आरोग्याचा आरसा : हेल्थ पॅकेजेस

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 25 July 2019

सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...

वुमन हेल्थ - भारती ढोरे-पाटील, स्त्रीरोगतज्ज्ञ
अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असणारे डायग्नोस्टिक सेंटर्स व त्यांच्या स्त्रियांच्या आरोग्याची काळजी घेण्याची वेगवेगळ्या पद्धती म्हणजेच पॅकेजेस, एकंदरीत गोंधळून टाकणारे आणि गुंतागुंतीचे होऊन बसले आहेत. या पद्धती सर्वसामान्य पेशंटचा गोंधळ उडवून टाकतात, हे मला अलीकडे माझ्या भाचीने फोनवर काही शंका व्यक्त केल्यावर प्रकर्षाने जाणवले. म्हणूनच आपणा सर्वांसाठी मी हा विषय या लेखाद्वारे निवडला. 
एकंदरीत आरोग्याविषयी आपण सर्व जण जागरूक होऊयात... 
‘सर सलामत तो पगडी पचास’

गैरसमज १
रक्ताच्या तपासण्या या फक्त आजारी व्यक्तीची करण्याची गोष्ट आहे. मला याची गरज नाही. किंबहुना मी एकदम हेल्दीच आहे.

समज - कोणत्याही आजाराशिवायसुद्धा रक्त तपासणी करण्याची गरज असते. कारण, बरेचसे आजार होण्याअगोदर शरीराच्या आतमध्ये होणारे सूक्ष्म बदल हे आपल्याला वाकुल्या दाखवत असतात. गरज असते ती पाहून प्रतिबंधक उपाय शोधण्याची! रक्ताची तपासणी कमीत कमी वर्षातून एकदा तरी करणे, हे फार प्रभावी अस्त्र स्वतःच्या आरोग्यासाठी असते. 

कोणत्या रक्त तपासण्या कराव्यात?
शरीरातील ५ अवयव अत्यंत महत्त्वाचे आणि कार्यक्षम असतात. मेंदू, हृदय, फुफुसे, लिव्हर, किडनी यांना केंद्रित ठेवून त्यांच्या कार्यक्षमतेचा आढावा घेणाऱ्या तपासण्या सर्वांनाच आवश्‍यक असतात. 

गैरसमज २
डायबेटीस, थायरॉईड व कोलेस्टेरॉल हे फक्त वय जास्त झालेल्या स्त्रियांनाच होतात.

समज - वय वर्षे २५ ते ३५ या वयातील सर्वसाधारण महिलांना असा गैरसमज असतो. परंतु, अलीकडील बदलत्या जीवनशैलीमुळे, निष्क्रिय जीवनपद्धती, चुकीचा आहार आणि ताणतणाव या सर्वांमुळे आपल्या शरीरातील झीज झालेल्या, मेलेल्या पेशींचे उत्सर्जन होतच नाही आणि त्याला आपण आरओएस म्हणजेच रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पेसीज निर्माण होतात आणि त्या आपली प्रतिकार शक्तीच कमी करतात. त्यामुळे तरुण वयातही वरील आजारांची सुरवात झाल्याचे अलीकडे झालेल्या संशोधनातून सिद्ध झाले आहे. डॉक्टरी सल्ल्यानुसार आपण तरुण वयातही या टेस्टचा विचार करायला हवा. योग्य आहार, तणावविरहित आणि सक्रिय जीवनपद्धती असेल, तरीही त्या सर्व शरीरांच्या प्रक्रियेबरोबर चालत आहेत का? हे पाहणे आजच्या काळातील गरजच.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Women Health Bharati Dhore Patil maitrin supplement sakal pune today