आवाजांचे दूत (योगेश बनकर)

योगेश बनकर yogesh.bankar@esakal.com
रविवार, 13 मे 2018

मोबाईल किंवा इतर उपकरणांवरची गाणी ऐकवण्यापलीकडं अनेक गोष्टी करणारे "स्मार्ट स्पीकर' सध्या लोकप्रिय व्हायला लागले आहेत. तुम्ही नुसत्या सूचना करायच्या आणि त्यानुसार हे "आवाजाचे दूत' कामं करणात. इंटरनेटवरच्या काही गोष्टी सर्च करण्यापासून, घरातली स्मार्ट उपकरणं नियंत्रित करण्यापर्यंत अनेक गोष्टी आपण फक्त आवाजाच्या माध्यमातून करू शकतो. अशाच काही "स्मार्ट स्पीकर्स'बाबतची ही माहिती...

मोबाईल किंवा इतर उपकरणांवरची गाणी ऐकवण्यापलीकडं अनेक गोष्टी करणारे "स्मार्ट स्पीकर' सध्या लोकप्रिय व्हायला लागले आहेत. तुम्ही नुसत्या सूचना करायच्या आणि त्यानुसार हे "आवाजाचे दूत' कामं करणात. इंटरनेटवरच्या काही गोष्टी सर्च करण्यापासून, घरातली स्मार्ट उपकरणं नियंत्रित करण्यापर्यंत अनेक गोष्टी आपण फक्त आवाजाच्या माध्यमातून करू शकतो. अशाच काही "स्मार्ट स्पीकर्स'बाबतची ही माहिती...

स्मार्ट फोन, स्मार्ट वॉच, स्मार्ट टीव्ही यांच्यासारख्या गोष्टींच्या गराडयात आज आपण जगतोय. बाजारात सतत नवीन तंत्रज्ञान येतं आणि मग त्यावर आधारीत नवीन गॅजेट. या स्मार्ट गॅजेट्‌समध्येच आता भर पडली आहे "स्मार्ट स्पीकर्स'ची. आपल्या आवाजाद्वारे नियंत्रित करता येणारे "वायरलेस स्पीकर्स' आज अनेक कंपन्या बाजारात आणत आहेत. "आर्टिफिशिअल इंटेलिजन्स'चा वापर या स्पीकर्समध्ये केला जातो- ज्यामुळं आपण केलेली एखादी सूचना तो स्पीकर ऐकतो आणि तशी कृती करतो. "ब्लूटूथ' किंवा "वायफाय' कनेक्‍शनचा वापर करून या स्पीकर्सद्वारे आपण संगीत तर ऐकू शकतोच; पण त्यासोबतच घरातल्या "होम ऑटोमेशन' असलेल्या गोष्टीही नियंत्रित करू शकतो. त्यामुळं हे स्मार्ट स्पीकर्स घरालादेखील "स्मार्ट' बनवण्याचं काम करतात. या स्पीकर्सचा उपयोग फक्त गाणी ऐकण्यासाठीच नाही होत. आपलं वेळापत्रक, महत्त्वाची कामं, खरेदीची यादी या सगळ्या गोष्टींची नोंद ठेवण्याचं आणि वेळेवर आठवण करून देण्याचं काम हे स्पीकर्स करतात. आपल्या स्मार्ट फोनशी कनेक्‍ट करून "ब्लूटूथ' किंवा "वायफाय'द्वारे हे स्पीकर्स वापरता येतात. हे स्मार्ट स्पीकर्स घरात कुठंही एका ठिकाणी ठेवून आपल्या आवाजाद्वारे नियंत्रित करता येतात, ही त्याची खासियत. त्यामुळं गाणं ऐकण्यासोबतच घरातली लहान-मोठी कामं एका जागेवर बसून आवाजाद्वारे नियंत्रित करण्याचा आनंदही हे स्पीकर्स देतात. नुसतं "बसल्या जागेवरून सूचना सोडायच्या' असा शब्दप्रयोग आपण अनेकदा वापरतो. हे स्मार्ट स्पीकर्स अक्षरशः ती मजा घेण्याचा आनंद आपल्याला देतात. अशाच स्पीकर्सपैकी काही ठराविक आणि चांगल्या स्पीकर्सची माहिती आपण घेऊ.

