‘गुणां’ना संधी (रेणू दांडेकर)

Education
Education

अनेक पालकांना ‘फॅक्‍टरी स्कूलिंग’ नको वाटतं आणि त्यामुळं ‘होम स्कूलिंग’चा ते विचार करतात. मात्र, याची दुसरी बाजू अशी, की तेवढा वेळ देणं, अप्रत्यक्ष का होईना मुलांच्या घरच्या वेळेचं नियोजन करणं, त्यांची आवड-छंद-कल-कौशल्य समजून तसं पर्यावरण निर्माण करताना सामाजिकताही त्यांना देणं अशा गोष्टीचं भान ठेवावं लागतं. मुख्य म्हणजे पालकांना यासाठी वेळ असावा लागतो. त्यामुळं हा विषय जगात कसा हाताळला गेलाय, देशातली ही चळवळ कशी आहे, ही गोष्ट विस्तारानं समजून घेतली पाहिजे. 

एखादी वेगळी बातमी येते नि आपण सगळे विचार करू लागतो. आता आपण ज्या वेगळ्या बातमीबद्दल बोलतोय, ती आहे महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्र्यांनी केलेली ओपन एसएससी बोर्डची घोषणा. इतकंच नाही, तर हे बोर्ड १० जानेवारीपासून कार्यरतही झालं असेल. यानुसार शिक्षण प्रवाहातून दूर, शारीरिक अक्षम, विविध कौशल्यांत करिअर करणारे विद्यार्थी थेट दहावीची परीक्षा देतील. याच मंडळाचं प्रमाणपत्र मुलांना मिळेल आणि हे प्रमाणपत्र एसएससी बोर्डाच्या प्रमाणपत्राइतकंच समतुल्य असेल.

ही बातमी वाचली आणि कित्येक वर्षांपूर्वीच्या घटनेची आठवण झाली. रस्त्यावर काम करणाऱ्या एका मजुराचा मुलगा कवळ तोडताना झाडावरून पडला. ही घटना दिवाळीच्या सुटीच्या आधी घडली. तो शाळेत येणं शक्‍य नव्हतं. व्हीलचेअर नव्हती नि एसटीची सोयही नव्हती. आम्ही त्याला बघायला गेलो. त्याची खूप इच्छा होती. तो म्हणत होता ः ‘‘मला बोर्डाच्या परीक्षेला बसायचंय.’’ तो आपापला अभ्यास करणार होता नि त्याचे मित्र त्याला मदत करणार होते.

या दोन्ही गोष्टी मनाला स्पर्शून राहिल्या. तो एवढे दिवस गैरहजर होता, तर हजेरी भरायची सक्ती असण्याच्या काळात परीक्षा शक्‍य नव्हती. मी म्हणाले ः ‘‘आपण तुला परीक्षेला बसवू. तू अभ्यास कर. लागेल तिथे मदत करू.’’ त्याच्या हजेरीचं काय झाले असेल हे लक्षात आलं असेलच. तो परीक्षेला बसला नि पास झाला. मध्यंतरी याच काळात त्याचे वडील गेले नि त्यांच्या जागी त्याला काम मिळालं. पुढं त्यानं चांगली नोकरी धरली. तेव्हा तो म्हणाला ः ‘‘तुमी परीक्षेला बसवलान, तो मला तुटलेला पाय मिळाला.’’

असंख्य अडचणी असणारी खूप मुलं समाजात आहेत. बरेच वेळा आपण आपल्या सुरक्षिततेच्या कवचात इतके असतो, की जाणीव तशी कोरडीच असते. आर्थिकदृष्ट्या सबळ मुलं सगळ्या संधी घेतात, पण दुर्बल मुलांचं काय? त्यांना वाटत नसेल इतर मुलांसारखं आपण व्हावं? शिकावं? सावलीला काम करावं?... अपंग मुलांचं काय? इतकं अपंगत्व असतं, की ती संधींपर्यंत पोचूही शकत नाहीत. कारण भौगोलिक दुर्गमताही अनेक ठिकाणी असते, अंतर असतं. कौटुंबिक अडचणी, निराधारपणा, सामाजिक समस्या या सगळ्या ठिकाणी असतात. शिवाय मनुष्यबळाचं काय? मला वाटतं, सरकारच्या या निर्णयामुळं यांना रस्ता मिळेल.

