क्षण ‘युरेका’चा

क्षण ‘युरेका’चा

व्यथेतूनच सापडली ‘शिंत्रेपद्धत’
अक्षरशः ‘युरेका’ म्हणत मी अंथरुणावरून ताडकन उठले. रात्री अकराच्या सुमारास. ३५-३६ वर्षांपूर्वी! आणि त्या शोधानंतर गेली तीन तपं माझ्या कुवतीप्रमाणं ‘मराठी वेगानं आणि गोडीनं’ शिकवत मानसिक समाधान मिळवत आहे. मायबोलीच्या ऋणाची जाण जागवत आहे. शिक्षण, लग्न झाल्यावर मुलांच्या शाळेचे दिवस सुरू होतात, तेव्हा कुठं शिक्षण क्षेत्राकडं गृहिणीचं लक्ष जातं. १९७५ ते ८० च्या काळात स्नेहल-सुयश या माझ्या मुलांचं प्राथमिक शिक्षण सुरू झालं आणि ‘मराठी’बाबत अनपेक्षित धक्के बसू लागले. पालक-शिक्षक आणि समाजाचा, ‘मराठी माध्यमात शिकणं लाजिरवाणं’ हा व्यक्त-अव्यक्त दृष्टिकोन अनाकलनीय वाटला. मराठी माध्यमातल्या विद्यार्थ्यांना मराठी वाचता न येणं, तत्कालीन मॅट्रिकच्या परीक्षेत प्रथम भाषा मराठी असणाऱ्या विद्यार्थ्यांचं मराठीत मोठ्या संख्येनं नापास होणं, अशा अनेक बाबी विचित्र वाटत आणि अंतःकरणाला पीळ पडे.

एक मराठीप्रेमी व्यक्ती म्हणून मी काही करू शकत का नाही, ही सल कुरतडत होती आणि त्या व्यथेतून ‘२५ तासांत मराठी - अर्थात मराठीवाचन, लेखन, संभाषण वेगानं आणि गोडीनं’ या माझ्या उपक्रमाची कल्पना स्फुरली. एका वाक्‍यात चित्रपटकथा म्हणतात तसं सांगायचं, तर - अ पासून ज्ञपर्यंत अक्षरं शिकवून बाराखड्या गिरवून घ्यायच्या. यात तीन-चार महिने गेल्यावर मग त्यांना परिचित असोत वा नसोत क्रमिक अभ्यासक्रमानं शब्द-वाक्‍यं शिकवण्यापेक्षा दोन-तीन अक्षरांच्या जोडीनं त्यांचा आकार शिकवायचा. उदा. ‘व’ या चित्राचा- आकृतीचा उच्चार व होतो आणि ‘वा’ (म्हणजे व या अक्षरापुढं एक रेघ) असं चित्र दिसलं, की त्याला नुसतं ‘वा’ म्हणायचं. म्हणजे प्रत्यक्ष तांत्रिक रचनेपेक्षा त्यातलं दृश्‍यमय रूप लक्षात घेतलं, की अक्षरांचं स्वरूप जास्त लवकर लक्षात येतं. या ‘शिंत्रेपद्धती’मुळं मुलं (वा कोणत्याही वयाचा प्रारंभक) अक्षरशः तीन-चार दिवसांत व, वा, ब, बा, ट, टा, न, ना समजून घेतानाच बाबा, बाव, वाव, वा, टब, बट, नट, नाव, नावा, नाना इ. शब्द ओळखून वाचू शकतात आणि लिहिण्याइतकी बोटांची ताकद असल्यास लिहूही शकतात. या पद्धतीत गप्पा, नवी गाणी म्हणणं आणि तयार करणं, गोष्टी, खेळ, सोपे पदार्थ करणं इत्यादी कृतींचं महत्त्वाचं स्थान आहे. नेमलेल्या पाठ्यक्रमाचा अभ्यास गळी उतरवण्यापेक्षा शिकणाऱ्यांची पार्श्‍वभूमी (सामाजिक, भौगोलिक, मानसिक, बौद्धिक, कौटुंबिक) लक्षात घेऊन पुढं जाता येतं. डोळ्याला झापडं न लावता तर्क-कल्पनाशक्ती, भावबळ यांना चालना मिळते. मोजक्‍या तासिकांमध्ये जोडाक्षरांसकट वाचन येऊ लागल्यानं आत्मविश्‍वास वाढतो. अर्थात काही ‘पथ्यं’ पाळावी लागतात. या पद्धतीनं सध्या अमेरिकेत प्राजक्ता मराठे, बकुल फाटक या बहिणी तिथल्या मुलांना मराठीचा लळा लावत आहेत. कित्येक मुलांना प्रत्यक्ष आणि अडीचशे-तीनशे पालक शिक्षकांना कार्यशाळेतून मराठीची गोडी लावण्याचे भाग्य मला लाभलं. घरगुती स्वरूपातल्या खारीचा वाटा आनंदानं सांगण्याचा योग आला, तो ‘कान्याच्या करामती’च्या ‘युरेका’ क्षणापासून!
- शारदा शिंत्रे, पुणे

