
भारतीय संस्कृतीत महिलांना फार मानाचं स्थान आहे. ‘यत्र नार्यस्य पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः’ ही आपली खरी संस्कृती!
वात्सल्य इंदुमाई
डॉ. संजय वाटवे
भारतीय संस्कृतीत महिलांना फार मानाचं स्थान आहे. ‘यत्र नार्यस्य पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः’ ही आपली खरी संस्कृती! आजकाल सर्व क्षेत्रांत महिलांचं वर्चस्व दिसून येतं. एके काळी अबला गणली गेलेली आता सबला झाली आहे; पण जेव्हा महिला आजच्यासारख्या शिकलेल्या, प्रगत नव्हत्या, तेव्हा त्यांचं जीवन खडतर होतं.
सत्य जीवन कल्पितापेक्षा सुरस असतं. खऱ्या जीवनात काही व्यक्ती अशा भेटतात, की चकित व्हायला होतं. मला एका महिला संस्थेचा फोन आला, की एक खूप खराब अवस्था असलेली परित्यक्ता पाठवते आहे. नेहमीप्रमाणे चॅरिटी केस आहे. बरोबर आमच्या इंदुमावशी येतील.
इंदुमावशी ५४, ५५ वर्षाच्या असतील. चेहऱ्यावर एक सात्त्विक प्रेमळ भाव. शिडशिडीत अंगकाठी, ‘गहू’वर्ण. केस पिकलेले. नाकीडोळी ठीकठाक. त्या मुलीला हाताला धरून घेऊन आल्या. वयाच्या मानानं हालचाली जलद होत्या.

दागिना म्हणजे हातात गुरूचा गंडा. गळ्यात साईबाबांचा ताईत. मला म्हणाल्या, ‘‘माझी लेक आणली आहे. बघा हिला काय काय होतंय’’ ‘‘लेक? बाई तर म्हणाल्या इंदुमावशी येतील म्हणून.’’ ‘‘मीच इंदुमावशी. या सगळ्या पोरी लेकीच आहेत माझ्या.’’ डोळ्यात माया दाटलेली.
पुढे त्या केसच्या निमित्तानं इंदुमावशी बरेचदा माझ्याकडे आल्या. बोलताबोलता त्यांची स्टोरी समजली. इंदुमावशींचं माहेर मोरगाव. घरात पूजेच्या सामानाचा व्यवसाय. शिक्षण सातवी पास. लवकरच्या वयात कुरकुंभच्या शेतकरी कुटुंबात उजवली. मूलबाळ झालं नाही म्हणून नकुशी.
ऐन पंचविशीत असताना नवरा अपघातात गेला. ‘आमचा मुलगा गिळला’ म्हणून सासरी पांढऱ्या पायाची ठरली. स्वभाव स्वाभिमानी आणि अंगात तेज. अपमानित विधवा म्हणून किती दिवस कळ काढणार? त्या काळी स्रिया एकट्या राहत नसत. अशा काळात पुन्हा लग्न न करण्याचा निर्धार. अशा महिलेला जे जे संघर्ष सहन करावे लागतात ते सगळं नशिबी आलं.
एक दिवस निर्धार केला पुण्याला जाऊन, कष्ट करून स्वाभिमानानं जगायचं. असल्या थेरांना सासरी विरोध; पण ती नकुशी असल्यामुळे तिला हाकलण्याचा निर्णय सर्वसंमतीनं घेण्यात आला. सासरचा हक्क म्हणून छप्पर मागितलं. काचकूच झाली; पण एकदाची ब्याद जाईल म्हणून वारज्याजवळ माळवाडीला छप्पर मिळालं.
गावाबाहेर म्हणून स्वस्त. किडूकमिडूक स्त्रीधन घेऊन घराबाहेर पडल्या. कुरकुंभचा आणि या घराण्याचा यापुढे संबंध राहणार नाही, सासरचं नाव लावणार नाही या कागदावर सही करूनच. माहेरी ओझं म्हणून राहायचं नव्हतंच. माळवाडीला जाऊन स्वयंसिद्धेचं जीवन सुरू केलं. नशिबानं हिंगण्याला नोकरी मिळाली.
भाकरीचा प्रश्न सुटला; पण आतल्या प्रेरणा स्वस्थ बसू देईनात. फॉल, पिकोची कामं सुरू केली. घरगुती लोणची, कुरडया, पापड विकायला सुरुवात केली. लवकरच ती लोकप्रिय झाली. हळूहळू बाकीच्या बायका मदतीला येऊ लागल्या. मग जोडीला शेंगदाणा, लसूण चटणी, मसाले विकायला सुरुवात केली. धंद्यात बरकत आली. दहा वर्षांत महिलांची एक संघटना स्थापन केली. संस्थेचं नाव होतं ‘निवेदिता’.
‘‘या सगळ्या प्रवासात पुरुषांचे अगणित वाईट अनुभव आले. एकटी, निराधार विधवा म्हणजे ‘सावज’. म्हणून स्वसंरक्षणासाठी तेजस्वी व्हावंच लागलं. करता करता अशा बळी पडलेल्या सावज मुली उद्ध्वस्त झालेल्या पाहिल्या. या मुलींना मी घरी आणून ठेवून घेऊ लागले. वाईट इतिहास पुसून टाकून स्वबळावर जगायला शिकवू लागले,’’ इंदुमावशी सांगत होत्या.
‘‘अशा मुलींचं मी आता एक होस्टेलच काढलं आहे- ‘पाखर’. या पोरी माझ्याकडे राहतात. आईच्या वरताण जीव लावतात आणि एक दिवस स्वयंपूर्ण होऊन ती पाखरं उडून जातात. आज माझ्याकडे अशा १९ मुली आहेत. याही एक दिवस उडून जाणार; पण मायेच्या ओढीनं सणासमारंभाला, वाढदिवसाला येऊन माझ्या कुशीत शिरणार. सगळ्याच पोरींना लागते नकुशीची कुशी!’’
आजकालच्या स्वार्थी जगात अशा आदर्श व्यक्ती फक्त कथा कादंबऱ्यात, सिनेमात असतात. मी तर समोर पाहत होतो. थोर समाजकार्य करायला, दुसऱ्याचा उद्धार करायला सधन किंवा सुशिक्षित असावं लागत नाही. अंतर्मनात पाहिजे माणुसकी, जिद्द, करुणा, जिव्हाळा आणि वात्सल्य! या गुणांनी परिपूर्ण कर्तबगार इंदुमाईना महिला दिनानिमित्त दंडवत!