कोरोनाने आपल्या काय काय शिकवलं ?

कुशल कुबेर
Wednesday, 27 May 2020

प्रत्येक गोष्टीची चांगली बाजू पाहुयात आणि कोरोनाने आपल्याला जे धडे अथवा शिकवण दिली आहे त्यावर गांभीर्याने विचार करून ती अमलात आणून भविष्यात येणाऱ्या संकटांना वेळीच रोखूयात.

संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या कचाट्यात सापडले आहे. अनेक देशांमध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. जगभरातील अनेक देशामध्ये अजूनही लॉकडाऊन सुरु आहे. भारतात देखील हीच स्थिती आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले आणि हे कधी न पाहिलेले संकट असल्याचे म्हंटलं. याचबरोबर त्यांनी भारतासाठी कोरोना ही प्रगतीची उत्तम संधी असल्याचे देखील त्यांनी नमूद केले.

या जगात प्रत्येक गोष्टीला एक चांगली आणि एक वाईट बाजू असते. कोरोनाचे देखील असेच काहीसे आहे. आपत्ती तुम्हाला खूप काही शिकवते असं म्हणतात आणि तेच कोरोनाच्या संकटाने केलंय. कोरोनाने जगभरात लाखो लोकांना वेठीस धरलं खरं, पण कोरोनाने सर्वांना अनेक गोष्टी शिकवल्या देखील आहेत. सर्वांची जगण्याची पद्धतच कोरोनाने बदलून टाकली आहे. जगभरातील लोकांच्या विचारसरणीवर देखील या संकटाने बराच फरक पडला आहे. असा आजारही कोणाला काही शिकवून जातो या वाक्याचे अनेकांना आश्चर्य होईल आणि काहींना राग देखील येईल पण तरी हा विचार एकदा तरी करायलाच हवा. अशाच काही गोष्टी ज्या कोरोनाने आपल्याला शिकवल्यात त्यांच्यावर एक नजर टाकुयात. 

निसर्गाला गृहीत धरू नका 

माणूस सतत स्वतःच्या प्रगतीचा विचार करत असतो आणि त्यासाठी मेहनत करतो. पण हे सर्व करताना अनेक महत्वाच्या गोष्टींना आपण मोठी हानी पोहोचवतो हेच आपण सर्वजण विसरून जातो. शहरांची परिस्थिती सध्या अशी आहे की जिथे जागा दिसेल तिथे इमारत उभी केली जातेय. झाडांची कत्तल देखील मोठ्या प्रमाणावर होते. भारताची राजधानी दिल्ली आणि मुंबई, पुणे, बंगळूर यासारखी शहरे वायू प्रदूषणाच्या मोठ्या संकटाचा सामना करीत आहेत.

रेड अलर्ट! आज-उद्या मुंबई-कोकणात ...

 

पाण्याचे प्रदूषण ही देखील एक मोठी समस्या आहे. मनुष्याने निसर्गाचं मोठं नुकसान केलंय. प्रदूषणामुळे ग्लोबल वॉर्मिंग वाढले असून त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. पण आता या सर्वात कोरोनाने काय शिकवले असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. त्याचे उत्तर सोपं आहे; निसर्गाला त्रास दिला की तो तुम्हाला त्रास देतो आणि हीच महत्वाची शिकवण आहे की निसर्गाला गृहीत धरू नये. निसर्गापुढे कोणाचेही चालत नाही असे म्हणतात आणि ते तंतोतंत खरे आहे आणि म्हणूनच निसर्गाची काळजी घ्या हा सर्वात मोठा धडा कोरोनाच्या या संकटाने आपल्याला शिकवला आहे. 

नाती जपा 

नोकरी आणि पोटापाण्यासाठीच्या धावपळीने जीवनशैली अतिशय धकाधकीचे बनलंय आणि त्यामुळे घरच्यांना वेळ देणे, त्यांच्याशी गप्पा मारणे देखील दुर्मिळ झाले आहे. खरंतर घरच्या मंडळींना वेळ देणे अतिशय महत्वाचे असते. आई वडिलांचा एकमेकांशी आणि मुलांशी संवाद, घरातील ज्येष्ठ लोकांशी संवाद या बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. 

Happy Family Wallpapers - Top Free Happy Family Backgrounds ...

कोरोनामुळे लोक व्यथित असले तरी कोरोनाने सर्वांना घरात बसायला लावले आहे आणि याचमुळे घरच्यांना भरपूर वेळ देणे शक्य झाले आहे. काही घरांमध्ये वाद होत आहेत पण अनेक नाती देखील मजबूत होत आहेत. कोरोनाने आपल्या सर्वांनाच नात्यांचे महत्व शिकवले आहे. 

