जीमेलही होतंय 'स्मार्ट' (योगेश कानगुडे)

yogesh kangude
yogesh kangude

अनेक सुविधा वेळोवेळी अपडेट होत असतात. त्यामुळं वेळेची बचत होत असते आणि सुरक्षेपासून गोपनीयतेपर्यंत अनेक गोष्टींबाबतची चिंता मिटते. जीमेलमध्येही असेच "स्मार्ट' बदल होत आहेत. त्यामुळं ई-मेलला "स्मार्ट रिप्लाय' देण्याबरोबर तिचा ऑफलाइन वापर करण्यापर्यंत अनेक गोष्टी करता येतील. या नवीन सुविधांवर एक नजर.

रोज नवनवीन प्रयोग करून आपल्याकडे वापरकर्त्यांना आकर्षित करण्याचा गूगलचा प्रयत्न असतो. यात ते कमालीचे यशस्वी होताना दिसत आहेत. आता यात भर पडली आहे ती ई-मेल सेवा पुरवणाऱ्या जीमेलची. जीमेलच्या ताज्या आवृत्तीमध्ये आता विविध भन्नाट फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. या माध्यमातून अनेक वर्षांनंतर या ई-मेल सेवेचा कायापालट करण्यात आला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून जीमेलवर नवीन फिचर्स येणार असल्याची चर्चा सुरू होती. यातल्या काही फिचर्सच्या चाचणीची माहितीदेखील समोर आली होती. या पार्श्‍वभूमीवर, काही दिवसांपूर्वी जीमेलमधील बदलांबाबत एका ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. जीमेल सुरू होऊन आता जवळपास दहा-बारा वर्ष झाली. या काळात ईमेलचे विविध प्रकारे वर्गीकरण, ऑटो फॉरवर्ड, स्मार्ट रिप्लाय सारखी खालील काही नवनवीन फीचर्स उपलब्ध करून दिली आहेत.

"कॉन्फिडेन्शिअल मोड'
जीमेलनं आपल्या लूकमध्ये बदल केला असून, काही फिचर्सही अपडेट केली आहेत. यामध्ये सर्वाधिक चर्चा होणारं फिचर आहे "कॉन्फिडेन्शिअल मोड.' या फिचरमुळं जीमेल आणखी सुरक्षित होणार असून, ठराविक वेळानंतर युजर्सच्या मेलबॉक्‍समधील मेल डिलिट होणार आहेत. त्यामुळं तुम्ही कोणाला एखादा गोपनीय मेल पाठवला असेल, तर त्यातली माहितीचोरी होण्याची शक्‍यता बरीच कमी झाली आहे. तुम्हाला हे फिचर वापरायचं असेल, तर तुमच्या अकाउंटमध्ये काही बदल करावे लागतील.
- सुरवातीला जीमेल अकाऊंट उघडल्यावर सेटिंगमध्ये जा.
- त्यांनतर जनरल सेटिंगमध्ये जा आणि स्मार्ट कंपोझवर क्‍लिक करा.
- "रायटिंग सजेशन्स ऑन' यावर क्‍लिक करा. हे फिचर बंद करण्यासाठी याच पर्यायावर पुन्हा एकदा क्‍लिक करा.

ठराविक कालावधीनंतर ई-मेल आपोआप डिलिट होईल, असं हे फिचर असणार आहे. ई-मेल कंपोझ करताना युजर एका छोट्या "लॉक' आयकॉनला क्‍लिक करून पाठवत असलेल्या मेलची "एक्‍सपायरी डेट' ठरवू शकतो. "कॉन्फिडेन्शिअल मोड' असं या आयकॉनचं नाव आहे. म्हणजेच, ई-मेल पाठवणारा व्यक्ती तो केव्हा डिलिट करायचा हे ठरवेल. तो ई-मेल फक्त योग्य व्यक्तीनंच वाचावा, अशी तुमची इच्छा असेल, तर तुम्ही "एसएमएस पासकोड' हा पर्याय निवडू शकता- जेणेकरून तुम्ही ई-मेल पाठवताना तुम्हाला मोबाईल नंबर विचारला जाईल. तुम्ही ई-मेल सेंड करताना "नो एसएमएस पासकोड' पर्याय निवडला असेल, तर समोरच्या व्यक्तीला मेल दिसेल. मात्र, जर "एसएमएस पासकोड' पर्याय निवडला असेल, तर समोरच्या व्यक्तीला तुम्ही टाकलेल्या मोबाईल नंबरवर एक पासवर्ड एसएमएस येईल आणि तो टाकल्यानंतरच ई-मेल ओपन होईल. एक्‍स्पायरी सेट केली असल्यानं ठरलेल्या वेळेनंतर तुमचा मेल समोरच्याला ओपन होणार नाही. "कॉन्फिडेन्शिअल मोड'नुसार ई-मेल मिळालेला व्यक्ती मेलमधील कंटेंट कोणाशीही शेअर करू शकणार नाही. इतकंच नव्हे, तर कंटेंट कॉपी, डाऊनलोड किंवा प्रिंटदेखील करता येणार नाही.

स्मार्ट रिप्लाय
गूगल इन्बॉक्‍सप्रमाणं हे फिचर आता जीमेलसाठी सुरू होत आहे. जीमेल युजरला एखाद्या मेलवर उत्तर टाइप करण्याची गरज नाही. यामध्ये तुम्हाला आलेल्या मेलच्या मजकुरावर आधारित तीन पर्याय आपल्याला मिळतात. तीन पर्यायापैकी एक आपण रिप्लाय म्हणून देऊ शकतो. Thank You, Welcome, Let`s Go यांसारखे मेसेज नवीन बदलानंतर तयारच असतील.

