स्वागत नव्या पुस्तकांचे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 मे 2017

वेदना
प्रकाशक - पुणे विद्यार्थिगृह प्रकाशन, पुणे / पृष्ठं - १५२ / मूल्य - २५० रुपये

वेदना
प्रकाशक - पुणे विद्यार्थिगृह प्रकाशन, पुणे / पृष्ठं - १५२ / मूल्य - २५० रुपये

दैनंदिन जीवनातल्या किरकोळ वेदनांपासून दीर्घकालीन आजारांमुळं सहन कराव्या लागणाऱ्या तीव्र वेदनांपर्यंत अनेक वेदना आपल्याला सहन कराव्या लागतात. वेदना या एकाच गोष्टीचे अनेक पैलू मांडण्याचा प्रयत्न डॉ. म. ग. गोगटे यांनी या पुस्तकात केला आहे. वेदनानिर्मिती आणि निर्मितीबिंदूपासून वेदनावहनाची मेंदूपर्यंतची प्रक्रिया त्यांनी दिली आहे. क्‍लिष्टपणा टाळून ही सगळी गुंतागुंतीची माहिती सोपेपणानं देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. वेगवेगळी औषधं, त्यांचे दुष्परिणाम, भौतिकोपचारांपासून इतर पर्यायी किंवा पूरक उपायांबाबतही त्यांनी माहिती दिली आहे. बालवयातल्या वेदना, डोकेदुखी, कर्करोगातल्या वेदना अशा गोष्टींबाबतही त्यांनी ऊहापोह केला आहे.

एका इनामदाराची संघर्षयात्रा
प्रकाशक - कादंबरी देशमुख, सातारा (९४०५५४२४५५) / पृष्ठं - ३२० / मूल्य - ३२०  रुपये

सातारा जिल्ह्यात अंगापूर नावाच्या एका खेड्यात जन्मलेले डॉ. गजानन देशमुख यांची ही आत्मकथा. कुटुंबातल्या घडामोडी, ग्रामीण भागात काम करताना आलेले चांगले-वाईट अनुभव; घरासाठी, मंदिरासाठी कराव्या लागलेल्या न्यायालयीन- प्रशासकीय खटपटी, त्या त्या वेळी मनात आलेल्या भावना, अशा अनेक गोष्टी त्यांनी मांडल्या आहेत. अनेक घटना- घडामोडी त्यांच्या आयुष्यात घडल्या. त्या सर्वांविषयी त्यांनी स्पष्टपणानं आणि सविस्तर लिहिलं आहे. कादंबरी देशमुख यांनी शब्दांकन केलं आहे.

हातिम ताई
प्रकाशक - वरदा प्रकाशन, पुणे (०२० - २५६५५६५४) / पृष्ठं - १९२ / मूल्य - १८०  रुपये.

अद्‌भुत गोष्टी, रहस्यं, साहस, थरार अशा गोष्टींनी ठासून भरलेली ही कादंबरी. कृष्णाजी नारायण शास्त्री यांनी ती लिहिली आहे. अनेक भाषांत अनुवादित झालेली आणि चित्रपटापासून नाटकांपर्यंत अनेक माध्यमांत आलेली ही रंजक गोष्ट पुन-पुन्हा वाचायला मजा येते. जुन्या काळचं राजेशाही वातावरण, त्या वेळचे शब्द, परंपरा, जादुई दुनिया अशा अनेक गोष्टी या पुस्तकातून उभ्या राहतात.

पवित्र कुरआन - सुलभ मराठी अनुवाद
प्रकाशक - सलाम सेंटर, बंगळूर (९९०११२९९५६, ०८० - २६६३९००७) / पृष्ठं - ७३२ / मूल्य - ५०० रुपये.

