नेमबाजीवर 'नेम' (संजय घारपुरे)

नेमबाजीवर 'नेम' (संजय घारपुरे)

ऑलिंपिक स्तरावर नेमबाजी हा खेळ भारताला हमखास यश देणारा खेळ आहे. ऑलिंपिकचं वैयक्तिक सुवर्णपदक भारताला याच खेळातून मिळालं आहे. मात्र, आता पुढच्या राष्ट्रकुल स्पर्धेतून नेमबाजीला वगण्यात येणार असून, त्याच्या जागी टीव्ही रेटिंग मिळू शकेल अशा महिला ट्‌वेन्टी-20 क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. हा नक्की काय प्रकार आहे, याचा कुणाला फटका बसेल, त्यामागचं राजकारण काय आहे या गोष्टींचा लेखाजोखा. 

''राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नेमबाजी नसलं तर काय बिघडतं? मुळात आपण एकेकाळी ब्रिटिशांचे गुलाम होतो, हे दाखवत असलेल्या या क्रीडा स्पर्धेत आपण सहभागीच कशाला व्हायचं? त्याचा फायदा आपल्या नवोदित नेमबाजांना खडतर आशियाई क्रीडा स्पर्धा, जागतिक स्पर्धा, ऑलिंपिक स्पर्धेच्या पूर्वतयारीस होतो, हाच तर याचा फायदा...'' 

तीन वर्षांनी होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आता तिरंदाजी, टेनिसपाठोपाठ नेमबाजीचाही समावेश नसणार, असं सांगितल्यावर अनौपचारिक गप्पांत काही जणांची ही प्रतिक्रिया उमटली, तर त्याच वेळी विविध खेळांच्या प्रसिद्धीचं काम केलेल्या एका क्रीडा अभ्यासकानं एका वेगळ्याच मुद्द्याकडं लक्ष वेधलं. ''नेमबाजी, तिरंदाजी हे खेळ राष्ट्रकुलातून दूर होताना दिसत आहेत; पण आता आपली व्याप्ती, प्रभाव वाढवण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती 'ब्रेक डान्सिंग', 'स्पोर्टस्‌ क्‍लायंबिंग'चा समावेश करण्याचा विचार करत आहे. या परिस्थितीत नव्या बदलाशी खेळांनी जुळवून घेतलं नाही, त्यात प्रयोग करून ते समजण्यास जास्त सोपे केले नाहीत, तर हीच वेळ येणार,'' असं त्यांचं म्हणणं. 

राष्ट्रकुल, ऑलिंपिक, आशियाई क्रीडा स्पर्धा यांसारख्या बहुविध खेळांचं गणित पुरस्कर्त्यांचा प्रतिसाद; तसंच टीव्ही रेटिंग यावर असतं. सन 2010 च्या नवी दिल्लीतल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 36 खेळ होते, ते पुढच्या दोन स्पर्धांत निम्म्यावर आले. त्यावेळीच धोक्‍याची घंटा वाजण्यास सुरवात झाली होती. ही धोक्‍याची घंटा भारतीयच नव्हे, तर जागतिक नेमबाजीसाठी कित्येक वर्षांपासून वाजत आहे. ऑलिंपिकमध्येही नेमबाजी राहणार का अशी चर्चाही अधूनमधून सुरू होते. आता ऑलिंपिकमधल्या खेळाचा समावेश राहण्यासाठी जागतिक नेमबाजी संघटनेनं प्रोन, फ्री पिस्तुल, रॅपिड फायर, डबल ट्रॅप या स्पर्धांना वगळलंच की! आता यातल्या डबल ट्रॅपमध्ये तर भारताला नेमबाजीतलं पहिलं ऑलिंपिक पदक जिंकता आलं होतं. खेळ जास्त आकर्षक करण्यासाठी पुरुष आणि महिलांची स्पर्धक समानता साधण्यासाठी, कमी खेळाडूंत पदकांची संख्या वाढवण्यासाठी मिश्र दुहेरीचा पर्याय आणलाच आहे. रेंजवरच्या पिन ड्रॉप सायलेन्सपासून लोकप्रिय धून वाजवण्यास सुरवात झाली. यानंतरही नेमबाजीवर टांगती तलवार आहे याची भारतीयच नव्हे, तर जागतिक नेमबाजी संघटना पदाधिकाऱ्यांना पूर्ण जाणीव होती. 

