पंडितजींची ती दाद म्हणजे 'सुवर्णपदक'च! (यादवराज फड)

यादवराज फड
रविवार, 3 जून 2018

तालमीच्या वेळी कित्येक वेळा सदाशिवरावांच्या सुरांनी माझे डोळे भरून यायचे. भरल्या कंठानं मला पुढं गाताच यायचं नाही. अशी "गोबहरहरी' गायकी शिकण्याचं भाग्य मला लाभलं. गो म्हणजे इंद्रिय, पर्यायानं इंद्रियांना बहर आणणारी गायकी, असाच किराणा घराण्याच्या गायकीचा लौकिकच आहे.

तालमीच्या वेळी कित्येक वेळा सदाशिवरावांच्या सुरांनी माझे डोळे भरून यायचे. भरल्या कंठानं मला पुढं गाताच यायचं नाही. अशी "गोबहरहरी' गायकी शिकण्याचं भाग्य मला लाभलं. गो म्हणजे इंद्रिय, पर्यायानं इंद्रियांना बहर आणणारी गायकी, असाच किराणा घराण्याच्या गायकीचा लौकिकच आहे.

माझा जन्म वारकरी संप्रदायाची पार्श्‍वभूमी लाभलेल्या शेतकरी कुटुंबात वरवटी (ता. अंबाजोगाई) या गावी झाला. आजोबा केरबा फड हे परिसरातले प्रसिद्ध पैलवान आणि भजनगायक होते. वडील महादेव फड हे भावार्थ रामायण गात. मात्र, शास्त्रीय संगीताची पार्श्‍वभूमी नव्हती. मी सहावीत असताना गावच्या भजनी मंडळाला मार्गदर्शन करण्यासाठी गोविंदगुरुजी यांना बोलावण्यात आलं. त्यांचं राहणं आणि जेवण आमच्या घरीच होतं. त्यांच्या सहवासानं मला संगीताची आवड निर्माण झाली. मी एक वर्ष त्यांच्याकडं भजन शिकलो. तेवढ्या शिदोरीवर कीर्तनात चाल म्हणणं, इतर गायकांना साथ करणं इतपत माझी प्रगती झाली होती. पुढच्या वर्षी गुरुजींना जालना जिल्ह्यात शिकवणी मिळाली. मीही त्यांच्यासोबत साळेगावला दीड महिना राहून शिकलो. दिवाळीला गावी आल्यानंतर परत गेलो नाही. तिकडं शाळेत अर्धं वर्ष गैरहजेरीमुळं सातवीची परीक्षा देता आली नाही आणि इकडं भजनाचं शिक्षणही थांबलं. आमच्या गावापासून 20 किलोमीटरवर तळणी या गावी भीमराव पाटील हे गायक राहत होते. मग मी त्यांच्याकडं जाऊन सहा महिने शिकलो. पुढं सातवीला प्रवेश घेऊन शिक्षण सुरू ठेवलं. मराठीचे आद्यकवी मुकुंदराजस्वामींची अंबाजोगाई इथं समाधी आहे. हे मोठं संस्थान असून तिथं माधवशास्त्री हे प्रमुख होते. हायस्कूलच्या शिक्षणादरम्यान मी त्यांच्या कीर्तनातल्या साथीसाठी औरंगाबाद, जालना, परभणी, लातूर, सोलापूर या जिल्ह्यांत फिरलो. पुढं आर्थिक परिस्थिती सुधारावी, यासाठी किरकोळ कर्ज घेऊन मी किराणा मालाचं दुकान थाटलं होतं. आठेक महिने ते चांगलं चाललंही; पण नंतर त्यासंदर्भात वडिलांशी माझे काही मतभेद झाले आणि "आता गावी राहायचं नाही...संगीताचं उच्च शिक्षण घेऊन मैफलीचा गायक व्हायचं,' असा दृढ निश्‍चय करून मी पुण्याला यायचा निर्णय घेतला. त्या वेळी दुकानात दहा हजार रुपयांहून अधिक भांडवल गुंतलेलं होतं; पण त्यातला एक पैसाही मी बरोबर घेतला नाही. कार्यक्रम करून मिळवलेलं साडेतीनशे रुपये इतकं मानधन माझ्याजवळ होतं. तेवढ्या रकमेच्या जोरावरच मी गाव सोडून तडक सोलापूर गाठलं. सोलापूरचे संगीतप्रेमी अप्पासाहेब ढगे यांच्या वाड्यात दरवर्षी आठ दिवसांचा सप्ताह साजरा होई. त्या सप्ताहात पूर्वी मी गायलो होतो. त्यांना माझं गायन खूप आवडे. मी त्यांच्याकडं गेलो. "मला गाणं शिकायचं आहे; चांगल्या गुरूंकडं माझ्या शिक्षणाची व्यवस्था करा,' अशी गळ मी त्यांना घातली. माझी ओढ पाहून ते मला पुण्याला घेऊन आले. किराणा घराण्याचे मातब्बर गायक पंडित सदाशिवराव जाधव यांच्याकडं त्यांनी माझ्या शिक्षणाची व्यवस्था केली. वारकरी संप्रदायाच्या पार्श्‍वभूमीमुळं पुण्यातल्या गोखलेनगर भागातल्या भीमराव डोंगरे यांच्या हनुमान मंदिरात राहण्याची आणि माधुकरीची व्यवस्था झाली. गुरुदक्षिणा देण्यासाठी माझ्याजवळ काहीच नव्हतं. मग गुरूंचे कपडे धुऊन देणं, क्‍लासची साफसफाई करणं, वाद्यांची देखभाल अशी कामं करून सन 1982 ते 87 या कालावधीत