पवित्र कुराणाचा मराठी अनुवाद सय्यद इफ्तिखार अहमद यांनी केला आहे. इस्लाम धर्मातलं तत्त्वज्ञान सोपेपणानं समजून घेण्यासाठी या पुस्तकाचा उपयोग होईल. काळानुरूप बदलत असलेल्या भाषेचा विचार करून अधिक नेमके शब्द वापरून अहमद यांनी अनुवाद केला आहे. पुस्तकाच्या शेवटी एक विषय सूचीही जोडण्यात आली आहे. आयतींच्या संदर्भात विविध विषयांवर माहिती मिळण्यासाठी या सूचीचा उपयोग होईल.

द्विखंडित
प्रकाशक - मेहता पब्लिशिंग हाउस, पुणे (०२० - २४४७६९२४) / पृष्ठं - ५०८ / मूल्य - ५५०  रुपये.

तसलिमा नासरिन यांच्या आत्मचरित्राच्या तिसऱ्या भागाचा हा अनुवाद. तसलिमा यांनी वय वर्षं २७ ते ३० या काळातल्या घटना- घडामोडींवर लिहिलं आहे. त्यांच्या स्त्रीवादी लेखनाला आलेला वेग, त्यांचं स्तंभलेखन, कवितालेखन, कादंबरीलेखन आदी गोष्टींविषयी त्यांनी लिहिलं आहे. ‘निर्बाचित कलाम’ हे पुस्तक आणि ‘लज्जा’ ही
कादंबरी प्रकाशित झाल्यानंतर बांगलादेशमध्ये तयार झालेलं वातावरण, इतर साहित्यिकांची त्यांच्याबद्दलची मतं, वेगवेगळे वाद, त्या त्या वेळच्या भावना अशा सर्व गोष्टींवर तसलिमा यांनी स्पष्टपणानं लिहिलं आहे. तत्कालीन घडामोडी त्या मांडत असतानाच एक साहित्यिक आणि व्यक्तिमत्त्व घडत जाण्याची प्रक्रियाही त्यातून
उलगडत जाते.

मनाच्या श्‍लोकांचे समर्थ चिंतन
प्रकाशक - विजया प्रकाशन, अंधेरी (पूर्व), मुंबई (९८२१३०७५०१) / पृष्ठं - १५० / मूल्य - २००  रुपये.

समर्थ रामदास स्वामी यांच्या ‘मनाच्या श्‍लोकां’चं निरुपण सुरेश जाखडी यांनी करून दिलं आहे. या श्‍लोकांमधला आध्यात्मिक अर्थ, रामदास स्वामींना अभिप्रेत असलेला भाव आदी गोष्टी त्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहेच. तत्कालीन व्यवस्थेबरोबरच आधुनिक ज्ञानशाखांचे संदर्भ, मनाच्या व्यवस्थापनासंदर्भात केलेलं विश्‍लेषण आणि मूळ तत्त्वज्ञान सोपं करून सांगण्याचा प्रयत्न
पुस्तकात आहे.

यमदूत चालले संपावर
प्रकाशक - अभिरुची प्रकाशन, नारायणगाव, जि. पुणे (९८२२५३०२६६) / पृष्ठं - ८८ / मूल्य - ८०  रुपये.

दिलीप कचेरे यांनी लिहिलेल्या विनोदी कथांचा हा संग्रह. खास वातावरणनिर्मिती, फॅंटसीचा वापर करत साधलेली विनोदनिर्मिती, चुरचुरीत संवाद, ठाशीव पात्रं आणि नाट्यपूर्ण घडामोडी हे कचेरे यांच्या कथांचं वैशिष्ट्य. सूक्ष्म निरीक्षण आणि कल्पनाशक्तीचा वापर करत त्यांनी लिहिलेल्या ‘यमदूत चालले संपावर’, ‘एका मच्छराची करामत’, ‘इन्सेक्‍ट कलेक्‍टर’, ‘माझी अंत्ययात्रा’ अशा कथा वाचनीय ठरल्या आहेत. त्यांना स्वत-ला आलेल्या काही विनोदी अनुभवांवर आधारित कथाही त्यांनी लिहिल्या आहेत. ‘सकाळ’च्या ‘पुणे जिल्हा’ आवृत्तीत प्रसिद्ध होणाऱ्या ‘गुदगुल्या’ आणि ‘मुक्तपीठ’ सदरात यापैकी काही लेखन प्रसिद्ध झालं आहे.

