चला '5 जी' च्या जगात...! (योगेश कानगुडे)

yogesh kangude
yogesh kangude

इंटरनेटच्या वेगाच्या स्पर्धेत "फर्स्ट जनरेशन' ते "फोर्थ जनरेशन'पर्यंत असं एकापाठोपाठ एक तंत्रज्ञान बाजारात आलं. येत्या दोन वर्षांत म्हणजे 2020 पर्यंत भारतात 5G सुरू होऊ शकेल आणि त्यानंतरच्या तीन वर्षांत भारत 5G त बदललेला असेल. "पहिल्यापेक्षा दुसरं अधिक वेगवान आणि वापरण्यासाठी सुसह्य' हे एकमेव सूत्र यामागं असेल.

माणूस आणि इंटरनेट यांचं नातं आता दिवसेंदिवस अधिकाधिक घट्ट होत चाललं आहे. इंटरनेटचा आजवरचा प्रवास तसा सगळ्यांना माहीत आहेच. संगणकांवर लॅनच्या माध्यमातून चालणाऱ्या इंटरनेटनं केव्हाच कात टाकली आणि वायरलेस इंटरनेट या सेवेची जगाला ओळख झाली. आता त्यातही मोठ्या प्रमाणावर प्रगती झाली आहे. "वाय-फाय'मुळं इंटरनेट वेगवेगळ्या संवादसाधनांवर वापरता येऊ लागलं आणि स्पर्धा सुरू झाली ती इंटरनेटच्या वेगाची. या वेगाच्या स्पर्धेत "फर्स्ट जनरेशन' ते "फोर्थ जनरेशन'पर्यंत असं एकापाठोपाठ एक तंत्रज्ञान बाजारात आलं. "पहिल्यापेक्षा दुसरं अधिक वेगवान आणि वापरण्यासाठी सुसह्य' असं हे एकमेव सूत्र. वेग वाढवण्यातही सेवापुरवठादारांची मोठी स्पर्धा सुरू झाली आहे. अशातच दहा गीगा बाईट्‌स प्रतिसेकंद इतका अचाट वेग मोबाईलवर देऊ शकणारं इंटरनेट भारतात दाखल व्हायला आता फार काळ राहिलेला नाही. येत्या दोन वर्षांत म्हणजे 2020 पर्यंत भारतात 5G सुरू होऊ शकेल आणि त्यानंतरच्या तीन वर्षांत भारत 5G त बदललेला असेल.

"वन जी ते फाइव्ह जी' चा प्रवास
मोबाइल आणि इंटरनेट या आपल्या जीवनातल्या अविभाज्य घटकांबरोबरच बदलत राहणारं तंत्रज्ञानसुद्धा आता आपल्या जगण्याचाच एक भाग होऊन गेलं आहे. वन जी- अगदी सुरवातीचं वायरलेस नेटवर्क म्हणून याची ओळख आहे. सन 1980 च्या दशकात या सेवेची जगाला ओळख झाली. त्यानंतर या सेवेवर बरंच संशोधन करून झाल्यानंतर ती 10 वर्षांनी सगळ्यांसाठी खुली करण्यात आली. या सेवेद्वारे केवळ व्हॉइस कॉल केला जाऊ शकत होता. सन 2000 नंतर जगात 2G सेवा सुरू झाली. तीमध्ये कॉलिंगच्या जोडीला एसएमएस सेवा आली. आवाजाचा दर्जा मोठ्या प्रमाणावर सुधारायला मदत झाली. शिवाय, मोबाईलही वापरायला सोपा झाला. कालांतरानं 3G सेवा सुरू झाली आणि मोबाईलमधल्या वायरलेस टेक्‍नॉलॉजीला खऱ्या अर्थानं सुरवात झाली. ब्राउजिंग, ई-मेल, व्हिडिओ कॉलिंग, फोटो शेअरिंग आदी सुविधा मोबाईलमध्ये आल्या आणि साधा मोबाईल स्मार्टफोन बनला. मोबाईलमधल्या इंटरनेटचा वेग होता 2 मेगा बाईट्‌स प्रतिसेकंद (2Mbps). पाठोपाठ बाजारात 4G दाखल झालं.