ऍमेझॉन इको (Amazon Eco)
ऍमेझॉननं बाजारात आणलेला हा स्मार्ट स्पीकर खिशाला परवडणाऱ्या किंमतीतदेखील उपलब्ध आहे. "ऍमेझॉन इको डॉट', "ऍमेझॉन इको' आणि "ऍमेझॉन इको प्लस', 'ऍमेझॉन इको शो' या तीन प्रकारांमध्ये हा स्मार्ट स्पीकर उपलब्ध आहे. "ऍमेझॉन इको डॉट' हे त्यातलं बेसिक मॉडेल आहे. ऍपलच्या "सिरी' प्रमाणंच या स्पीकरमध्ये "ऍलेक्‍सा' हे "व्हॉइस असिस्टंट' फिचर देण्यात आलं आहे. आपल्या घरातल्या वायफाय कनेक्‍शनशी जोडल्यानंतर आपल्या आवाजाद्वारे हा स्पीकर नियंत्रित करता येतो. आपल्या स्मार्टफोनमध्ये "प्लेस्टोअर'वरून "ऍलेक्‍सा ऍप' डाऊनलोड करावं लागतं. हे ऍप इन्स्टॉल केल्यानंतर ते वापरून एकदा हा स्मार्ट स्पीकर वायफायला कनेक्‍ट केला की झालं! आपलं आवडतं गाणं लावणं, कामांची यादी बनवणं, अलार्म लावणं, पॉडकास्ट ऐकणं, ऑडिओ बुक्‍स ऐकणं, हवामानाचे अपडेट्‌स, वाहतुकीचे अपडेट्‌स यांसारख्या आणखी अनेक गोष्टी "ऍलेक्‍सा' करू शकते. इतकंच काय, तर या स्पीकरद्वारे आपला फोनही आवाजाद्वारे नियंत्रित करू शकतो. एखाद्याला कॉल करणं, आलेल्या कॉलवर बोलणं, मेसेज पाठवणं यांसारख्या गोष्टी या स्मार्ट स्पीकरद्वारे करता येतात. आपण विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर या "ऍलेक्‍सा मॅडम' आपल्याला इंटरनेटवर शोधून देतात. भारतीय भाषा वापरून हा स्पीकर नियंत्रित करणं सध्या शक्‍य नसलं, तरी भविष्यात तसे अपडेट्‌स मिळू शकतात. गाणी ऐकण्यासाठी या डिव्हाइससोबत "ऍमेझॉन म्युझिक", "सावन', "गाना' यांसारख्या साइट्‌सचं सबस्क्रीप्शनही मिळतं. तसंच यामध्ये रेडीओदेखील ऐकता येतो. "ऍमेझॉन इको शो' या स्मार्ट स्पीकरद्वारे तर व्हिडिओ कॉलही करता येतो. यासोबत असलेल्या स्क्रीनवर कामाची यादी, गाण्याचे बोल अशा इतर गोष्टीही बघता येतात.

ऍपल होमपॉड (Apple Homepod)
स्मार्ट स्पीकर्सच्या बाजारात उशिरा का होईना या वर्षी "ऍपल'नं उडी घेतली. या वर्षी जानेवारी महिन्यात ऍपलतर्फे "होमपॉड' लॉंच करण्यात आलं. ऍपलच्या इतर उपकरणांसोबत होमपॉड वापरता येतं. होमपॉड सुरू केल्यानंतर ते आपल्या जवळचं ऍपलचं डिव्हाइससोबत (आयफोन, आयपॅड इत्यादी) जोडलं जातं. "सिरी' या ऍपलच्या "व्हॉइस असिस्टंट'द्वारे हा स्पीकर नियंत्रित करता येतो. आपण विचारलेल्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर "सिरी' इंटरनेटवर शोधून देते. "होमपॉड' फक्त स्मार्ट स्पीकर नसून "स्मार्ट होम असिस्टंट' आहे. घरातल्या एखाद्या खोलीत हा स्पीकर कुठंही ठेवला, तरीही आपला आवाज ते ऐकू शकतं आणि त्याद्वारे नियंत्रित केलं जाऊ शकतं. मोठ्या आवाजात गाणी सुरू असली, तरीदेखील आपला आवाज ओळखून हा स्पीकर सांगितलेली गोष्ट फॉलो करतो. एखादं गाणं आवडलं, तर ते आपण "प्ले-लिस्ट'मध्ये समाविष्ट करायला सांगू शकतो. नंतर ती "प्ले-लिस्ट' ऐकवण्याची सूचनादेखील करू शकतो. घरातली स्मार्ट उपकरणंदेखील नियंत्रित करू शकतो. मात्र, गाणी ऐकण्यासाठी "होमपॉड' फक्त "ऍपल म्युझिक'ला सपोर्ट करत असल्यानं "ऍपल म्युझिक'शिवाय इतर ठिकाणी असलेली गाणी यावर ऐकता येत नाहीत.