परदेशी शिक्षणातील भ्रम आणि वास्तव
प्रकाशक - मनोविकास प्रकाशन, पुणे (०२० - ६५२६२९५०) / पृष्ठं - ११० / मूल्य - १२०  रुपये.

परदेशांत शिक्षण घेण्याचं स्वप्न अनेक विद्यार्थी बघतात. अशा प्रकारचं शिक्षण घेण्याशी संबंधित विविध पैलू डॉ. श्रीराम गीत यांनी उलगडून दाखवले आहेत. परदेशांत शिक्षण घेण्याबाबतच्या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा वेध घेण्यापासून त्यातले फायदे-तोटे समजावून सांगण्यापर्यंत अनेक गोष्टी डॉ. गीत यांनी केल्या आहेत. भारतात मिळू न शकणारे फायदे, वेगवेगळे अभ्यासक्रम, भारतात करावी लागणारी पूर्वतयारी, परदेशांत राहून शिकण्याचं वास्तव आदी गोष्टी त्यांनी समजावून सांगितल्या आहेत. एमएस, डॉक्‍टरेट, एमबीए आणि इतर काही वेगळ्या वाटांचीही माहिती त्यांनी करून दिली आहे. जगभरातल्या महत्त्वाच्या विद्यापीठांबाबतही त्यांनी माहिती दिली आहे.

शेतकरी आत्महत्यामुक्तीच्या दिशेने
प्रकाशक - शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर (०२४२२-२१०४४४) / पृष्ठं - ६४ / मूल्य - ८० रुपये

शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा विषय खूप चर्चेचा आहे. सलाउद्दिन आत्तार यांनी त्याविषयी चिंतन करून ही पुस्तिका तयार केली आहे. शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्‍नांची चर्चा त्यांनी केली आहे. या प्रश्‍नातून मार्ग कसा काढता येईल, याविषयीही त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. काही उदाहरणंही दिली आहेत.

पायवाटा
प्रकाशक - सुरेश एजन्सी, पुणे (०२०-२४४७०७९०) / पृष्ठं - १४४ / मूल्य - १७० रुपये

लेखक-संपादक रा. अ. कुंभोजकर यांना कामाच्या, छंदाच्या निमित्तानं विविध साहित्यिकांचा सहवास मिळाला. त्या सर्वांची व्यक्तिचित्रं त्यांनी या पुस्तकात रेखाटली आहेत. वि. स. खांडेकर, वि. वा. शिरवाडकर, शंकर रामाणी, रणजित देसाई, सोपानदेव चौधरी, मुकुंदराव किर्लोस्कर, रवींद्र पिंगे, अरुणा ढेरे अशा अनेकांविषयी त्यांनी लिहिलं आहे. केवळ जंत्री न देता तो-तो माणूस उलगडण्याचा प्रयत्न कुंभोजकर यांनी केला आहे. अनेक किस्से, अनुभव, नेमकी निरीक्षणं अशा गोष्टींमुळं पुस्तक रंगतदार झालं आहे.

गैरसमजांचे निराकरण
प्रकाशक - सलाम सेंटर, बंगळूर (९९०११२९९५६, ०८०-२६६३९००७) / पृष्ठं - २५८ / मूल्य - ३०० रुपये

इस्लामविषयी सकारात्मक विचारांचा प्रसार करणाऱ्या ‘सलाम सेंटर’चे सय्यद हमीद मोहसीन यांनी लिहिलेलं हे पुस्तक. इस्लाम आणि मुस्लिमांविषयी असलेल्या विविध गैरसमजुतींचं निराकरण करण्याचा आणि विविध संकल्पना स्पष्ट करण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकात केला आहे. पर्सनल लॉ, ७८६ क्रमांक, हिरवा रंग, मदरसा शिक्षण, अजान, जिहाद, हिजाब, हलाल, हराम, तलाक, फतवा अशा अनेक संकल्पना त्यांनी स्पष्ट केल्या आहेत. वेगवेगळ्या विषयांवर होत असलेल्या चर्चांसंदर्भात वस्तुस्थिती काय आहे, हेही त्यांनी मांडलं आहे.