गोखलेनगर ते टिळक रस्त्यावरचं "पूना सतार विद्यालय' इथं रोज पायी जाऊन मी संगीतशिक्षण घेतलं. माधुकरीलाही पायीच जावं लागे. मात्र, शिकण्याच्या आनंदापुढं या कष्टांचं काहीच वाटत नसे. सदाशिवरावांनी पहिलं दीड वर्ष मला अलंकार आणि "यमन' राग शिकवला. पुढं "बिहाग', "मारुबिहाग', "पूरिया', "मालकंस', "बसंत', "अभोगी', "तोडी', "ललत', "भैरव', "वृंदावनी सारंग', "मुलतानी', "भीमपलास', "मारवा', "हिंडोल', "कामोद' हे राग सहा सहा महिने शिकवून मला तयार केले. गंधारावर जायला अर्धा तास लागे. बुवांची गायकी आलापप्रधान, दमदार, विस्तारक्षम होती आणि मांडणी सुरेल होती. तालमीच्या वेळी कित्येक वेळा त्यांच्या सुरांनी माझे डोळे भरून यायचे. भरल्या कंठानं पुढं गाताच यायचं नाही. अशी "गोबहरहरी' गायकी शिकण्याचं भाग्य मला लाभलं. गो म्हणजे इंद्रिय, पर्यायानं इंद्रियांना बहर आणणारी गायकी, असाच किराणा घराण्याच्या गायकीचा लौकिकच आहे. सन 1986 मध्ये राज्यपातळीवरच्या स्पर्धेत दोन वेळा प्रथम आणि चार वेळा द्वितीय क्रमांकाची पारितोषिकं मला मिळाली. सन 1987 मध्ये आकाशवाणीची ऑडिशन मी उच्च श्रेणीत उत्तीर्ण झालो. आकाशवाणीहून प्रसारित झालेला माझा पहिला कार्यक्रम ऐकून गावकऱ्यांना खूप आनंद झाला. त्यांनी "तानपुरा' देऊन माझा सत्कार केला आणि गायनाची मैफलही घडवून आणली. त्या दिवशी गावजेवण देऊन वरवटीकरांनी आनंदोत्सवच साजरा केला! सन 1988 मध्ये मला "माणिक-माधव भाजेकर ट्रस्ट'ची शिष्यवृत्ती मिळाली. असा गतिमान प्रवास सुरू असतानाच सदाशिवरावांना घशाचा कर्करोग झाल्याचं निदान झालं. त्यामुळं त्यांचं गाणं बंद झालं. द्रवपदार्थांव्यतिरिक्त त्यांना काही खाताही येत नसे. अशा बिकट काळात गुरूंसाठी काहीतरी केलं पाहिजे, हा विचार मनात आला. पुण्यातल्या एक-दोन संस्थाप्रमुखांना भेटून वस्तुस्थिती कथन करून मदतीची विनंती केली; पण त्यात मला यश आलं नाही. शेवटी, आपण स्वतःच संस्था स्थापन करावी आणि तीद्वारे गुरूंना मदत करावी, असं ठरवलं. त्यातून "संगीतोन्मेष' या संस्थेची स्थापना करून निधी जमवायला सुरवात केली. अप्पासाहेब ढगे यांच्या अध्यक्षतेखाली पंडित भीमसेन जोशी यांच्या हस्ते 25 हजार रुपयांची थैली देऊन सदाशिवरावांचा सत्कार केला. या कार्यक्रमापासून पंडितजींच्या अर्थात भीमसेनजींच्या मी लक्षात राहिलो. सत्कारानंतर काही महिन्यांतच सदाशिवरावांचं निधन झालं. हे दुःख कमी म्हणून की काय, त्यानंतर सहा महिन्यांतच अप्पासाहेब ढगे यांचंही देहावसान झालं. माझे दोन्ही आधार गेले. एकटेपणाच्या भावनेनं उदासी आली. या वातावरणातून बाहेर येण्यासाठी
मिरज इथं होणाऱ्या खॉंसाहेब अब्दुल करीम खॉं पुण्यतिथी महोत्सवाची मदत मला झाली. या महोत्सवातल्या दर्ग्याच्या सेवेच्या वेळी मी गायलेला "ललत' हा राग ऐकून पंडित फिरोज दस्तूर मला म्हणाले ः ""जाधवबुवांनी तुला फार इमानदारीनं शिकवलं आहे. तुझ्यासाठी माझंही दार चोवीस तास उघडं आहे. केव्हाही ये.'' मलाही पुढं मार्गदर्शन घ्यायचंच होतं; पण पुणे-मुंबई प्रवास करून शिकणं मला आर्थिकदृष्ट्या शक्‍य नव्हतं. दरम्यान, सदाशिवरावांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त मी पंडित भीमसेनजींना गायची विनंती केली. ती त्यांनी मान्यही केली. मात्र, "तुमच्या गुरूंची पुण्यतिथी आहे, तेव्हा तुम्ही अर्धी मैफल गा, मी अर्धी मैफल गातो,' असं त्यांनी सुचवलं. या मैफलीत मी गायलेला "पूरिया' आणि पिलू ठुमरी पंडीतजींनी समोर बसून ऐकली आणि म्हणाले ः ""तुमचं गाणं मी माझ्या बंगल्यावर (कलाश्री) करणार आहे.'' अनपेक्षितपणे मिळालेल्या या "सुवर्णपदका'नं मी भारावून गेलो! पंडितजींसारख्या स्वरभास्कराचं मन जिंकल्याचं भाग्य मला अनुभवायला मिळालं.

