..तो बनाके छोडेंगे आशियाँ!

..तो बनाके छोडेंगे आशियाँ!

स्वराज्य हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे, हे बरोबर आहे; पण अन्याय आणि असहिष्णुता याविरुद्ध लढणं हेही आपले जन्मसिद्ध कर्तव्य आहे. शिवाजीराजे कायम याच तत्त्वाच्या बाजूनं उभे राहिले. तुम्हीही त्याच बाजूनं उभे राहिले पाहिजे. आयुष्यभर तुम्ही कितीही मोठे, प्रसिद्ध किंवा ताकदवान राहिलात तरी तुमची माणुसकी दुर्बळांविषयीच्या तुमच्या जबाबदारीवरून ओळखली जावी, हे विसरू नका. हे ध्येय गाठत असताना अन्याय दिसेल तिथं त्याविरुद्ध उभं राहणं, हे तुमचं मूलभूत कर्तव्य ठरतं.

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी आम्ही पन्हाळा किल्ल्यालगत मसाई पठारावर होतो. भल्या पहाटे निघालेलो आम्ही टेबल लॅंडवर पोचून सूर्योदयाची वाट बघत होतो. वेढून राहिलेल्या अंधारातून प्रकाशाचा पहिला किरण झेपावला, तसे आम्ही स्तब्ध झालो. आकाशाच्या विशाल पटलावर लाल रंगाची हळुवार उधळण करत सूर्यबिंब वर येऊ लागलं. आम्ही मुग्ध होऊन तो देखावा न्याहाळात होतो. शांततेचा भंग केला.

‘‘किती सुंदर दृश्‍य आहे,’’ ती उद्गारली. ‘‘प्रत्येक दिवस एक नवी सुरवात घेऊन येतो आणि आपलंही तसंच असलं पाहिजे; पण आपण तसा विचार करत नाही. कारण, आपण भूतकाळात केलेल्या चुकांच्या पकडीत अडकून राहतो.’’ आश्‍चर्यानं तिच्याकडं बघितलं. ‘‘मीना, अगं तू कार्यकर्ती आहेस, कवयित्री नव्हे.’’ ‘‘म्हणजे तुम्ही माझ्याशी सहमत नाही का सर?’’ मीनानं विचारलं. 

‘‘हो,’’ मी म्हणालो, ‘‘एका मर्यादेपर्यंत हे खरं आहे, की भूतकाळाचा भविष्यकाळाशी संघर्ष होतो; पण आपण भूतकाळातल्या संदर्भांचे बळी होणं थांबवून इच्छित आयुष्य घडवायला सुरवात केली पाहिजे.’’ क्षितिजाकडं निर्देश करून मी पुढं म्हणालो : ‘‘नव्या दिवसाकडं बघ. त्यानं तुला विनाअट शुभेच्छा दिल्या, की नियम आणि याचिकांची मागणी केली? मग तूसुद्धा त्याच पद्धतीनं पूर्वग्रह न बाळगता हात पुढं करून शुभेच्छा देणार नाहीस का? आपल्या भूतकाळानं आपला वर्तमानकाळ जखडून ठेवण्यात मला काही कारण दिसत नाही. भूतकाळ हा मृत असतो, त्यातून भूतकाळात आपण जसे असतो तसे आज नसतो किंवा उद्या होणारही नसतो. आपण भूतकाळात काही चुकीचे पर्याय निवडले असतील, तरी त्यावरून आपली आजची ओळख ठरू देऊ नये.’’

यावर आमचा जाड चष्मेवाला मित्र नेहमीच्या ‘विचारवंत थाटा’त म्हणाला : ‘‘हो. ते खरं आहे सर. नवी सुरवात करण्यापासून आपल्याला कोणतीही गोष्ट रोखू शकत नाही.’’

‘‘नुसतं खरंच नव्हे, तर संपूर्णपणे खरं आहे मित्रा,’’ मी म्हणालो, ‘‘तसं केल्यानं आपल्याला कुणाचीही माफी मागावी लागत नाही, आपल्या भावना किंवा कृतींचं जगाला स्पष्टीकरण द्यावं लागत नाही, आपल्याला असुरक्षित बनवणाऱ्या किंवा आपल्या आत्मसन्मानाची उपेक्षा करणाऱ्या लोकांपुढं नमतं घ्यावं लागत नाही. लक्षात ठेवा. जीवनातलं खरं दार बाहेरच्या दिशेनं उघडणारं असतं आणि परिस्थिती कितीही खडतर असली तरी आपण धैर्यानं या दारातून बाहेर पडून मार्ग शोधला पाहिजे किंवा नवा मार्ग बनवला पाहिजे.’’ -माझ्या बोलण्याला पहिलवान मित्रानं जोरदार दाद दिली. 

