जॉर्ज ऑर्वेलच्या '1984'मधील विन्स्टन स्मिथ

विजय निपाणेकर
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

जॉर्ज ऑर्वेलचा (1903-1950) जन्म भारतात बंगालमधील माताहरी येथे झाला. त्यांचे मूळ नाव एरिक आर्थर ब्लेअर. अॅनिमल फार्म (1945) आणि 1984 (1948) या त्यांच्या दोन गाजलेल्या कादंबऱ्या. 1984 या कादंबरीला हुकूमशाहीचे बायबल म्हटले जाते...

दुसऱ्या महायुद्धानंतर समाजवादातून घडू शकणाऱ्या चांगल्या आयुष्यावर टाकलेला विश्‍वास पायदळी तुडवला जाताना पाहिला आणि त्याविरुद्ध ऑर्वेलने शब्दांचे शस्त्र उपसले... 1984 ही कादंबरी लिहिली आणि 1984 कादंबरीचा नायक विन्स्टन स्मिथ... नागरिक क्रमांक 6079 विन्स्टन स्मिथ साकार झाला! 

1984 या कादंबरीचे पहिले वाक्‍य आहे- 'एप्रिल महिन्यातील तो एक दिवस होता.. स्वच्छ ऊन पडलेले होते आणि हवा थंड होती... घड्याळ तेरा वाजलेले दर्शवीत होते...' आणि या सुरवातीच्या वाक्‍यापासूनच वाचक बिग ब्रदरच्या दहशतीच्या जगात खेचला जातो... विन्स्टन स्मिथ... वय वर्षे 39... उजव्या पायाच्या घोट्याच्या वरच्या रक्तवाहिन्यांना व्हेरिकोज अल्सर झालेला... व्हिक्‍टरी मॅन्शन नावाच्या इमारतीत सातव्या मजल्यावर राहणारा... त्याच्या घरात (आणि बाहेर शहरातसुद्धा सर्वत्र) बिग ब्रदरचे भव्य आकाराचे रंगीत पोस्टर... आणि चित्राखाली मोठा मथळा... बिग ब्रदरचे तुमच्यावर लक्ष आहे!... युद्ध म्हणजेच शांती... स्वातंत्र्यात गुलामगिरी आहे आणि अज्ञानात ताकद सामावलेली आहे या तीन घोषणांच्या सावलीत जगणारा विन्स्टन स्मिथ! 

...विन्स्टन स्मिथ... भूतकाळात जगणारा... भूतकाळात रमण्याचे वेड असलेला... बालपणीच्या जिवंत निसर्गाच्या आठवणींनी पछाडलेला... तो 'सत्य' मंत्रालयात कामाला आहे... त्याचे काम म्हणजे भूतकाळातील चुकीचे संदर्भ बदलून पार्टीच्या आजच्या विचारधारेनुसार सुसंगत घटना... आकडेवारी आणि व्यक्तींची निर्मिती करणे... विन्स्टन स्मिथ आणि त्याची मैत्रीण ज्यूलिया यांना त्यांचा भूतकाळ नीटसा आठवत नाही आणि त्यामुळेच ते त्या भूतकाळात परत जाऊ शकत नाहीत... त्याचा आनंद छोट्या-छोट्या घटनांत आहे... अस्सल कॉफीचा वास... सॅकरिनऐवजी अस्सल साखरेचा स्वाद... महोगनी लाकडाचा डबल बेड... गवताचा कोवळा स्पर्श... मिसेस पार्सन या शेजारणीला नळदुरुस्ती करण्यासाठी मदत करणे... अन्यथा त्याचे आयुष्य म्हणजे टेलिस्क्रीनसमोर व्यायामाची कसरत करण्यात चाललेले! 
विन्स्टन स्मिथच्या जीवनातील 'सोनेरी प्रदेश' म्हणजे ज्यूलियाच्या भेटीसाठी शोधून काढलेला ग्रामीण भागातील गवताळ जमिनीचा तुकडा... चेरिंग्टनचे जुन्या वस्तूंचे दुकान... तेच त्याचे आश्रयस्थान बनलेले आणि तेच त्याला अडकवणारा सापळाही बनते! भावनिक आणि बौद्धिकदृष्ट्या भूतकाळातील गुंतवणूक हे स्मिथचे वैशिष्ट्य आहे... दुसऱ्या महायुद्धानंतर चलनाचे वेगाने अवमूल्यन होत गेले आणि जुन्या दुर्मिळ वस्तूंनासुद्धा खरी किंमत मिळेनाशी झाली... माणसांबाबतही असेच म्हणता येईल का? 1984 ही कादंबरी म्हणजे एक असे काल्पनिक विश्‍व आहे, जेथे प्रत्येक गोष्ट मिळण्याचे प्रॉमिस दिले आहे आणि प्रत्यक्षात मात्र काहीच प्राप्त झालेले नाही! 