आधीही सोय 
अर्थात यापूर्वीही १८ वर्षं पूर्ण असणाऱ्यांना दहावीला १७ नंबरचा फॉर्म भरून परीक्षा देता येत असे; पण हे कमीपणाचंही उगाचच वाटत असे. असो. फक्‍त ही संधी आहे. ज्यांना संधी मिळत नाही त्यांच्यापर्यंत जाऊन ती पोचायला हवी. काही राज्यांत पाचवी, आठवीचीही बोर्डाची परीक्षा होते. काही राज्यांत ही परीक्षा देऊन ज्यांना अपेक्षित आहेत ती मुलं मूळ प्रवाहात येतातही. काही प्रयोगशील शाळांना याचा खूप चांगला फायदा होतो. त्यांना त्यांच्या मनाप्रमाणं अभ्यासक्रम, पाठ्यक्रम, पाठ्यपुस्तकं, मूल्यमापन यांची रचना करता येते आणि एका विशिष्ट टप्प्यावर पुन्हा प्रवाहात जाता येते. इथं मूल चाकोरीतल्या अनेक वाईट गोष्टींतून मोकळं होतं नि पुन्हा म्हटलं तर प्रवाहात आहेही असं घडतं. देशपातळीवर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगची (एनआयओएस) सन १९७९मध्ये स्थापना झाली. तिचं नाव नंतर सन २००२मध्ये नॅशनल ओपन स्कूल असं बदललं गेलं. शिवाय पुढील महाविद्यालयीन शिक्षणासाठी मात्र आज मुक्त विद्यापीठं आहेतच. त्याचा लाभही खूप जण घेतातच. ही विद्यापीठं जशी राज्यपातळीवर आहेत, तशी देशपातळीवरही आहेत. मला वाटतं, कौशल्य कार्यक्रमात मुलांना पूर्णवेळ सहभाग घेता येईल नि अंतिमतः ही परीक्षाही देता येईल (टेक्‍निकल). मुक्त विद्यापीठांची पुस्तकंही दर्जेदार आहेत. शालेय पातळीवरही अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तकं तयार झाली असतील वा होतील. जी मुलं इतर क्षेत्रांत कुशल आहेत; पण समाजाचं परीक्षेचं दडपण असल्यानं सगळं सोडून मन मारून त्यांना ‘घोका नि ओका’ या रचनेचं बळी व्हावं लागतं, त्यांनी आपलं आपल्या आवडीच्या क्षेत्रातलं कौशल्य पणाला लावून या संधीचा फायदा घ्यावा. एका अर्थानं ही समाजाची समृद्धीच ठरेल.

पालक आणि विद्यार्थी
यातून विचार पुढे योतो तो मग जे पालक अपल्या मुलांना खर्चिक शाळेत पाठवू शकतात, पण त्यांना पाठवायचंच नाही- कारण शिक्षणाकडून त्यांच्या काही वेगळ्या अपेक्षा आहेत- त्यांना तर हा पर्याय आनंददायकच आहे. कारण अनेक गोष्टी ज्या कराव्याशा वाटत नाहीत, मुलांना ओझं वाटतं, मुलं कंटाळतात त्यातून मुलांना सोडवण्याचा पर्याय म्हणजे गृहशाळा-गृहशिक्षण- Home Schooling! आज जगभरात अनेक प्रगत देशांनी याचा केव्हाच स्वीकार केला आहे, पर्याय निवडला आहे. भारतातही जवळजवळ दहा हजारांपेक्षा अधिक कुटुंबानी हा पर्याय निवडलाच व ते एकमेकांशी जोडलेले आहेत.  माझ्या परिचयातल्या काही कुटुंबानी हा पर्याय स्वीकारला आणि त्या मुलांना कितीतरी गोष्टी करता येतायत, मुलं आनंदात आहेत, हे मी पाहिलंय. नंतर ती मुलं विचार करू लागल्यावर त्यांनी त्यांचा पुढचा मार्ग निवडावा, हे स्वातंत्र्यही मुलांना त्यांनी दिलं. 