‘‘वाहव्वा. जबरदस्त भाषण आहे.’’ आमच्या गटातला रफीक हा वैद्यकीय शाखेत शिकणारा विद्यार्थी. स्वभावानं लाजराबुजरा. त्यानं हात उंचावून विचारलं : ‘‘सर, सिद्दी जौहरनं या पन्हाळा किल्ल्याला वेढा घातला होता, तेव्हा स्वराज्याचं भवितव्य अनिश्‍चित दिसत असताना हेच विचार शिवाजीराजांच्या मनात आले असतील का?’’ त्यावर करण उत्स्फूर्तपणे उद्गारला : ‘‘खरंच की. कल्पना करा की शिवाजीराजांनी वेढ्यातून नियोजनपूर्वक सुटका करून घेत याच भूमीतून वाट काढत विशाळगड कसा गाठला असेल....’’

मी मान डोलवली; पण त्या प्रतिक्रियेनं माझ्यावर फार प्रभाव पडला नाही. मी म्हणालो : ‘‘तुम्हा सगळ्यांना शिवाजीराजांचा अभिमान आहे; पण एक गोष्ट तुम्ही सांगू शकता का, की शिवाजीराजे आयुष्यभर खरोखर कशासाठी आणि कुणासाठी लढले?’’ हा प्रश्न अपर्णाला थोडासा अपमानास्पद वाटला. ती लगेच म्हणाली : ‘‘सर, तुम्ही अभ्यासू आहात, हे आम्हाला ठाऊक आहे; परंतु हा तुमचा शेरा अयोग्य आहे. शिवाजीराजे सगळ्यांचे होते. प्रत्येकाला ते आणि त्यांच्या धाडसी कामगिऱ्यांबाबत माहीत आहे. अफझलखानाविरुद्धची मोहीम, लाल महालावर छापा आणि आग्र्याहून सुटका...असे कितीतरी प्रसंग सांगता येतील.’’

‘‘तुझं म्हणणं खरं आहे,’’ मी म्हणालो : ‘‘पण शौर्य हाच शिवाजीराजांचा एकमेव गुण होता का? वास्तवात धाडस हे मराठ्यांसह इतरांचंही वैशिष्ट्य होतं.’’ ‘‘मराठा म्हणजे वांशिक गट,’’ असं तुम्हाला म्हणायचं आहे का?’’ मीनाक्षीनं विचारलं. 

मी म्हणालो :‘‘नाही. वांशिक किंवा जात या अर्थानं मी मराठा म्हणत नसून या मऱ्हाटभूमीत राहणारे विविध समुदाय मला अभिप्रेत आहेत. पाहिजे असल्यास तू त्यांना महाराष्ट्रीय म्हण. हे लोक इतिहासाच्या एका टप्प्यावर आपल्यातले मतभेद विसरून सामूहिक भावनेनं एकत्र आले आणि देशाला एका झेंड्याखाली आणण्यात जवळपास यशस्वी झाले. प्रसंगोपात्त एका मुद्द्याची फारशी चर्चा झाली नसली तरी मला तो स्पष्ट करू देत. मराठा असण्याचा संबंध केवळ जन्म, आडनाव किंवा एखाद्या विशिष्ट भौगोलिक प्रदेशाशी नसून, ज्या जीवनपद्धती आणि संस्कारांवर आपली श्रद्धा असते त्याच्याशी असतो, असं मी मानतो. माझ्या दृष्टीनं जात, वंश किंवा लिंग विचारात न घेता, अशी कुणीही व्यक्ती मराठा ठरते, जी शिवाजीराजांनी त्यांच्या जीवनातून दाखवून दिलेल्या आदर्शांनुसार जगण्यास सज्ज असते.’’

या तरुणांच्या गटाला आणखी काही सांगावं, या हेतूनं मी पुढं म्हणालो, ‘‘वर्ष २०१७ मध्ये माझ्या संकल्पाबाबत मी बोलेन, असं वचन मी तुम्हाला दिले होतं; पण आता माझा विचार बदललाय. जीवनात पुढं काय वाढून ठेवलंय, कुणास ठाऊक; पण विसरून जाण्याआधी विचारेन म्हणतो. तुम्ही मला आज गुरू दक्षिणा देणार का?’’