शूटिंग रेंजचा अभाव 
बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा संयोजकांनी नेमबाजीच का दूर केली या प्रश्नाचं उत्तर सर्वसाधारणपणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तर रेंज नसणं हेच मिळतं. सन 2014 च्या ग्लास्गो स्पर्धेच्या वेळी नेमबाजी झाली होती बॅरी बडॉन शूटिंग रेंजवर. हे ग्लास्गोपासून दोन तास लांब होतं, तर 2018 च्या गोल्ड कोस्ट स्पर्धेच्या वेळी नेमबाजीची स्पर्धा मुख्य शहरापासून 70 किलोमीटरवर होती. बर्मिंगहॅमला पर्याय सरेचा होता. ते अंतर आहे 220 किलोमीटर; पण मॅंचेस्टर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या वेळी तर नेमबाजीची स्पर्धा सरेमधल्या बिस्ले इथं झाली होती- ते मॅंचेस्टरपासून 322 किलोमीटर दूर होतं, मग आत्ताच हे अंतराचं कारण असण्याचा प्रश्नच येत नाही. 

प्रश्न केवळ अंतराचा नाही, तर आपल्या खेळाचं मार्केटिंग करण्याचा प्रश्न आहे. जागतिक नेमबाजी संघटनेनं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी सर्व साह्य देण्याची तयारी दाखवली, एवढंच नव्हे तर खर्चही करतो असं सांगितलं. मात्र, तरीही बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा संयोजन समितीस ते पटवू शकले नाहीत. नेमबाजी स्पर्धा घेण्याची बर्मिंगहॅममध्ये व्यवस्था नव्हती हे खरंच; पण त्यापेक्षाही नेमबाजी स्पर्धेच्या तिकीटविक्री; तसंच टीव्ही प्रक्षेपण हक्क विकून फारसं उत्पन्न मिळणार नाही अशी संयोजकांची पक्की खात्री झाली होती. त्याचबरोबर हा खेळ तरुणांना फारसं आकर्षित करत नाही, असंही संयोजकांचं मत आहे. मात्र, आता याच पार्श्वभूमीवर महिला ट्‌वेंटी-20 क्रिकेटला कशी पसंती मिळाली हा प्रश्न येतोच. 

नेमबाजीला प्रेक्षक मिळतोच 
नेमबाजीऐवजी महिला ट्‌वेंटी-20 ही उपाययोजना समजुतीच्या पलीकडची आहे. नेमबाजी हा जागतिक स्तरावरचा खेळ आहे. महिला ट्‌वेंटी-20 क्रिकेट राष्ट्रकुलातल्या किती देशांत खेळला जातो, अशी विचारणा राष्ट्रीय नेमबाजी मार्गदर्शिका दीपाली देशपांडे करतात. त्यात नक्कीच तथ्य आढळतं. चौदा जणांचा संघ एक पदक देणार, त्याच वेळी चौदा नेमबाज असले तर किमान दहा ते बारा सुवर्णपदकांसाठी ते प्रयत्न करू शकतात. मात्र, महिला ट्‌वेंटी-20 ला संधी देऊन संयोजक स्पर्धेतल्या महिला क्रीडापटूंची संख्या पुरुष खेळाडूंच्या इतकी असल्याचं दाखवू शकतील, त्याच वेळी जास्त टीव्ही रेटिंग देणारे पुरुषांचे क्रीडा प्रकारही वाढवू शकतील, असंही एक गणित मांडलं जात आहे. ''मला नेमबाजीला चाहते लाभत नाहीत ही संकल्पनाच मान्य होत नाही. तुम्ही खेळाकडे लोकांना कसं आकर्षित करता हे महत्त्वाचं असते,'' असं दीपाली देशपांडे सांगत होत्या. गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या वेळी रेंजवर चाहत्यांना बसायलासुद्धा जागा मिळत नसे. अनेक चाहत्यांनी रेंजबाहेरच्या स्क्रीनवरून खेळाचा आनंद घेतला आहे, हे केवळ अंतिम फेरीच्याच वेळी नव्हतं, तर प्राथमिक फेरीच्या वेळीही हेच चित्र होतं. रसिकांना खेळाबाबत नीट माहिती दिली, त्यातली चुरस दिसली तर ते नक्कीच गर्दी करतात. आता या खेळाचा समावेश न करण्यामागं काहीतरी वेगळं कारण असेल. इंग्लंडला कदाचित आपली पदकं जास्त दिसावीत यासाठी हे केलं असण्याचीही शक्‍यता नाकारता येत नाही. 

