाख झाडं लावणारे मरिमुथू योगनाथन, अमेरिकेतले जॉन ॲपलसीड, केनियातल्या वांगारी मथाई, सागरेश्‍वरच्या अभयारण्यासाठी खपणारे धो. म. मोहिते, पुण्यातल्या ‘स्मृतिवन’चे साथीदार, रघुनाथ ढोले, थिमक्का अशा वेगवेगळ्या हरितप्रेमी व्यक्तींचीही माहिती पुस्तकात वाचायला मिळते.

खानदेशाची सांगीतिक वाटचाल
प्रकाशक - अथर्व पब्लिकेशन्स, धुळे (९४०५२०६२३०) / पृष्ठं - १६०/ मूल्य - २५० रुपये

खानदेशाला मोठी सांगीतिक पार्श्‍वभूमी आहे. संगीता म्हसकर यांनी या भागातल्या संगीतविषयक वाटचालीचा प्रवास शब्दबद्ध केला आहे. लोकसंगीत आणि शास्त्रीय संगीत अशा दोन्ही प्रवाहांचा विचार त्यांनी केला आहे. अगदी १८५० पूर्वीच्या काळापासून ते १८५० ते २००० या कालखंडांचा विचार त्यांनी केला आहे. या क्षेत्राचा आढावा घेताना वेगवेगळ्या कलाकारांच्या कामगिरीचीही नोंद त्यांनी घेतली आहे.

शोध आणि बोध
प्रकाशक - मनोविकास प्रकाशन, पुणे (०२०-६५२६२९५०) / पृष्ठं - ९६ / मूल्य - ९९ रुपये

अनेक शास्त्रज्ञ आणि त्यांनी लावलेले शोध यांच्यापलीकडची माहिती देणारं हे पुस्तक हेमंत लागवणकर यांनी लिहिलं आहे. या शोधांमागची पार्श्‍वभूमी, संशोधन प्रक्रिया, रंजक गोष्टी आदींचा समावेश या पुस्तकात आहे. त्या त्या शोधाशी संबंधित प्रयोग, प्रकल्प आणि उपक्रम याही गोष्टींची जोड त्यांनी दिली आहे. किशोरवयातल्या विज्ञानप्रेमी मुलांसाठी हे पुस्तक नक्कीच उपयोगी पडेल. जोनास साल्क, जॉर्ज लेक्‍लांशे, अलेक्‍झांडर फ्लेमिंग, सोफी जर्मेन, रॉबर्ट हूक, ब्लेझ पास्कल अशा अनेक शास्त्रज्ञांबाबतची रोचक माहिती लागवणकर
यांनी दिली आहे.

अक्षर ऐवज
प्रकाशक - चपराक प्रकाशन, पुणे (७०५७२९२०९२) / पृष्ठं - ११२/ मूल्य - १०० रुपये

घनश्‍याम पाटील यांनी लिहिलेल्या विविध पुस्तक परीक्षणांचं हे संकलन. ‘वडिलांच्या सेवेसी’ या शिरीष पै यांच्या पुस्तकापासून ‘लायब्ररी फ्रेंड’ या सागर कळसाईत या तरुणाच्या कादंबरीपर्यंत अनेक पुस्तकांवर त्यांनी लिहिलं आहे. पुस्तकांमधलं सौंदर्य उलगडून दाखवण्याचं काम त्यांनी केलं आहे. नावाजलेल्या साहित्यिकांच्या पुस्तकांबरोबरच अनेक नवीन, फारशा चर्चेत नसलेल्या लेखकांच्या पुस्तकांवरही त्यांनी लेखन केलं आहे.

आर्त माझ्या बहु पोटी
प्रकाशक - ग्रंथाली, मुंबई (०२२-२४२१६०५०) / पृष्ठं - ६२२/ मूल्य - ६५० रुपये

आपल्या गावावर, मातीवर विलक्षण प्रेम करणाऱ्या मनस्वी नायकाचं चित्रण करणारी ही कादंबरी विजय माळी यांनी लिहिली आहे. वेगवेगळे प्रश्‍न उभे करत, समकालीन कौटुंबिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक पर्यावरणाचा वेध घेत, सूक्ष्म निरीक्षणं मांडणारी ही कादंबरी. अनेक व्यक्तिरेखा, प्रश्‍न, संदर्भ, लेखकानं केलेलं चिंतन, वेगळी शैली ही या कादंबरीची वैशिष्ट्यं.