‘‘नक्कीच. आम्ही तुम्हाला हवी ती गुरू दक्षिणा देऊ,’’ अपर्णा म्हणाली. ‘‘थांबा. घाई करू नका,’’ मी इशारा दिला. म्हणालो : ‘‘मी मागेन ते देणं तितकंसं सोपं नाही. लक्षपूर्वक ऐका, कारण आज मी तुमच्याशी शिळोप्याच्या गप्पा मारणार नसून भारताच्या एका गौरवशाली सुपुत्राचं वर्णन करणार आहे.’’

ऐतिहासिक संदर्भ ध्यानात न घेता शिवाजीराजांना जाणून घेणं सोपं नाही. इसवीसनाच्या चौदाव्या शतकात दख्खनमधल्या मराठा घराण्यांनी सुलतानांच्या लष्करी सेवेत प्रवेश करायला सुरवात केली. सतराव्या शतकापर्यंत त्यातील काहींनी संपन्न आणि प्रतिष्ठित दर्जा मिळवत राजकीय अधिकारही प्राप्त केले. शिवाजीराजांचे वडील शहाजीराजे हे विजापूरच्या आदिलशाहीतले असेच मातब्बर सरदार होते. शिवाजीराजांचा जन्म सन १६३० मध्ये जुन्नरच्या शिवनेरी किल्ल्यावर माता जिजाबाईंच्या पोटी झाला. त्याआधी परिस्थिती अशी विचित्र बनली होती, की शहाजीराजे आणि त्यांचे सासरे लखुजी जाधवराव यांच्यात कौटुंबिक संघर्ष उफाळून आला होता. जिवावर उठलेल्या लखुजीराजांपासून वाचण्यासाठी शहाजीराजे दूर जाऊ पाहत होते. त्यांनी गर्भवती जिजाबाईंना जुन्नर इथं ठेवलं. जिजाबाईंकडं या वेळी एक छोटी सशस्त्र शिबंदी, तसंच आदिलशाहीतल्या पुणे व सुपे या किरकोळ जहागिऱ्या होत्या. शिवाजीराजांकडची वडिलोपार्जित मालमत्ता तर महाराष्ट्राच्या भूगोलात टीचभर म्हणावी इतकीच होती. पुन्हा या दोन जहागिऱ्यांतही मराठ्यांमधले हेवेदावे ही गंभीर समस्या होती. एकीकडं अत्यंत शूर आणि पराक्रमी असलेल्या मराठ्यांत घराण्यातलं वैर, मानापमान आणि वैयक्तिक स्वार्थ यासाठीची क्षुल्लक भांडणं उफाळून येत असत. त्यामुळं ताकद विखुरली जाऊन ते दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी एकत्र येत नव्हते. शिवाजीराजांनी प्रथम या मराठ्यांना एकत्र आणलं आणि स्वराज्याची कल्पना त्यांच्यात रुजवली. विजापूरची आदिलशाही आणि औरंगजेबाचं मुघल साम्राज्य यांच्याविरुद्ध आयुष्यभर गनिमी काव्यानं संघर्ष करत त्यांनी पश्‍चिम घाटाचा मुलुख स्वतंत्र केला आणि सन १६७४ मध्ये त्याचं रूपांतर एका छोटेखानी; पण स्वतंत्र राज्यात केलं. या घटना सगळ्यांनाच ठाऊक आहेत; पण शिवाजीराजांचं मोठेपण केवळ एक राज्य स्थापन करण्यात नसून आपल्या जनतेच्या मनात त्यांची कायमस्वरूपी उज्ज्वल अशी ओळख निर्माण करण्यात आहे. याआधी मराठ्यांची ओळख केवळ त्यांचं घराणं किंवा वैयक्तिक वंशपरंपरागत जहागिऱ्यांवरून होत असे. शिवाजीराजे मात्र थेट सर्वसामान्यांपर्यंत पोचले आणि त्यांनी लोकांमध्ये स्वराज्याची कल्पना रुजवली. त्यांची विश्वसनीयता आणि ध्येयाची जादू अशी होती, की ही ओळख मराठा मानसिकतेची कायमस्वरूपी वारसा बनली.