सन 1992 मध्ये मी डॉ. ना. वा. दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली "संगीत-अलंकार' प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालो. सन 1993 मध्ये वैशाली मुंडे हिच्याशी माझं लग्न ठरलं. लग्नपत्रिका देण्याच्या निमित्तानं मी "कलाश्री'वर गेलो. लग्न अंबाजोगाईला असल्यानं पंडितजी आशीर्वाद देऊन म्हणाले ः ""लग्नानंतर पुण्यात आल्यावर पहिल्यांदा माझ्याकडं या.'' आम्ही लग्नानंतर पुण्यात आलो; पण एवढ्या मोठ्या कलाकाराकडं कसं जायचं या दडपणापोटी बरेच दिवस पंडितजींकडं गेलोच नाही. एके दिवशी नवी पेठेत माउली टाकळकर भेटले आणि ते सरळ मला पंडितजींकडं घेऊन गेले. मला पाहताच पंडितजी म्हणाले ः ""एकटेच आलात?'' मी निरुत्तर झालो. ""कसं चाललंय?'' असं त्यांनी विचारताच माझे डोळे भरून आले. ""तुमच्या आशीर्वादानं सर्व काही ठीक आहे,'' असं मी दाटल्या कंठानं सांगितलं आणि म्हणालो ः ""सदाशिवरावबुवा गेल्यापासून माझं गाणं शिकणं बंदच आहे. मला पदरात घ्या. तुमच्या परीसस्पर्शानं माझ्या लोखंडाचं सोनं होईल.'' त्यावर पंडितजी म्हणाले ः ""घर तुमचंच आहे, कधीही या.'' नंतर त्यांनी मला त्यांचा फोननंबर दिला आणि "उद्या सकाळी सात वाजता फोन करून या' असं म्हणाले. ठरल्यानुसार, दुसऱ्या दिवशी सात वाजता मी फोन केला, तर ते ""या' म्हणाले. मिठाई, श्रीफळ, पुष्पगुच्छ घेऊन गेलो. पंडितजींना नमस्कार केला. थोड्या वेळानं ते मला रियाजाच्या खोलीत घेऊन गेले. तानपुरा जुळवून हाती दिला आणि त्यांच्या सुरांनी अजरामर झालेला "पूरिया' मला शिकवायला त्यांनी सुरवात केली. विलंबित ठेक्‍यात बंदिशीचे शब्द तालाच्या खंडाप्रमाणे कसे भरायचे ते सांगितलं. सन 1993 ते 2000 या काळात "पूरिया धनाश्री', "पूरिया कल्याण', "शंकरा', "दुर्गा', "शुद्ध कल्याण', "दरबारी' हे राग खास "भीमसेनी शैली'नं मला शिकता आले. आपल्या विश्‍वव्यापी सुरांनी ज्यांनी संगीतक्षेत्रात क्रांती घडवली, त्या महान विभूतीसमोर बसून आपल्याला संगीत शिकायला मिळेल, अशी मी कल्पनाही केली नव्हती...पण ते प्रत्यक्षात घडलं. कणस्वरांचा प्रभावी वापर, पहिल्या आवर्तनापासून रंग कसा भरला जाईल हे पाहणं आणि गाणं एकूणच हुकमी कसं असावं हे मला तिथं शिकता आलं.
सन 1995 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांच्यासमोर गायनाची संधी मला मिळाली. "मै भूली घर जाने बाट' ही संत तुकाराममहाराजांची हिंदी रचना ऐकण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.