तुझंच तुला घडायचंय
प्रकाशक - काँटिनेंटल प्रकाशन, पुणे (०२०-२४३३७९८२) / पृष्ठं - १९६ / मूल्य - १०० रुपये

उषा अकोलकर या कुटुंबवत्सल लेखिकेनं लिहिलेल्या विविध आत्मपर लेखांचं हे संकलन. स्त्री किती सामर्थ्यशील, चिंतनशील असते हे दाखवणारं हे लेखन. पहिला पगार, एकटीनं केलेला पहिला प्रवास, मुलांचा अभ्यास, नैराश्‍यावर केलेली मात, मुलांची दहावी, पालकत्वाचे प्रयोग अशा वेगवेगळ्या गोष्टींवर अकोलकर यांनी लेखन केलं आहे. आठवणींबरोबरच स्वत-ची निरीक्षणं, मतं, विचारही त्यांनी मांडले आहेत. त्यांच्या काही कवितांचाही पुस्तकात समावेश आहे. या पुस्तकाचं काम चालू असतानाच त्यांचं निधन झालं. त्यामुळे त्यांच्याही आठवणी सांगणारे त्यांच्या सुहृदांचे काही लेख पुस्तकात समाविष्ट आहेत.

लोभस- काही गाव- काही माणसं
प्रकाशक - राजहंस प्रकाशन, पुणे (०२०-२४४७३४५९) / पृष्ठं - १७६ / मूल्य - २०० रुपये

साहित्य समीक्षक सुधीर रसाळ यांनी लिहिलेला हा स्थळ-व्यक्तिचित्रसंग्रह. प्रामुख्यानं मराठवाड्यातली ठिकाणं आणि व्यक्तींशी संबंधित हे लेखन आहे. औरंगाबादवर ‘महाराष्ट्रातली दिल्ली’ असा लेख त्यांनी लिहिला आहे. याशिवाय वडील न. मा. कुलकर्णी, साहित्यिक भगवंतराव देशमुख, शिक्षक म. भि. चिटणीस, पत्रकार अनंत भालेराव, समीक्षक वा. ल. कुलकर्णी, न्या. नरेंद्र चपळगावकर, प्रा. गो. मा. पवार आदींवरही रसाळ यांनी लिहिलं आहे. त्या त्या ठिकाणांविषयी किंवा व्यक्तींविषयी लिहिताना केवळ आठवणी न देता किंवा नुसती ओळख करून न देता रसाळ यांनी सूक्ष्म निरीक्षणंही नोंदवली आहेत.

द्विदल
प्रकाशक - मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे
(०२०-२४४७६९२४) / पृष्ठं - १३८ / मूल्य - १७० रुपये

डॉ. बाळ फोंडके यांच्या विज्ञानकथांचा हा संग्रह. विज्ञान, तंत्रज्ञान, रहस्य अशा सगळ्या गोष्टींचा समावेश असणाऱ्या या कथा वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतात. पोलिसी चातुर्य आणि विज्ञान यांच्या मिश्रणातून घटनांची उकल करणाऱ्या या कथा. पोलिस अधिकारी अमृतराव मोहिते आणि वैज्ञानिक डॉ. कौशिक यांची जोडी तयार करून डॉ. फोंडके यांनी अशा प्रकारच्या आणखीही कथा यापूर्वी लिहिल्या आहेत. त्याच मालिकेचा हा पुढचा भाग. ‘नार्सिसस’ आणि ‘कोव्हेलंड बाँड’ या दोन थरारक कथांचा समावेश त्यांनी या पुस्तकात
केला आहे.

वाट खाच-खळग्याची
प्रकाशक - निर्मल प्रकाशन, नांदेड (९४२२८७०३९३) / पृष्ठं - १७६ / मूल्य - २५० रुपये

व्ही. पी. ढवळे यांचं हे आत्मकथन. नांदेड जिल्ह्यातल्या तत्कालीन कंधार तालुक्‍यातल्या डोंगरगावात जन्म झालेल्या ढवळे यांचं लहानपण अतिशय गरिबीत गेलं. सामाजिक भेदांमुळं लहानपणी अनेक चटकेही त्यांना सहन करावे लागले. घरात शिक्षणाचं वारंही नव्हतं. मात्र, जिद्दीनं त्यांनी वाटचाल चालू ठेवली. शिक्षण घेऊन समाजकल्याण विभागात विस्तार अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी अशा पदांवर काम करत त्यांनी इतरांनाही उभं करण्याचं काम केलं. अतिशय सहजपणे आणि प्रांजळपणे ढवळे यांनी आपले अनुभव लिहिले आहेत. नेपाळ, श्रीलंका आणि भारतातल्या भीम-बुद्ध दर्शनाच्या सहलींवरही त्यांनी लिहिलं आहे.