शिवाजीराजांची प्रशासनविषयक अनेक मूल्यं काळाच्या ओघात मवाळ झाली, तरी मराठ्यांची आपल्या भूमीशी जुळलेली मुळं इतकी भक्कम होती, की तोच पुढील काळात त्यांचा एक राजकीय शक्ती बनण्याचा पाया ठरला. शिवाजीराजांच्या मृत्यूनंतर पश्‍चिम घाटातल्या आपल्या छोट्याशा स्वराज्याचं रक्षण करण्याची इतकी प्रबळ आकांक्षा मराठ्यांमध्ये उफाळून आली, की त्यांनी सन १६८१ ते १७०७ ही २७ वर्षं ताकदवान आलमगीराशी झुंज दिली. औरंगजेबानं सन १६८९ मध्ये शिवाजीराजांचे थोरले चिरंजीव संभाजीराजे यांचे अनन्वित हाल करून हत्या केल्यानंतरही मराठ्यांनी हार मानली नाही. मराठी मुलुख मुघलांनी जिंकल्यावरही स्वराज्याची संकल्पना महाराष्ट्रीय लोकांच्या मनातून मावळली नाही.

आजचा महाराष्ट्र हा संमिश्र ओळख असलेल्या भारताचा एक भाग आहे. शिवाजीराजांनी आपल्याला स्वराज्याची ओळख जतन करण्यास व सुरक्षित राखण्यास शिकवलं. काळ बदलला असून आता आपण भारताची एकात्मता जपणं गरजेचं आहे. शिवाजीराजांनी आपल्याला स्वातंत्र्य व समावेशक सरकारची संकल्पना शिकवली. आज आपल्याकडचा मौल्यवान ठेवा असलेली लोकशाही ही त्याच दृष्टिकोनाचं फलित असून आपण कोणतीही किंमत मोजून हा ठेवा जपला पाहिजे. म्हणूनच तुमच्याकडून मला पहिलं वचन हे हवं आहे, की तुम्ही आयुष्यभर केवळ चांगले महाराष्ट्रीय किंवा चांगले तमीळ, चांगले ब्राह्मण किंवा चांगले दलित, चांगले हिंदू किंवा चांगले मुस्लिम एवढेच न राहता नेहमी चांगले भारतीय राहा आणि लोकेच्छेवर आधारित आपल्या प्रशासनाच्या मूलभूत प्रारूपाचं रक्षण करा. ‘बोला, तुम्ही हे वचन देता का?’ मी विचारलं. यावर तरुण मित्रांनी काहीच उत्तर दिलं नाही. फक्त विचारणा केली ‘‘दुसरं वचन कोणतं?’’ मी म्हणालो : ‘‘हे तुम्हाला ठाऊक असेलच, की शिवाजीराजे हे लोकांचे राजे होते. तुम्हाला त्याचा अर्थ माहीत आहे का?’’ ‘‘नक्कीच,’’ पहिलवान म्हणाला, ‘‘त्यांना रयतेचा राजा म्हणत.’’ 

त्यावर मी समजावलं : ‘‘हो, पण त्यांनी रयतेच्या मनात हे स्थान कसं निर्माण केलं, हे मला सांगाल का?’’ उमा म्हणाली ‘‘त्यांनी गरिबांसाठी जुलमी ठरलेली वतनदारी व्यवस्था नष्ट केली.’’ ‘‘अगदी बरोबर; पण तुला हे माहीत आहे, का की हे पाऊल उचलण्यासाठी किती धाडसाची गरज होती ते?’’ शिवाजीराजांच्या काळात जहागीरदार हे प्रस्थापित राजकीय व प्रशासकीय सत्तेचे प्रतिनिधी होते. त्यांच्याशी थेट संघर्ष करणं, ही काही सोपी गोष्ट नव्हती. तरीही शिवाजीराजे जहागीरदारांच्या विरोधात उभे राहिले. कारण, त्यांना आढळलं, की ही व्यवस्था गरिबांचे शोषण करणारी होतीच; परंतु राजकीय ऐक्‍याच्याही विरोधात होती. महाराष्ट्रातल्या बड्या जमीनदार घराण्यांची सत्ता दुबळी करण्यासाठी त्यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केले. कारण, राज्यातल्या शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारण्याच्या त्यांच्या प्रयत्नाचाच तो एक भाग होता. त्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना केवळ सारामाफी आणि सवलतीच दिल्या नाहीत, तर त्यांच्या दु:खाचं कारण असलेली सरंजामशाही व्यवस्था नष्ट करण्याकडंही लक्ष दिलं.’’ ‘‘हे बरंच कठीण ठरलं असणार,’’ कुणीतरी मागून कुजबुजलं. ‘‘होय. हे काम अवघड होतंच; पण शिवाजीराजांनी ते करण्याची हिंमत दाखवली. कारण, त्यांना सत्ता, अधिकार आणि मान्यता ही काही केवळ उच्च कुळातल्या जन्मामुळं मिळाली होती असं नव्हे, तर ती त्यांना रयतेकडून मिळाली होती. म्हणूनच ते रयतेचे राजे होते. शिवाजीराजांच्या सुधारणांमुळं वतनदारी संपत चालली, याचा राग मनात धरून वतनदारांनी त्यांच्याविरुद्ध खूप कट-कारस्थानं केली; पण अखेर त्यांनाही मान्य करावं लागलं, की कार्यकारी प्रशासनाचं साधन हे कुणा व्यक्तीच्या मालकीचं नसून राज्याचं असतं आणि राज्य यंत्रणा ही मोजक्‍या व लाडक्‍या लोकांसाठी नसते, तर सगळ्यांच्या कल्याणासाठी असते. शिवाजीराजे हयात असेपर्यंत त्यांनी स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाच्या ताकदीवर ही यंत्रणा कुशलतेनं राबवली. त्यांच्या मृत्यूनंतर मात्र सरंजामी व्यवस्थेनं पुन्हा उचल खाल्ली. अखेर स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेअंतर्गत लोकेच्छेनुसार ही व्यवस्था कायमची नष्ट झाली.’’