संकल्पना सोपी नाही
मात्र, ही कल्पना तेवढीशी सोपी नाही. शाळेत न जाणारी मुलं वंचित असतात ती प्रवाहातल्या शिक्षणापासून. मात्र, ती स्वतः जगायला शिकतात, त्यांची लढाई ते लढतात. त्यांच्यावर ती वेळ येते म्हणून! पण प्रचलित शिक्षण प्रवाहातलं कारखानदारी रूपही अनेक सर्जनशील मनांना नको वाटतं. हे factory Schooling टाकून द्यावं वाटतं. याची दुसरी बाजू अशी, की तेवढा वेळ देणं, अप्रत्यक्ष का होईना मुलांच्या घरच्या वेळेचं नियोजन करणं, त्यांची आवड-छंद-कल-कौशल्य समजून तसं पर्यावरण निर्माण करताना सामाजिकताही त्यांना देणं अशा गोष्टीचं भान ठेवावं लागतं. मुख्य म्हणजे पालकांना यासाठी वेळ असावा लागतो, त्यामुळे हा विषय जगात कसा हाताळला गेलाय, देशातली ही चळवळ कशी आहे, ही गोष्ट विस्तारानं समजून घेतली पाहिजे. एक नक्की, की ओपन एसएससी बोर्डाचा कदाचित त्यांना फायदा होईल. राज्यपातळीवर असं बोर्ड असण्यापूर्वी देशपातळीवरच्या या रचनेचा फायदा काही जण घेत होतेच. अर्थात तेही सक्तीचं नाही.

मुलांमध्ये प्रचंड क्षमता
मुलांमध्ये प्रचंड क्षमता असतातच. सगळ्या गोष्टी तेवढ्याच ताकदीनं ती करतात. मात्र, अंतिमतः मला काय करायचंय ते मी करेनच हे ठामपणे ठरवण्याचं धाडस कमी मुलांमध्ये असते. तो त्यांचा दोष नाही. शिक्षण वेगळ्या क्षेत्रात नि करिअर वेगळ्या क्षेत्रात असे अनेकजण आपण बघतोच की! त्यामुळं विद्यार्थ्यांपर्यंत या परीक्षेचं स्वरूप नीटपणे गेलं, तर आजच्या यंत्रयुगातली मुलं याचा नक्की फायदा घेतील. अर्थात या परीक्षास्वरूपाचा आपण आपल्या पाल्याच्या संदर्भात कसा विचार करूया हा विचार करण्याच्या मनोवस्थेतले पालक किती प्रमाणात आहेत, हा प्रश्‍न आहेच. खासगीकरणाच्या धबडग्यात, माध्यमाच्या गोंधळात पालक अधिक जखडले आहेत. उलट पाल्याचं भविष्य आपणच ठरवण्यात कृतार्थता मानत आहेत. मुलांनाही याची सवय झाली आहे, तेव्हा या सगळ्या पाशातून बाहेर पडायला हवंय. मुक्त शिक्षणाचा विचार करणाऱ्यांनी एकत्र यावं, देवाण-घेवाण करावी नि मुलांमधल्या कौशल्यांना, गुणांना संधी देणारा भाग म्हणून ओपन एसएससी बोर्डाचा विचार करावा. बाकी गोष्टी (अभ्यासक्रम, परीक्षा स्वरूप, विषय इत्यादी अनेक) अजून वेगळ्याच आहेत. त्यातर समजून घ्याव्याच लागतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com