लाखांतले एक आजार
प्रकाशक - स्नेहल प्रकाशन, पुणे (०२०-२४४५०१७८) / पृष्ठं - १७४ / मूल्य - २०० रुपये

दुर्मिळ आजारांबद्दल अनेकांना कुतूहल असतं आणि त्यांच्याभोवती गूढतेचं वलयही असतं. बहुतांश वेळा जनुकीय दोषांमुळं होणाऱ्या या दुर्मिळ आजारांविषयी डॉ. अविनाश भोंडवे यांनी लिहिलेलं हे पुस्तक. बालपणीच वृद्धत्वाचा शाप देणारा ‘प्रोजेरिया’, पुरुषांच्या पोटात बाळ असण्याचा ‘फिटस इन फेटू’, अंगभर गाठी येणारा आणि वेदना देशारा ‘डर्कम डिसीज’, निळ्या रंगासाठी कारणीभूत असलेला ‘ब्ल्यू फ्युगेट्‌स’, विदुषकी चाळे करायला लावणारा ‘जंपिंग फ्रेंजमन ऑफ मेन’ आदी विविध आजारांविषयी त्यांनी माहिती दिली आहे. त्या-त्या आजारामागची कारणं, उद्‌भवणारे दोष, परिणाम, उपचार अशा गोष्टींबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

शिंपल्यातले मोती
प्रकाशक - यशोदीप पब्लिकेशन्स, पुणे (९८५०८८४१७५) / पृष्ठं - ८० / मूल्य - १०० रुपये

पुणे जिल्ह्यातल्या वढू खुर्द (ता. हवेली) या गावातल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत ‘वाचनझोपडी’ आणि इतर उपक्रम राबवण्यात आले. त्यातून मुलांचं वाचन वाढलं आणि ती मुलं लिहू लागली. या शाळेतल्या मुलांनीच लिहिलेल्या कथांचा समावेश असलेलं हे पुस्तक. दुसरी ते सातवी या इयत्तेतल्या मुलांनी लिहिलेल्या या कथांतून त्यांची निरीक्षणं, त्यांचं अनुभवविश्‍व, त्यांचे विचार या गोष्टी समोर येतात. छोट्या छोट्या गोष्टींतून काय सार घेता येतं, हेही मुलांनी सांगितलं आहे. सचिन बेंडभर यांनी संपादन केलं आहे.

साभार पोच

  •     रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया कृतज्ञ कधी होणार? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो चलनी नोटांवर कधी येणार?/ चर्चात्मक / लेखक, प्रकाशक - सचिन किरत, पुणे (९०४९४८९२७४) / पृष्ठं - ४६ / मूल्य - ४० रुपये    
  •      जोडाक्षरसहित वाचनविकास, जोडाक्षरविरहित वाचनविकास / शब्दसंग्रह, कविता  / लेखक - ब. गि. पाटील, कवी - अनंत भावे/ मनोविकास प्रकाशन, पुणे (०२०-६५२६२९५०) / पृष्ठं - ५६ (प्रत्येकी) / मूल्य - ५० रुपये (प्रत्येकी)
  •      संसार जाला सफळ / आध्यात्मिक / लेखिका - मीरा जोशी / स्नेहल प्रकाशन, पुणे (०२०-२४४५०१७८) / पृष्ठं - १९२ / मूल्य - १५० रुपये
  •      काव्यलहरी / वेगवेगळ्या कवींच्या कवितांचा संग्रह / संकलन - डॉ. अरविंद नेरकर/ श्रद्धा प्रकाशन, पुणे (९०११०२४१८४) / पृष्ठं - १३६ / मूल्य - १७५ रुपये
  •      डाळिंब लागवड / कृषिविषयक / लेखिका - सीमा महाजन / चेतक बुक्‍स, पुणे (९८२२२८०४२४) / पृष्ठं - १४४ / मूल्य - १४० रुपये
  •      आभाळाचा फळा / बालकविता / लेखक - एकनाथ आव्हाड (९८२१७७७९६७) / जे. के. मीडिया, वांद्रे (पश्‍चिम), मुंबई (९७६९१४१०७४) / पृष्ठं - ४० / मूल्य - १०० रुपये
  •      नित्यानंद / चर्चात्मक / लेखक - सागर ननावरे (९६६५२०२६२०) / अनाहत प्रकाशन, पुणे (०२०-२४४७०१५९)/ पृष्ठं - ८८ / मूल्य - १०० रुपये
  •     चला वाचूया गोष्टी / बालसाहित्य / लेखक - श्रीकृष्ण पुरंदरे (९७६७९०२३८५) / संस्कृती प्रकाशन, पुणे (०२०-२४४९७३४३)/ पृष्ठं - ८८ / मूल्य - ७५ रुपये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com