‘‘पण सर, जर ही व्यवस्था नष्ट झाली असेल, तर तिचा आपल्याशी काय संबंध?’ जाड चष्मेवाल्यानं विचारलं.

‘‘मित्रांनो, संबंध आहे. जमीनदारी नष्ट झाली असली तरी तिची जागा इतर यंत्रणा आणि हितसंबंधांनी घेतली आहे. आपण अद्याप गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘जिथं मन निर्भय असेल आणि मस्तक उन्नत असेल,’ असा देश घडवण्याच्या ध्येयापासून खूप लांब आहोत. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही प्रगती जरूर झाली आहे; पण ती समाधानकारक किंवा समावेशक नाही. सामाजिक, आर्थिक, धार्मिक अशा अनेक मार्गांनी सर्वसामान्यांचं शोषण होतच आहे. स्वराज्य हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे, हे बरोबर आहे; पण अन्याय आणि असहिष्णुता याविरुद्ध लढणं हेही आपले जन्मसिद्ध कर्तव्य आहे. शिवाजीराजे कायम याच तत्त्वाच्या बाजूनं उभे राहिले.

तुम्हीही त्याच बाजूनं उभे राहिले पाहिजे. आयुष्यभर तुम्ही कितीही मोठे, प्रसिद्ध किंवा ताकदवान राहिलात तरी तुमची माणुसकी दुर्बळांविषयीच्या तुमच्या जबाबदारीवरून ओळखली जावी, हे विसरू नका. हे ध्येय गाठत असताना अन्याय दिसेल तिथं त्याविरुद्ध उभं राहणं, हे तुमचं मूलभूत कर्तव्य ठरतं. शिवाजीराजांनी कुणीही व्यक्ती, वर्ग अथवा जात यांच्याविरुद्ध टोकाची भूमिका घेतली नाही. सर्वांविषयी सहिष्णुतेवर आधारित समाज निर्माण करण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचलं. आता मला सांगा. तुम्ही अशा पद्धतीनं लढा देण्याचं वचन मला देणार का?’’ या प्रश्नावर पुन्हा शांतता पसरली. 

‘‘शेवटचं वचन कोणतं ते सांगा,’’ मीना म्हणाली.

शेवटचं वचन धर्माबाबत आहे. मी म्हणालो. ‘‘म्हणजे देव असा अर्थ घ्यायचा का?’’ मीनाक्षीनं विचारलं. 

