जेटली आता मंत्रिमंडळाबाहेर.. मोदींचे संकटमोचक आता कोण?

Wednesday, 29 May 2019

'दरबारी राजकारणी' अशा हेटाळणीयुक्त कुजबुजीकडे सपशेल दुर्लक्ष करत जेटली यांनी गेली पाच वर्षे समर्थरित्या केंद्रातील भाजपचे 'संकटमोचक' म्हणून भूमिका बजावली. 

भारतीय सत्ताकारणाचे तीन प्रमुख केंद्र म्हणजे दिल्लीतील नॉर्थ ब्लॉक, साऊथ ब्लॉक आणि उद्योग भवन! या तीनही ठिकाणी वावर असणे आणि त्यातही प्रभावी वावर असणे, ही प्रत्येकाला जमणारी गोष्टच नव्हे.. हे साध्य करून दाखवलं होतं अरुण जेटली यांनी.. 'दरबारी राजकारणी' अशा हेटाळणीयुक्त कुजबुजीकडे सपशेल दुर्लक्ष करत जेटली यांनी गेली पाच वर्षे समर्थरित्या केंद्रातील भाजपचे 'संकटमोचक' म्हणून भूमिका बजावली. 

Image result for arun jaitley and narendra modi

गेल्या निवडणुकीपेक्षा यंदाच्या लोकसभेमध्ये भाजपने दणदणीत विजय मिळविला आहे. पुढील पाच वर्षे भाजपच्या केंद्रातील सत्तेला कोणताही धोका नाही, हे एनडीएकडील पूर्ण बहुमतामुळे स्पष्ट झाले आहे. अशा परिस्थितीत नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळामध्ये कोणाचा समावेश होणार आणि महत्त्वाची खाती कुणाला मिळणार, याची सध्या प्रचंड मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. त्यातच, जेटली यांनी मोदी यांना पत्र लिहून या मंत्रिमंडळातून बाहेर राहण्याची इच्छा व्यक्त केली. प्रकृतीच्या कारणामुळे गेले दीड वर्ष जेटली पूर्ण क्षमतेने कारभार पाहू शकलेले नाहीत. त्यामुळे नव्या मंत्रिमंडळात स्वत:ला स्थान नसावे, अशी मागणी त्यांनीच केली.

गेल्या वर्षी शस्त्रक्रियेमुळे जेटली यांनी अर्थमंत्रीपदाचा पदभार तात्पुरता सोडला होता. पीयूष गोयल यांनी हा पदभार स्वीकारला होता. दीड महिन्यांनंतरही गोयलच या पदावर होते. त्यामुळे 'देशाचे अर्थमंत्री नेमके कोण? जेटली की गोयल' अशा स्वरूपाच्या राजकीय चर्चा सुरू झाल्या होत्या. 'देशाच्या अर्थव्यवस्थेच्या नाजूक परिस्थितीमुळे मोदी यांना जेटलींचा कारभार काढून घेतला', अशीही दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. पण तीन महिन्यांनंतर जेटली पुन्हा एकदा अर्थमंत्री म्हणून कार्यरत झाले. असे म्हणतात, की मोदी स्वत: जेटली यांना पदावरून दूर करण्यास उत्सुक नव्हते. 'जोपर्यंत जेटली काम करू शकत आहेत, तोपर्यंत त्यांनी अर्थमंत्रीपद सांभाळावे',  अशीच मोदींची इच्छा असल्याचे सांगितले जाते.

मोदी आणि जेटली यांच्यातील मित्रत्त्वाचे संबंध दोन दशकांपूर्वीपासूनचे आहेत. गुजरातमध्ये २००२ मध्ये झालेल्या गोध्रा दंगलीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मोदी यांच्यावर जगभरातून टीकेची झोड उठली होती. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी गुजरात सरकारवर कारवाई करण्याचा विचार केला, असेही सांगितले जाते. पण जेटली यांनी लालकृष्ण अडवानी यांच्यासह पक्षातील इतर बड्या नेत्यांना मोदी यांच्या पाठीशी उभे केले, अशी कथा राजकीय वर्तुळात सांगितली जाते. २००५ मधील सोहराबुद्दीन चकमक प्रकरणी विरोधकांनी तत्कालीन गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात रान उठविले होते. त्यावेळीही त्यांच्या मदतीसाठी जेटलीच धावून आले होते. २००२ च्या त्या दंगलीपासून २०१३ पर्यंत मोदींवर झालेल्या प्रत्येक टीकेवर जेटली यांनी त्यांचे समर्थनच केले आहे. 

अमित शहांचाही आधार!
सोहराबुद्दीन चकमक प्रकरणात २०१० मध्ये सीबीआयने शहा यांना अटक केली होती. जामीन मिळाल्यानंतर शहा यांना गुजरात सोडण्याचे आदेश देण्यात आले होते. तेव्हा शहा यांनी दिल्लीत सर्वप्रथम जेटली यांचेच घर गाठले होते, असे सांगितले जाते. 

Image result for arun jaitley amit shah

राफेल करारातील कथित गैरव्यवहारांच्या आरोपांपासून केंद्र सरकारविरोधातील सर्वच आरोपांचे जेटली यांनी संसदेबाहेर आणि संसदेमध्येही जोरदार खंडन केले. मोदी यांच्या गेल्या मंत्रिमंडळामध्ये गृहमंत्रीपद राजनाथसिंह यांच्याकडे होते. त्याआधारे राजनाथसिंह यांना मोदींच्या मंत्रिमंडळातील दुसर्‍या क्रमांकाचे मंत्री म्हटले जाते. पण राज्यसभेत 'लीडर ऑफ द हाऊस' असलेल्या जेटली यांनाच अनौपचारिकरित्या भाजपचे दुसर्‍या क्रमांकाचे मंत्री मानले जात असे.

मोदी यांचा पूर्ण विश्वास असल्यामुळेच २०१४ मध्ये अमृतसरमधून निवडणूक गमावल्यानंतरही जेटली यांना अर्थमंत्री करण्यात आले. त्यानंतर काही कालावधीसाठी ते संरक्षणमंत्रीही होते. कॉर्पोरेट अफेअर्सचेही काम त्यांनी पाहिले आहे.

Image result for arun jaitley


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Who will be the go to man for Narendra Modi after Arun Jaitley