अगदी काटेकोरपणे बोलायचं झालं तर या जनरेशनच्या मोबाईलवर इंटरनेटचा वेग हवा 100र्‌ टस्‌ प्रतिसेकंद किंवा 1 गीगा बाईट प्रतिसेकंद. मात्र, तसं घडत नाहीये; तरीही आधीपेक्षा इंटरनेटचा वेग विलक्षण वाढल्याचं स्पष्ट दिसत आहे. भारतासारख्या विशाल देशात अजून सर्वत्र ही सेवा पोचलेली नाही.

देशात येत्या काही दिवसांमध्ये 5G सेवा सुरू होत आहे. सध्याचा भारतातला इंटरनेटचा वेग 12र्‌ ट्‌स प्रतिसेकंद (12Mbps) इतका आहे. 5G तंत्रज्ञानानं हा वेग 1,00,000 Mbps किंवा 10 गीगाबाईट्‌स (10GB) इतका प्रचंड वाढणार आहे. आजघडीला भारतात सुरू असलेल्या इंटरनेटक्रांतीची पुढची पायरी 5G नं गाठली जाणार आहे. भारतातल्या जवळपास सर्व मोबाईल ऑपरेटर कंपन्या 5G सुरू करण्याच्या तयारीला लागल्या आहेत. गेल्या काही दिवसांत मोबाईलवर आवडता सिनेमा डाउनलोड करण्याचं प्रमाण भारतातही वाढलं आहे. 4G त एक जीबी फाईल साईजचा सिनेमा डाउनलोड होण्यासाठी मुंबई-पुण्यासारख्या शहरी भागातही अर्धा तास लागू शकतो. 5G वर हा सिनेमा फोटो क्‍लिक करण्याइतक्‍या कमी वेळात डाउनलोड होऊ शकेल! भारतात ऑप्टिकल फायबर नेटवर्कचं जाळं विस्तारत आहे. ग्रामीण भागापर्यंत इंटरनेट पोचवण्याचा 2011 मध्ये सुरू झालेला कार्यक्रम धीम्या; पण सातत्यपूर्ण गतीनं पुढं सरकत आहे. ऑप्टिकल फायबरच्या जोडीलाच मोबाईल इंटरनेटचा वेग वाढतो आहे. या वर्षात 4G इंटरनेट बहुतांश शहरी आणि निमशहरी भागापर्यंत पोचले आहे. 4G सर्वत्र पोचण्याच्या आधीच 5G इंटरनेटचं आगमन होईल, अशी चिन्हं आहेत.

स्पेक्‍ट्रमसाठी रंगणार स्पर्धा
केंद्र सरकारनं आतापर्यंत 5G स्पेक्‍ट्रमचा लिलाव पुकारलेला नाही. मोबाईल ऑपरटेर कितपत प्रतिसाद देतील, याची चाचपणी सरकार करत आहे. 4G अद्याप देशात नवखं असताना 5G आलं, तर नेमकं काय होऊ शकेल, याचा अंदाज सरकारला आलेला नाही. मात्र, मोबाईल ऑपरेटर्स 5G साठी अत्यंत उत्साही असल्याचं चित्र गेल्या काही दिवसांत तयार झालेलं आहे. सरकारतर्फे 2019-20 या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला 5G स्पेक्‍ट्रमचा लिलाव होण्याची शक्‍यता आहे. यामध्ये 3300-3400 मेगाहर्टझ आणि 3400-3600 मेगाहर्टझ स्पेक्‍ट्रम उपलब्ध असणार आहेत.