मी म्हणालो : ‘‘नाही. मला धर्मच म्हणायचं आहे. औरंगजेबानं त्याच्या राजवटीत केवळ हिंदूंवर जिझिया नावाचा कर लादला होता. शिवाजीराजांनी त्याला पत्र पाठवले. त्यात ते म्हणतात : ‘या भूमीत मुस्लिम, हिंदू, ख्रिस्ती आणि इतर लोकसमूह गुण्यागोविंदानं राहत आहेत. तुमचे आजोबा अकबर बादशहा हे सहिष्णुता आणि सर्वधर्मसमभावासाठी प्रसिद्ध होते. जिझिया कर लादण्यानं गरिबांच्या अडचणींत भर पडेल आणि तुमचं साम्राज्य टिकणार नाही. पवित्र कुराण हे देवानं सांगितलं आहे, त्यानंही देवाच्या विविध लेकरांमध्ये कधी भेदभाव केलेला नाही. मशिदींमध्ये मुस्लिम अजान देतात, तर हिंदू त्यांच्या मंदिरात घंटानाद करतात. दोघंही आपापल्या पद्धतीनं एकाच ईश्‍वराची पूजा करत असतात. त्यात कसला आहे फरक?’ शिवाजीराजांनी या पत्रातून औरंगजेबाला धोक्‍याचा इशारा दिला आहे. माणसं किंवा संस्था कितीही ताकदवान असल्या तरी असहिष्णुतेमुळं त्यांचा नाश होतो. शांतता आणि समृद्धी सहिष्णुतेच्या चौकटीतच जिवंत राहू शकतात. माझ्या दृष्टीनं या पत्रात एक खोल अर्थ दडला आहे. इसवीसनाच्या सतराव्या शतकात धर्म व राजकारण यांचा दृढ संबंध होता. औरंगजेबाच्या राजवटीत धर्म केवळ सर्वसामान्यांच्या पातळीवरच नव्हे, तर राज्याच्या पातळीवरही प्रभाव गाजवत होता. व्यक्तीच्या ओळखीप्रमाणेच तो राजकीय व लष्करी धोरणांनाही कारणीभूत ठरत होता. शिवाजीराजांनी हे पाहिलं आणि एक पर्यायी राजकीय व्यवस्था निर्माण करून त्याला उत्तर दिलं. त्यांनी हिंदूंच्या पारंपरिक धार्मिक नात्याचा समन्वय आधुनिक सहिष्णू स्वयंशासनाच्या संकल्पनेशी साधला आणि सर्व धर्मश्रद्धांसाठी ते तत्त्व उपयोगात आणले. हिंदवी स्वराज्याची तत्त्वज्ञानात्मक बैठक ही होती. हिंदवी म्हणजे हिंदुस्थानात राहणारे सर्वजण आणि स्वराज्य म्हणजे स्वयंशासन. अशा रीतीनं हिंदूंच्या भावनांना राजकीय पातळीवर न्याय देताना शिवाजीराजांनी आपल्या मुस्लिम प्रजेलाही त्यांच्या धर्मश्रद्धांचं पालन करण्याची मुभा दिली. आपल्या राज्यात त्यांनी

मुस्लिम प्रजेवर अत्याचार होऊ दिले नाहीत. त्यांचं वेगळेपण असं होतं, की हिंदू राज्याची राजकीय उभारणी करताना त्यांनी सहिष्णुता हे राज्याचं अधिकृत धोरण बनवण्याचा पायंडा पाडला आणि त्याची अंमलबजावणीही कठोरपणे केली. ’’‘‘मग काय म्हणणं आहे तुमचं?’’ जाड भिंगाच्या चष्मेवाल्यानं विचारलं. म्हणालो : ‘‘मला तुम्ही असं वचन द्या, की देव हा धर्मापेक्षा मोठा आहे आणि धर्म वेगवेगळे असले तरी देव एकच आहे, अशी श्रद्धा तुम्ही आयुष्यभर बाळगाल.’’ ते सगळेजण उठले आणि न बोलता निघून गेले. मी एकटा बसून राहिलो. मला वाटलं, की मुलं नाराज झाली; पण काही वेळाने ते सगळेजण परत आले. जाड भिंगाचा चष्मेवाला म्हणाला : ‘‘सर, तुम्ही मागितलेल्या वचनांचं प्रचंड दडपण आमच्यावर येत आहे. आम्ही ते निभावू याची खात्री नाही; पण आम्ही एक प्रतिज्ञा निश्‍चितपणे करू शकतो.

गर रगों मे जोश-ए-बहार है, 
तो बना के छोडेंगे आशियाँ
बस यही है ना बर्क है खंदाजन, 
तो हजार बार गिरा करे ।

(जर धैर्याचे चैतन्य आमच्यात वसत असेल, तर आम्ही वचन देतो, की आम्ही एक बाग उभारू आणि तसं करताना वीज कोसळून आमचं काम नष्ट झालं, तरी आम्ही हिंमत हारणार नाही. हजारो वेळा कोसळण्यासाठी आम्ही विजेला आमंत्रण देऊ.)
‘‘तथास्तु. अगदी असंच होऊ दे,’’ मी समाधानानं आशीर्वाद दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com