जीमेल नोटिफिकेशन स्नूझ
जीमेलच्या नव्या बदलानुसार ई-मेल्स स्नूझ (Snooze) करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. यामुळं युजरला येणारी ई-मेल्सची नोटिफिकेशन्स ठराविक वेळेत यावीत, अशा प्रकारचं सेटिंग करता येणार आहे. यामुळं एका विशिष्ट वेळीच ते मेल इन्बॉक्‍समध्ये पडतील. "स्नूझ' या नव्या फिचरमुळं आपण काही मेल विशिष्ट वेळ मार्क करून वाचू शकाल. त्या वेळेनंतर ते मेल आपल्याला "अनरिड मेल' म्हणून वर दिसतील. ज्यामुळं कामाच्या वेळी असे मेल आपण टाळू शकू.

"नजिंग' फिचर
नजिंग हे जीमेल नोटिफिकेशन स्नूझचं ऑटोमेटेड व्हर्जन आहे. एखाद्या विशिष्ट ई-मेलसाठी विशिष्ट तारीख आणि वेळ ठरवून त्यानुसार तो मेल करावयाचा असल्यास, त्यासाठी हे नवीन फिचर उपयोगी ठरणार आहे. या नवीन फिचरद्वारे वापरकर्ता मेलसाठी विशिष्ट तारीख आणि वेळ सेट करून ठेवू शकतो. असं सेट केल्यास त्या तारखेला आणि त्या वेळेत तो ई-मेल पुन्हा तुमच्या इन्बॉक्‍समध्ये दिसू लागेल आणि तो पाठवता येणार आहे. जीमेलच्या अगदी वर उजव्या बाजूस हे नवीन "नज' फिचर दिसेल. हे फिचर "डिफॉल्ट ऑन' राहतं; परंतु सेटिंगमध्ये या फीचरसाठी असलेल्या खास सेटिंगमध्ये ते "मॅन्युअली ऑफ' करण्याची सुविधाही उपलब्ध आहे.

ऑफलाइन सपोर्ट
गूगलने आपल्या जीमेलला रिडिझाईन करण्यासोबतच त्यात अनेक नवे फिचर्स जोडले आहेत. यामध्ये एक खास फिचर म्हणजे ऑफलाइन सपोर्ट आहे. या फिचरच्या साह्यानं तुम्ही इंटरनेटशिवाय जीमेल अकाऊंट वापरू शकणार आहात. नवा ई-मेल रिसिव्ह करू शकता; तसेच ई-मेल डिलिटही करू शकता. इतकंच नाही, तर तुम्ही कुणालाही ई-मेलही सेंड करू शकता. हे नवं फिचर वापरण्यासाठी क्रोम ब्राऊझर व्हर्जन 61ची आवश्‍यकता आहे. ही सुविधा वापरण्यासाठी खालील काही बदल अकाऊंटच्या सेटिंगमध्ये करावे लागतील.
1. सर्वांत आधी क्रोम 61 डाऊनलोड करा.
2. जीमेलच्या वरच्या उजव्या बाजूला जाऊन गिअर- लाइक सेटिंगवर क्‍लिक करा.
3. ड्रॉप-डाऊन मेनूमध्ये "सेटिंग' टॅबवर क्‍लिक करा.
4. आता मेनूमध्ये जाऊन "ऑफलाईन' टॅबवर क्‍लिक करा.
5. त्यानंतर "एनेबल ऑफलाइन मेल' पर्यायावर क्‍लिक करा.

नवीन लेआऊट
नवीन जीमेल वापरकर्त्यांना जीमेल स्क्रीनसाठी तीन पर्याय देणार आहे. डिफॉल्ट, कंफर्टेबल आणि कॉंपॅक्‍ट असे तीन प्रकारचे लेआऊट असणार आहेत. डिफॉल्ट लेआऊट ऍटॅचमेंट हायलाईट करतो, तर कंफर्टेबल लेआऊट कोणतीही ऍटॅचमेंट हायलाइट करत नाही. कॉंपॅक्‍ट लेआऊट हा आताच्या जीमेल लेआऊटसारखा आहे. जे वापरकर्ते लेआऊट बदलू इच्छित नाहीत, अशा वापरकर्त्यांसाठी हा लेआऊट आहे.

ओपन ऍटॅचमेंट फ्रॉम होमपेज
जीमेलमधला नवीन महत्त्वाचा बदल म्हणजे "ओपन ऍटॅचमेंट फ्रॉम होमपेज.' यामध्ये वापरकर्त्याला ई-मेल ओपन न करता होमपेजवरून ऍटॅचमेंट डाऊनलोड करता येणार आहे. यामध्ये जेपीजी, पीडीएफ, वर्ड डॉक्‍युमेंटसारख्या फाइल्सचा समावेश आहे. फक्त तुम्हाला हवा हे तो ई-मेल शोधा आणि बटन फॉर्मॅटमध्ये असलेल्या ऍटॅचमेंटवर क्‍लिक करा. ऍटॅचमेंट लगेच डाऊनलोड होईल. य सुविधेमुळं वेळेची बचत होणार आहे. ही सुविधा फक्त डिफॉल्ट लेआऊटसाठीच उपलब्ध आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com