1984 या कादंबरीत महत्त्वाचे स्थान आहे ते 'न्यूस्पिक' या भाषेला... कादंबरीच्या शेवटी या न्यूस्पिक भाषेबद्दल सविस्तर परिशिष्ट दिलेले आहे... शब्द कमी करणारी ही न्यूस्पिक भाषा म्हणजे एक धारदार जीवघेणा जोक आहे! संक्षिप्त भाषा... व्यक्तित्व हिरावून घेण्याची भयानक प्रक्रिया म्हणजे क्रियापदांचे नामात संक्षिप्त रूपांतर करणे... ज्याचे प्रत्यंतर दिसते माणसे अंतर्धान पावण्यात! 'मीडियम इज मेसेज' हा एक अर्धशून्य क्‍लीशे येथे आहे... आज संगणक... व्हॉट्‌सअॅप... फेसबुकवरही संक्षिप्त न्यूस्पिक भाषा आपल्याही जीवनात आलेली दिसते... शाईपेन गेले... बॉलपेन आले... हार्ड कॉपी गेली... सॉफ्ट कॉपी आली... लिखाणाची गती वाढली, पण विचारांची गती वाढली का? भग्न चर्चजवळ विन्स्टन आणि ज्यूलिया भेटतात... हाडामासांचे जिवंत क्षण जगतात... माणसाने किती भव्य गमावले आणि किती किरकोळ कमावले, याचे हादरवून टाकणारे ते प्रतीक आहे... 'कसे'पेक्षा 'का' समजून घेणे अवघड होते... धर्माचे अवमूल्यन आणि भौतिकवादाची वाढ हा एक ओळखीचा क्‍लीशे! 

कादंबरीच्या शेवटी विन्स्टनला खोली नंबर 101 मधे पाठवतात... प्रत्येकाचा भयंगड वेगळा असतो... त्यानुसार त्याच्यावर 'उपचार' केले जातात आणि विन्स्टनचा भयंगड म्हणजे उंदीर... सर्वकाही कुरतडून टाकणारा उंदीर... आणि त्या उंदरांच्या भीतीने तो 'ही शिक्षा मला नको.. ज्यूलियाला द्या...' असे कबूल करतो आणि तो कायमस्वरूपी आतून बदलतो... बिग ब्रदरबद्दल त्याच्या मनात नितांत भक्तिभाव निर्माण होऊन तो नतमस्तक होतो... 
असे आहे विन्स्टिन स्मिथचे जग... 'बिग ब्रदरची तुमच्यावर नजर आहे' या भयावहतेची वारंवार जाणीव करून देताना जॉर्ज ऑर्वेलचा हा विश्‍वास होता, की विन्स्टन स्मिथसारखी हजारो सर्वसामान्य माणसे मीडियाच्या माध्यमातून आपल्यातूनच निर्माण होतील, जी कोणत्याही बिग ब्रदरला जाणीव करून देतील, की 'विन्स्टन स्मिथ या सर्वसामान्य माणसाची तुमच्यावर नजर आहे!' 

Web Title: winston smith from 1984 by george orwell