केवळ नेमबाजी आणि भारत याचा विचार केला, तर भारतीय नेमबाजांसाठी ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय स्पर्धेची सुरवात असते. राष्ट्रकुल नेमबाजी स्पर्धेत तुलनेत आव्हान कमी असतं, त्याच वेळी आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा अनुभवही मिळतो. कमालीचं मानसिक कौशल्य पणास लागणाऱ्या या स्पर्धेत अपेक्षा वाढवणाऱ्या तसंच जास्त महत्त्वाच्या असलेल्या आशियाई, ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेसाठी मानसिक तयारी होते. ''हा मुद्दा आहेच; पण राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नेमबाजी नसल्यानं आपल्या नवोदित नेमबाजांचं जास्त नुकसान होणार आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेची पूर्वतयारी होणं हा एक मुद्दा आहेच; पण त्या स्पर्धेत पदक जिंकल्यावर मिळणारा आर्थिक लाभही नाकारून चालणार नाही. त्यावरही त्यांना पाणी सोडावं लागणार आहे. विश्वकरंडक किंवा जागतिक स्पर्धेतल्या यशासाठी रोख बक्षीस मिळेलच याची हमी देता येत नाही. खेळाडूंना रोख बक्षिसं मिळण्याची हमी असते ती राष्ट्रकुल, आशियाई आणि ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत. मी माझ्या अनुभवावरून सांगते. मॅंचेस्टर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत चांगलं यश मिळाल्यामुळं मला रोख बक्षीस मिळालं. त्यातून मी नवी रायफल घेऊ शकले. ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेसाठी पूर्वतयारी करू शकले. ही स्पर्धा चार वर्षांनी होत असते. नेमबाजीचा आपण विचार करतो, त्यावेळी आशियाई क्रीडा स्पर्धा आणि ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा यांतलं आव्हान जवळपास सारखंच असतं. आशियाई क्रीडा नेमबाजीत यश मिळाल्यास तुम्ही नक्कीच ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेतल्या पदकाचे प्रबळ दावेदार होता,'' असं अंजली भागवत सांगत होती. 

इंग्लंडचे कठोर निर्बंध 
अंजलीला त्याचबरोबर वेगळाच प्रश्न सतावत आहे. ''भारतीयच नव्हे, तर जगातले बहुतेक आंतरराष्ट्रीय नेमबाज खेळासाठी जे साहित्य वापरतात, त्याची निर्मिती करणाऱ्या कंपन्या बर्मिंगहॅम परिसरात आहेत. तरीही त्यांनी आपली ताकद राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नेमबाजी असावी यासाठी पणास का लावली नाही? विश्वकरंडक स्पर्धांत इंग्लंडच्या नेमबाजांनी चांगली कामगिरी केली आहे, तरीही त्यांनी नेमबाजी का ठेवली नाही हा प्रश्न मला जास्त सलत आहे,'' असं अंजलीनं सांगितलं. अंजलीचाच मुद्दा पुढं नेताना सुमा शिरूर म्हणाली ः ''इंग्लंडमध्ये शस्त्रवापराचे निर्बंध कडक आहेत. त्यामुळे इंग्लंडमधले काही नेमबाज प्रसंगी स्कॉटलंड, आयर्लंड इथं जाऊन आपला सराव करतात. यंदाच्या स्पर्धेच्या वेळी हा अडथळा असावा, असंच मला जास्त वाटतं. मात्र, नेमबाजीच्या सुविधा नसल्यानं स्पर्धा घेतली नसणार हे मला पटत नाही. लंडन ऑलिंपिकच्या वेळी त्यांनी नेमबाजीसाठी तात्पुरती रेंज तयार केली होती. आत्ताही हे सहज शक्‍य होतं. कदाचित आपल्याला या खेळात जास्त पदकं मिळत नाहीत, मग स्पर्धा का घ्या, हा विचार त्यामागं जास्त असू शकेल.'' 