तिथल्या तिथं चाल लावून मी ती रचना गायिलो. ती रचना ऐकून राष्ट्रपती आनंदून गेले. कार्यक्रमानंतर माझी व्यक्तिगत चौकशीही त्यांनी केली. या घटनेमुळं संत तुकाराममहाराजांच्या हिंदी रचनांचा "मधुरा बानी' हा नवीन कार्यक्रम निर्माण झाला. मराठी संतांच्या पारंपरिक रचनांना चाली लावलेला "भक्ती स्वरगंध', शंकरावर आधारित "शिवस्मरण' आणि "मधुरा बानी' असे नवीन कार्यक्रम मी बसवले.
सन 1996 मध्ये मला केंद्र सरकारची शिष्यवृत्ती मिळाली. सन 1997 मध्ये "सूरमणी' किताब मिळाला, तर 1998 मध्ये सवाई गंधर्व संगीत महोत्सवात गाण्याची संधी पंडितजींनी मला दिली. विविध कारणांमुळं 2000 ते 2003 ही तीन वर्षं माझ्या कसोटीची आणि सत्त्वपरीक्षेची गेली. सन 2002 मध्ये एका पहाटेनं मला साद दिली ः "काय चिंता करतोस? तुझ्या परंपरेचं संमेलन भरव...सर्व काही ठीक होईल'. त्यानुसार 2003 मध्ये "पहिलं अखिल भारतीय वारकरी संगीत संमेलन' शनिवारवाड्यावर माझ्या अध्यक्षतेखाली भरलं. आतापर्यंत 12 संमेलनं पार पडली. या उपक्रमानं सिद्धी, प्रसिद्धी मिळाली. माझ्या विवंचना दूर झाल्या; किंबहुना माझ्या कलेला जीवदान मिळालं. या परंपरेविषयी माझ्या मनात कृतज्ञभाव आहे.