गूगल होम (Google Home)
अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिमवर चालणारे स्मार्ट फोन वापरणाऱ्यांसाठी हे डिव्हाइस चांगला पर्याय आहे. गूगलचं स्वतःचं प्रॉडक्‍ट असल्यानं त्यासाठी स्मार्ट फोनमध्ये लागणारे अपडेट्‌स वेळेवर मिळू शकतात. या स्मार्ट स्पीकरद्वारे "गूगल प्ले म्युझिक', "गाना', "सावन' यांवरची गाणीही ऐकू शकतो. "गूगल होम मॅक्‍स' हे मॉडेल बाजारात उपलब्ध असलेलं सध्याचं सर्वांत लोकप्रिय मॉडेल आहे. इतर "स्मार्ट स्पीकर्स'प्रमाणं हेदेखील गाणी ऐकणं, रिमाइंडर सेट करणं, अलार्म लावणं अशी कामं करतातच; पण त्यासोबतच हवामानाचे अपडेट्‌स देणं, ट्रॅफिकचे अपडेट्‌स, महत्त्वाच्या बातम्या इत्यादी माहितीदेखील देतं.

जेबीएल लिंक 300 स्मार्ट स्पीकर (JBL link 300 Smart Speaker)
"जेबीएल' हे नाव हेडफोन, इयरफोन, स्पीकर बनवणारी कंपनी म्हणून चांगलंच लोकप्रिय आहे. चांगल्या प्रकारच्या "साऊंड क्वालिटीसाठी' जेबीएल ओळखलं जातं. याच कंपनीचा "जेबीएल लिंक 300' हा स्मार्ट स्पीकर सध्या बाजारात उपलब्ध आहे. या स्पीकरमध्ये सध्या व्हॉइस कॉल करता येत नसला, तरी इतर स्मार्ट स्पीकरप्रमाणं आवाजाद्वारे सूचना देऊन अनेक गोष्टी केल्या जाऊ शकतात. सध्याच्या घडीला कमी पैशामध्ये बाजारात उपलब्ध असलेला आणि मोजके फिचर असेलेला हा "स्मार्ट स्पीकर' छान आहे.

सोनोज वन (Sonos One)
"ऍमेझॉन इको'च्या "ऍलेक्‍सा' प्रणालीवर काम करणारा हा स्मार्ट स्पीकर आहे. बोलणाऱ्याचा आवाज व्यवस्थित पोचावा यासाठी सहा मायक्रोफोनचा या स्पीकरमध्ये उपयोग करण्यात आला आहे. स्पीकरच्या वरच्या बाजूला एक टचपॅडदेखील आहे. ज्याचा वापर करून म्युझिक प्ले/पॉज करणं, फॉरवर्ड/रिव्हर्स करणं यासारख्या गोष्टी करता येतात. स्मार्ट फोनशी कनेक्‍ट केल्यानंतर या स्पीकरवर जेव्हा आपण गाणी वाजवतो, तेव्हा खोलीतल्या आवाजानुसार स्पीकर आऊटपूट ऑटोमॅटिक नियंत्रित करतो. याच गोष्टी आपण आपल्याला हव्या तशा "मॅन्युअली'सुद्धा ऍडजस्ट करू शकतो. या स्पीकरमध्ये सध्या "व्हॉइस कॉल' फिचर उपलब्ध नाही. "सोनोज होम साउंड सिस्टिम'ला हा स्मार्ट स्पीकर कनेक्‍ट केला, तर घरातल्या इतर खोल्यांमध्येही आपण गाणी ऐकू शकतो. इतर स्मार्ट स्पीकर्सप्रमाणं हादेखील गाणी ऐकणं, रिमाइंडर सेट करणं, अलार्म लावणं अशी कामं करतोच; पण त्यासोबतच हवामानाचे अपडेट्‌स देणं, ट्रॅफिकचे अपडेट देणं ही कामंही करू शकतो.

Web Title: yogesh bankar technodost article in saptarang