#ManOnMoon50th : चंद्रावरचे पुणेकर!

सुवर्णा येनपुरे-कामठे
शनिवार, 20 जुलै 2019

चंद्रावर पहिला मानव जाऊन आज 50 वर्षे पूर्ण झाली... आणखी 50 वर्षांनी चंद्र कसा असेल? 

50 वर्षानंतर चंद्रावर

''हॅलो आर्किटेक्चर बोलताय.''

''हो, बोला काय काम आहे.''

''अहो, आम्ही काही वर्षापूर्वी चंद्रावर जमीन घेतली होती. त्यावर आम्हाला फार्महाऊस बांधायचे आहे.''

''चंद्रावर नेमकी कुठे?''

''आता असं कसं सांगणार. तुमच्याकडे आले की तिकडचा सातबाराच दाखवेल तुम्हाला. तरी सांगायचं म्हटले तर आमच्या गॅलेरीतल्या दुर्बीणीतून पाहिलं तर मध्यभागी जो खड्डा दिसतो, त्याच्या उजव्या बाजूचा तिसरा खड्डा आमचा आहे. ते मुंबईचे जोशी राहतात ना त्यांच्या शेजारीच!''

''मुंबईच्या जोशींच्या शेजारी तुम्हाला जागा मिळूच कशी शकते? खास जास्त खड्डे असलेला चंद्रावरचा भाग मुंबईकरांसाठी आरक्षित ठेवण्यात आला होता. तुम्हाला काहीतरी गैरसमज होत असेल. उद्या सातबारा आणा, मी पाहतो.''

''का मिळू शकत नाही. त्यांचा वडापाव आम्हाला चालतो, मग त्यांची जागा का आम्हाला चालणार नाही.''

''बरं ठिक आहे, पण लक्षात ठेवा. एकोणीस दिवसांचा एक दिवस असतो आणि रात्रही साधारण एवढीच मोठी असते. त्यामुळे घर स्वयंप्रकाशित राहिल असे काहीतरी करावे लागेल.''

''आहाहा, आम्ही पुणेकर मुळातच स्वयंप्रकाशितच असतो, तिथे घराचं काय घेऊन बसलात... त्यासाठी आम्हाला दुसरी सोय नको.''

Image result for moon graphics

''ठिक आहे, मग मी माझ्या प्लॅनमध्ये इलेक्ट्रीसीटीचे काम रद्द करतो. पर्यायाने हिटरही नसेल घरात. लक्षात ठेवा तिथे तापमान हे मायनस असते. पाणीसुद्धा 'एक बिसलेरीचा गोळा द्या', असेच मागावे लागते. ''

''ते ही तुम्ही आमच्यावर सोडा. तुम्हाला म्हणून सांगते, आमचे हे इतके चि़डके आहेत, की त्यांचा पारा कधीही चढू शकतो. त्याचा आम्ही चंद्रावर वापर करून घेणार आहोत''

''बरं-बरं. तुमची जागा कुठेय म्हणालात?''

''अहो मध्यभागच्या खड्ड्याच्या बाजूला तिसरा खड्डा हीच आमची जागा. चांदणी चौक नाव आहे तिकडचे. अहो, मी रोज दुर्बीणीने पाहत असते ना, तिकडे त्या जोशींनी आमच्या जागेत बटाट्याची शेती केलीय. मी तिकडच्या पोलिसांकडे तक्रार केलीय, मी बटाटे छान उगवेपर्यंत वाट पाहत होती. आता ते छान उगवलेत, ते मी आमच्या ताब्यात घेणार आहे.''

''बरं-बरं. तुम्ही तुमच्या जागेवर कधी प्रत्यक्ष जाऊन आला आहात का.''

''छे, हो. आमच्या ह्यांना म्हटलं एकदा जाऊयात, एवढी जागा घेतलीय तर. पण हे एकतील तर खरं ना. म्हटले, तेवढ्या खर्चात इथे 100 वेळा शिर्डी-बालाजी वगैरे करता येईल. त्यातल्या 50 वेळा नवस बोलायला आणि 50 वेळा फेडायला असे धरून. म्हणाले, म्हणजे आपण आता आहे, त्याच्या पन्नासपट मालमत्ता सहज करू शकू. त्यात तिथं जोवर एखादं प्रसिद्धा तिर्थक्षेत्र होत नाही, तोवर तरी शक्य नाही. मला तर वाटतंय नाहीच झालं तर हे जाऊन बांधतीलच तिथं एखादं तिर्थक्षेत्र''

''ते सगळं ठिक आहे. पण तिथे जाण्याआधी तुम्हाला तिकडचे नियम माहित असणे गरजेचे आहे.''

''नियम, काय हो?''

''आधी फायद्याचे सांगतो. तुम्हाला संकष्टी सोडण्यासाठी चंद्रोदयाची वाट पहावी लागणार नाही. घराच्या बाहेर आलात की उपवास सोडायला मोकळ्या. अजून एक तिथे गुरुत्वाकर्षण कमी असल्याने तुम्ही हवेत तरंगता. त्यामुळे तिथे तुम्हाला तीन मजली इमारत बांधून तिथून तुम्हाला तिसर्या मजल्यावरून पहिल्या मजल्यावर जावे लागेल. जर तुमच्या डोक्यातही हवा असेल तर फार्महाऊसला पाचवा मजला बांधावा लागेल. खालच्या तिसरा मजल्यावर राहणे शक्य होणार नाही. ''

''हो का?''

'' हो. आता सुचना. तुम्हाला तिथे चंद्र तोडून आणेल अशा कविता वगैरे करता येणार नाही. तो सपशेल गुन्हा ठरेल.''

''तुमच्या तोंडात साखर पडो साहेब. आमचे हे इतके त्या चंद्रावर कविता करत असतात की मी वैतागून जाते हल्ली. आता कधी एकदा चंद्रावर राहायला जाईल असे वाटतंय.''

''तिकडचा एक ते चार हा कालावधी खूप मोठा असल्याने तुम्हाला खूष होण्याचे कारण नाही. पैशांचे डॉलरमध्ये रुपांतर होते तसे इकडच्या तासांचे तिकडच्या तासांमध्ये रुपांतर होऊन तेवढीच झोप तुम्हाला मिळू शकते. चंद्र छोटा असल्यामुळे तुमच्या बाजूची तीन-चार घरं सोडली की लगेच, मुंबई सुरू होईल. त्यामुळे तिथे गेल्यावर तक्रार करू नये. बाकी उद्या सातबारा घेऊन आल्यावर बोलू''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: what will be scenario of the moon after 50 years