सन 2000 नंतरचा पंडितजींचा काळ आजारपणातच गेला; त्यामुळं पंडित महादेवबुवा गंधे यांच्याकडं मी दोन वर्षं शिकलो. त्यांनी एका रागात अनेक बंदिशी दिल्या. शिवाय "रामकली', "बिलासखानी तोडी', "अल्हैया बिलावल', "गौडमल्हार', "बहार', "गौडसारंग' हे राग शिकवले. 20 वर्षांहून अधिक काळ विद्यार्जन करून स्वचिंतनातून मी "उमारंजनी', "गहिनी कल्याण', "राजकंस' "नंदश्री' हे चार नवे राग निर्माण केले. अनेक बंदिशी, ठुमऱ्या रचल्या. ही हातून झालेली नवनिर्मिती एक वेगळाच आत्मविश्‍वास आणि आंतरिक समाधान देते. परंपरा सुरू राहावी या हेतूनं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचं कार्यही मी अनेक वर्षं करत आहे. सुनील पासलकर, राधाकृष्ण गरड, कोमल कनाकिया, अमोल मोरे आदी विद्यार्थी नावलौकिक मिळवत आहेत. आता पासलकर आणि गरड यांचेही विद्यार्थी मैफली करतात.
माझ्या या सांगीतिक प्रवासात अडीअडचणीच्या वेळी डॉ. सदानंद बोरसे, पी. एन. देशपांडे, प्रकाश घुले, अवधूत हर्डीकर, चंद्रशेखर अडावदकर, स्वाती पाटणकर, सुलभा तेरणीकर यांनी मोलाची मदत केली, आधार दिला, म्हणूनच प्रवास सुकर झाला.

जाणकारांची दाद हीच साधनेची सार्थकता
मी गायिलेला "ललत' राग ऐकून प्रसिद्ध संगीतदिग्दर्शक राम कदम आणि प्रसिद्ध पार्श्‍वगायक चंद्रशेखर गाडगीळ यांना अश्रू अनावर झाले होते. खॉंसाहेब अब्दुल करीम खॉं यांच्या पुण्यतिथीच्या महोत्सवात 1991 मध्ये मिरजला झालेल्या मैफलीतली ही गोष्ट आहे. त्या वेळी राम कदम तर मला म्हणाले होते ः ""माझा सदाशिव (पंडित सदाशिवराव जाधव) गेला नाही. तुझ्या गळ्यात तो जिवंत आहे.''
***
सन 1996 मध्ये पंडित भीमसेन जोशी यांचं "सवाई गंधर्व महोत्सवा'च्या सांगतेचं गायन सुरू होतं. "अल्हैया बिलावल' नंतर "जमुना के तीर' ही भैरवी ठुमरी त्यांनी सुरू केली आणि मला गायचा इशारा केला. मी दोन आवर्तनं गाऊन समेवर आलो तेव्हा समोरच्या हजारो श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
***
सन 2015 मध्ये "विरासत संगीत महोत्सवा'त माझा "मियॉं मल्हार' ऐकून प्रसिद्ध संगीतकार रवी दाते यांनी 21 हजार रुपयांचं बक्षीस दिलं आणि म्हणाले ः "भीमसेनजींनंतर मियॉं मल्हार आज ऐकायला मिळाला.''
या तीन आठवणी माझ्या कलेचं चीज झाल्याचं समाधान देतात. शेवटी, जाणकारांची दाद हीच साधनेची सार्थकता असते!

Web Title: yadavraj phad write article in saptarang