प्रेग्नन्सी आणि सोनोग्राफी : केव्हा आणि कोणती?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...

वुमन हेल्थ - डॉ. भारती ढोरे-पाटील, स्त्रीरोगतज्ज्ञ
प्रेग्नन्सीच्या कालावधीतील चाचण्यांमध्ये सोनोग्राफी अत्यावश्यक आणि महत्त्वाची चाचणी आहे; त्याचबरोबर याबद्दल तितक्याच शंका आणि गैरसमजही समाजात अजूनही दिसून येतात. स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून प्रॅक्टिस करीत असताना आजपर्यंत माझ्या पेशंटना पडलेल्या प्रश्‍नांमध्ये सोनोग्राफी हा खूप महत्त्वाचा प्रश्‍न मी अनुभवलेला आहे. गरोदरपणात सोनोग्राफी करावी का, ती संपूर्ण सुरक्षित असते का, सोनोग्राफी नेमकी केव्हा करावी, कोणती सोनोग्राफी आवश्यक असते आणि कोणती सोनोग्राफी ऐच्छिक असते, नेमकी  कोणती माहिती त्या टेस्टमधून मिळू शकते आणि त्याचा पेशंटना काय फायदा होतो, कितीवेळा सोनोग्राफी करणे सुरक्षित असते, अशा अनेक प्रश्‍नांनी त्यांच्या मनात काहूर केलेले मी अनुभवले आहे आणि त्याचसाठी या लेखाद्वारे या प्रश्‍नाची उत्तरे देण्याचा हा एक प्रयत्न...

सर्वसाधारणपणे संशोधकांनी आजपर्यंतच्या प्रेग्नन्सीमध्ये सोनोग्राफी ही सुरक्षित टेस्ट आहे आणि त्यामुळे बाळाला अथवा गरोदर स्त्रीला काहीही धोका नसतो, हे निरक्षणातून सिद्ध केले आहे. त्याचबरोबर प्रेग्नन्सीच्या कालावधीत काही समस्या उद्‍भवली, तर त्याचे वेळेत निदान आणि इलाज करण्यासाठी अत्यंत उपयोगी अशी ही टेस्ट ध्वनिलहरींवर आधारित असते आणि यामध्ये कोणत्याही प्रकारची रेडिएशन्स उत्सर्जित होत नाहीत.

१. डेटिंग स्कॅन (पहिले ७ ते १० आठवड्यांदरम्यान) : ही पहिली तपासणी आवश्यक असते. यामध्ये गर्भधारणा व्यवस्थित झाली आहे काय व बाळाची वाढ कशी होत आहे, हे पाहिले जाते. बाळाच्या लांबीनुसार त्याचे किती आठवडे झाले आहेत आणि डिलिव्हरीची अचूक तारीख कळू शकते. एकापेक्षा जास्त गर्भ असण्याची शक्यता पडताळून पाहता येते आणि त्यानुसार पुढील प्रेग्नन्सीच्या कालावधीत काळजी घेता येते. क्वचित प्रसंगी रक्तस्राव झाला असल्यास किंवा गर्भधारणा गर्भाशयाच्या बाहेर नसल्याची तपासणीद्वारे खात्री करून घेता येते. अशी ही पहिली सोनोग्राफी आवश्यक चाचणी असते.
उर्वरित चाचण्यांची माहिती पुढील भागात घेऊ.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: women health bharati dhore patil maitrin supplement sakal pune today