स्वच्छता ठेवा 

स्वच्छता ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. देशात आणि जगात कचऱ्याचे प्रमाणात अतिशय मोठे आहेत पण त्यासाठी होणाऱ्या उपाययोजना अतिशय थोड्या प्रमाणात आहेत. स्वच्छता असल्यास कोणताही आजार आपल्या जवळ येत नाही हे तर सर्वांनाच माहितीये. पण तरीही सध्या अनेक लोकांना स्वच्छतेची ऍलर्जी असल्याचे दिसून येत आहे.

Transparent Cleaning Icon Png - Keep City Clean Logo, Png Download ...

 

कोणताही आजार पसरण्यासाठी अस्वछता अतिशय पोषक आहे. कोरोनाने लोकांना सारखे हात धुण्यास शिकवले. मास्क देखील लोक घालू लागले आहेत. सर्वजण लॉकडाऊनमुळे घरी असल्याने संपूर्ण निसर्ग स्वछ होतोय. कचऱ्याचे प्रमाण कमी झालंय. थोडक्यात काय कोरोनाने सर्वांना स्वच्छतेची शिस्त लावली असे म्हणल्यास काही वावगे ठरणार नाही. हीच सवय आपण यापुढेही अशीच पाळली पाहिजे. 

तब्येतीची काळजी घ्या 

विचित्र जीवनशैली, वेळी-अवेळी खाणे अशा अनेक गोष्टींमुळे सध्या देशातील लोकांच्या तब्येतीचा स्तर खालावला आहे. फास्ट फूड, तेलकट पदार्थ या सगळ्या गोष्टींमुळे आजार होण्याचं प्रमाण वाढलं आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमी असणाऱ्या, मधुमेह, ब्लड प्रेशर यासारखे सारखे आजार असणाऱ्या लोकांना कोरोना विषाणूने आपले लक्ष्य केले आहे.

The difference between a heart attack and cardiac arrest - Insider

 

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठीरो गप्रतिकारक शक्ती चांगलीच असावी लागते. म्हणजे  कोरोनाने सर्वांना तब्येतीचं महत्व शिकवलं. तब्येतीची काळजी घेणे किती महत्वाचे आहे हे देखील या विषाणूने संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे. मग आयुष्यभर तब्येतीची काळजी घेतल्यास सर्व प्रकारच्या व्याधी आणि रोगांपासून दूर राहण्यास आपण सक्षम होऊ शकतो. 

प्राणिमात्रांवर प्रेम करा 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे निसर्गाचे चक्र सुधारलं आहे. प्रदूषणात मोठी घट झाली असून वन्य जीवन देखील आनंदी असल्याचे अनेक ठिकाणी आपण त्यांना पाहिलंय. वन्य प्राणी मुक्त संचार करू लागले आहेत.

Some humans seem to care more about pets than people ... but why ...

पाळीवप्राणी असो अथवा वन्यप्राणी सर्वच जीवनचक्राचा एक आमूलाग्र  आणि अतिशय महत्वाचा भाग आहेत. त्यांची संख्या कमी झाल्यास जीवनाचा समतोल बिघडतो आणि म्हणूनच त्यांच्यावर प्रेम करणे आणि त्यांची काळजी घेणे देखील अतिशय महत्वाचे आहे. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनच्या काळात प्राण्यांच्या कत्तलीमध्ये देखील घट झाल्याचे दिसून येत आहे. सर्वांनी आनंदाने एकमेकांची काळजी घेऊन एकत्र राहावे अशीच शिकवण कोरोना सर्वांना देत आहे. 

कोरोनाचे संकट मोठे असले तरी आपण सर्वांनी काळजी घेतल्यास त्यावर नक्कीच मात करू शकतो. कोणताही आजार असो तो नेहमीच सगळं हिरावून घेत नाही तर तुम्हाला काही चांगल्या गोष्टी देऊन देखील जातो. अनेक वेळेस आपल्याला अनेक गोष्टींबद्दल पूर्वकल्पना देतो.अनेक गोष्टी शिकवून देखील जातो.

प्रत्येक गोष्टीची चांगली बाजू पाहुयात आणि कोरोनाने आपल्याला जे धडे अथवा शिकवण दिली आहे त्यावर गांभीर्याने विचार करून ती अमलात आणून भविष्यात येणाऱ्या संकटांना वेळीच रोखूयात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: what we learnt from corona virus read full article by kushal kuber