काहीही असो, या निर्णयाचा भारतीय नेमबाजीस नक्कीच फटका बसणार आहे. गेल्या काही वर्षांत भारतीय नेमबाजी जास्तच फोफावली आहे. चुरस वाढली आहे. सातत्यानं नवे विजेते राष्ट्रीय स्पर्धांतून पुढं येत आहेत. संघनिवडीची चाचणी जास्त खडतर होत आहे. त्यामुळेच खडतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांची तयारी राष्ट्रीय निवड चाचणीतूनही होत आहे. त्यामुळे मानसिक क्षमतेचा कस पाहणाऱ्या अंतिम फेरीत भारतीय नेमबाज पात्रता फेरीपेक्षा जास्त सरस ठरत असल्याचं चित्र दिसू लागलं आहे. भारतीय नेमबाजांचं वय कमी होत आहे. मतदानाचा हक्क मिळण्यापूर्वीच आंतरराष्ट्रीय वरिष्ठ स्पर्धांत पदकाचा वेध घेतला जात आहे. 

खरं तर भारतीय नेमबाजी संघटना पदाधिकाऱ्यांनी भारतीय ऑलिंपिक संघटनेतल्या पदाधिकाऱ्यांच्या मदतीनं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतल्या आवश्‍यक 11 क्रीडा प्रकारांत नेमबाजीचा समावेश कसा होईल याकडे लक्ष द्यायला हवं. हे लक्ष्य अवघड असलं, तरी अशक्‍य नक्कीच नाही. खेळाची लोकप्रियता वाढत आहे, त्याचा फायदा घेतल्यास नक्कीच टीव्ही रेटिंगद्वारे दडपण आणता येऊ शकतं. 

आता नेमबाजीला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत स्थान राखण्यात अपयश आलं, तर भारतीय नेमबाजी संघटना पदाधिकारी; तसंच नेमबाज मार्गदर्शकांनी जास्त खडतर आव्हान कसं पार होईल याकडे लक्ष द्यायला हवं. जागतिक नेमबाजीतला वाढता दबदबा पदकांत कसा रूपांतरीत होईल, याकडे लक्ष द्यायला हवं. त्यासाठी नेमबाजांना तयार करायला हवं. किमान राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेवर भर ठेवून तयार केलेला वार्षिक कार्यक्रम बदलून भारतीय नेमबाजांसाठी सन 2024 च्या ऑलिंपिकसाठी तो कसा सहायक होईल, याचा विचार करण्याची संधी आहे. वाईटातून चांगलंही घडत असतं; पण ते करण्याची नक्कीच तयारी हवी. 

राष्ट्रकुल क्रीडा नेमबाजीतले अव्वल पाच देश 
देश सुवर्ण रौप्य ब्रॉंझ 

  • ऑस्ट्रेलिया 70 60 45 
  • भारत 63 44 27 
  • इंग्लंड 49 60 67 
  • कॅनडा 39 40 38 
  • न्यूझीलंड 15 16 21 

नेमबाजीवर एक नजर 

  • सन 1974 पासून 2018 पर्यंत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नेमबाजीचा समावेश 
  • भारतात 2010 मध्ये झालेल्या स्पर्धेत सर्वाधिक 22 प्रकारांत चुरस, त्यानंतर 2014 च्या ग्लास्गो स्पर्धेत 8 च प्रकार, तर 2018 च्या स्पर्धेत 11 प्रकार 
  • नेमबाजीत एकंदर 24 देशांना पदकं 
  • आत्तापर्यंत 294 सुवर्णपदकांसाठी चुरस 
  • सन 2002 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची 30 पैकी 14 सुवर्णपदकं नेमबाजीतली 
  • सन 2006 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची 22 पैकी 16 सुवर्णपदकं नेमबाजीतली 
  • 2010 च्या स्पर्धेत 14 सुवर्णपदकं नेमबाजीतली 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com