अतिदूरचे बांधव
प्रकाशक - मनाक्षरे पब्लिकेशन्स, पुणे (९५९५३१९९०९, ९३७३३९९०९) / पृष्ठं - २९२ / मूल्य - ३५० रुपये

श्रीनिवास शारंगपाणी यांच्या ‘अवर डिस्टंट कझिन्स’ या इंग्लिश विज्ञान कादंबरीचा हा मराठी अनुवाद. आश्‍लेषा महाजन यांनी तो केला आहे. इसवीसन २०४८ मध्ये एक अवकाशयान मानवांसहित मंगळावर पोचतं. तिथं अंतराळवीरांना मंगळवासी भेटतात. पृथ्वीवासी आणि मंगळवासी यांच्यात एक नातं तयार होतं, चर्चा होते, अशी या कादंबरीची कथा. वेगवेगळे संदर्भ, कल्पनारम्यता, तंत्रज्ञानविषयक माहिती यांचा वापर करून शारंगपाणी यांनी ही रंजक कादंबरी लिहिली आहे. अनेक बारीकसारीक तपशील आणि वैज्ञानिक माहिती सुकरपणे असल्यामुळं आणि कल्पनांची रंजक जोड दिल्यामुळं कादंबरी वेधक ठरते.

पगारातून आयकरकपात मार्गदर्शिका
प्रकाशक - कौशिक प्रकाशन, सातारा (०२१६२ - २३४०४९) / पृष्ठं - १७२ / मूल्य - १८०  रुपये.

प्राप्तिकर हा पगारदार मंडळींचा अगदी जिव्हाळ्याचा विषय. प्राप्तिकर सल्लागार अरुण गोडबोले यांनी हा विषय सोपेपणानं समजावून सांगितला आहे. प्राप्तिकरातून कपातीची संकल्पना समजावून सांगण्यापासून ई-फायलिंगपर्यंत विविध गोष्टी त्यांनी समजावून सांगितल्या आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पातल्या प्राप्तिकराबाबतच्या तरतुदी, त्यातले नवीन नियम, महत्त्वाचे बदल हे त्यांनी सविस्तरपणे समजावून सांगितले आहेत. याबरोबरच वेगवेगळ्या वजावटी, विवरणपत्रं दाखल करणं, घराचं उत्पन्न, करकपातीची कार्यपद्धती, भांडवली नफा आदी गोष्टींची माहितीही त्यांनी करून दिली आहे.

साभार पोच

  •     सर्वव्यापी मौनाच्या प्रतीक्षेत / कवितासंग्रह / कवी - जीवन आनंदगावकर (९८५०५०७६०२)/ प्रकाशक - जे. कृष्णमूर्ती विचारमंच, पुणे (९४२२३५०३५०) / पृष्ठं - १४४ / मूल्य - १०० रुपये
  •     कुरआन- एक परिचय / माहितीपर / अनुवादक, संपादक - ॲड. एम. ए. लतीफ/ प्रकाशक - कुरआन ॲकॅडमी, औरंगाबाद / पृष्ठं - ५०
  •     नातीजाती / कवितासंग्रह / कवी - चंद्रकांत वानखेडे / प्रकाशक - काषाय प्रकाशन, पुणे (९०११३७२०२३) / पृष्ठं - ११२ / मूल्य - १२० रुपये
  •     पृथ्वीराज चौहान यांचा इतिहास / ऐतिहासिक / लेखक - आत्माराम द्विवेदी, अनुवाद - लोकहितवादी / प्रकाशक - वरदा प्रकाशन, पुणे (०२० - २५६५५६५४) / पृष्ठं - ११० / मूल्य - १३० रुपये
Web Title: welcome new books