5G ने हे बदल घडतील...
1) इंटरनेट ऑफ थिंग्जचा (आयओटी) सर्व क्षेत्रांत विस्तार होईल. इंटरनेट ऑफ थिंग्ज म्हणजे एक अशी व्यवस्था ज्या व्यवस्थेत स्वतंत्र आयडी असलेली यांत्रिकी, इलेक्‍ट्रॉनिक, तसंच डिजिटल उपकरणं नेटवर्कद्वारे एकमेकांना जोडलेली असतात व इंटरनेटमार्फत मानवी हस्तक्षेपाशिवाय एकमेकांसोबत रिअल-टाइम माहितीची देवाणघेवाण ती करू शकतात. उदाहरणार्थ ः समजा, तुम्ही बाहेरून घरी जात आहात आणि घरात कुणीही नाहीये. अशा वेळी तुमच्याजवळच्या मोबाईलच्या लोकेशनवरून तुमच्या घरातल्या एसीच्या यंत्रणेला समजेल की तुम्ही घराजवळ पोचला आहात; त्यामुळं तुम्ही घरी पोचण्यापूर्वीच तो आपोआप सुरू होईल व तुम्ही घरी पोचेपर्यंत घरातली हवा थंड झालेली असेल.
2) इंटरनेटचा वेग वाढल्यानं बहुतांश सेवा इंटरनेट माध्यमामार्फत पुरवण्यावर भर दिला जाईल.
3) मीडिया आणि मनोरंजन या दोन क्षेत्रांमधल्या बहुतांश सेवा इंटरनेटद्वारे पुरवल्या जातील.
4) स्वयंचलित (ऑटोमोटिव्ह) क्षेत्राला अफाट चालना मिळेल.
5) आर्थिक व्यवहार मोबाईलवर जास्तीत जास्त होतील.

5G पुढची आव्हानं
देशातल्या इंटरनेट-यूजर्सची संख्या 2021 मध्यं दुपटीनं वाढून ती 82.9 कोटींवर जाण्याची शक्‍यता आहे. सन 2016 मध्ये इंटरनेटचा वापर करणाऱ्यांची संख्या 37.3 कोटी होती. याचाच अर्थ देशातली जवळपास 59 टक्के जनता इंटरनेटचा वापर करत आहे. याव्यतिरिक्त डिजिटल क्रांतीचा भाग बनलेल्या उपकरणांची संख्या 2021 मध्ये दोन अब्जांवर जाण्याची शक्‍यता आहे. सध्या वापरात असलेल्या उपकरणांची संख्या 1.4 अब्ज आहे. शिवाय आयपी ट्रॅफिकचा वेगही येत्या पाच वर्षांत सरासरी 30 टक्‍क्‍यांनी वाढणार आहे. त्यामुळे 5G असलेल्या मोबाईल हॅंडसेटची संख्या वाढवणं हे सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे, लोकांच्या वाढत्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी वेगवान ग्राहककेंद्रित सेवा पुरवणं हे एक मोठं आव्हान असेल.

ज्यांच्याद्वारे सिग्नल प्रसारित केले जातात, अशा ध्वनिलहरींच्या उपलब्धतेवर 5G ही सेवा अवलंबून आहे. जरी 5 G तंत्रज्ञानात वेगवेगळ्या स्रोतांकडून आलेल्या प्रचंड प्रमाणातल्या डेटावर प्रक्रिया करण्याची क्षमता असली, तरी त्यासाठी मोठ्या पायाभूत सुविधांची आवश्‍यकता आहे. या पायाभूत सुविधा निर्माण करणं हे एक मुख्य आव्हान आहे. या सेवेबरोबर काही सायबर-धोकेही निर्माण होणार आहेत. हे धोके दूर करत ग्राहकांच्या वैयक्तिक माहितीचं संरक्षण करणं हा महत्त्वाचा मुद्दा आहे.

रोजगारनिर्मितीस, अर्थकारणास बळ
कोणत्याही देशात नवीन तंत्रज्ञान विकसित होत असेल, तर तिथं व्यवसायाला मोठी संधी असते. व्यवसायाला संधी मिळाली की तिथं रोजगार निर्माण होण्याची शक्‍यताही निर्माण होते. अमेरिकेत 5G सेवा सुरू झाल्यानंतर जवळपास 30 लाख रोजगारांची निर्मिती होणार आहे. भारतातही मोठ्या प्रमाणावर या सेवेमुळं तरुणांना संधी मिळू शकते. भारतात अजून या सेवेची तयारी अंतिम टप्प्यात नसल्यामुळं निश्‍चित अशी आकडेवारी सांगता येणार नाही. "स्वीडिश टेलिकॉम एरिक्‍सन'च्या अहवालानुसार, भारतात 2026 पर्यंत 5G त 270 कोटी डॉलरच्या व्यवसायाची संधी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com