‘व्हाया’ बसमुळं चौकसबुद्धीची शिकवण
शा  लेय शिक्षणासाठी गावापासून दूर ओतूरला (ता. जुन्नर, जि. पुणे) इथं होतो. एकदा दिवाळीच्या सुटीत गावी आलो होतो. सुटी संपली आणि शाळेत जाण्याचे वेध लागले. तेरा-चौदाव्या वर्षी घरदार, आई-वडील, भावंडांपासून दूर जाणं जिवावर येई; पण जाणं आवश्‍यक होतं. आईनं पाच-सहा पायल्या तांदूळ पिशवीत भरले. कपड्यांची वेगळी पिशवी. ग्रंथालयातून आणलेली चार-दोन पुस्तकं आणि वडिलांनी घेऊन दिलेल्या वह्या यांचं ओझं घेऊन पहाटेच्या बसनं निघालो. वडिलांनी बसमध्ये बसवून दिलं.

तिकीट द्यायला बसवाहक जवळ आला. मी तिकीट मागितलं. पण वाहक म्हणाले, ‘‘ही बस व्हाया जाते, वैशाखरेला...’’ मला ‘व्हाया’ म्हणजे काय ते कळलं नाही. पुन्हा पैशांचे वांदे. मला वाटलं, वैशाखऱ्याला गेलो, तर भाड्याचे पैसे वाढणार म्हणून ‘मी पुलावरच उतरीन,’ असं म्हणालो. तिकीट घेतलं. सगळ्या सामानासह प्रवास सुरू झाला. वीस-बावीस मिनिटांत वाहकानं मला पुलावर उतरवलं. ती बस आता वैशाखरे गावाहून टोकावड्याला जायला आली, की आपण पुन्हा त्याच बसमध्ये बसायचं आणि टोकावड्याला पोचायचं. तिथून नगरकडे जाणाऱ्या कोणत्याही बसनं ओतूरला पोचता येई. म्हणजे वैशाखरे गावाला जाण्यासाठीचे अतिरिक्त पैसे वाचतील, अशी माझी कल्पना; पण वैशाखरे गाव जवळच होतं. तिथून ती बस थोड्याच वेळात परत आली. मला बघून ड्रायव्हरनं हॉर्नसुद्धा वाजवला; पण त्याला मला पुन्हा त्याच गाडीत बसायचं आहे, याची कल्पनाच नव्हती, त्यामुळं ती बस माझ्यासमोरून भुर्रकन निघून गेली आणि मी अक्षरशः पुतळा झालो. मी मग त्या पुलापासून सुमारे एक किलोमीटर अंतर चालत निघालो. तांदळाच्या ओझ्यानं हात लाल झाले. कपड्यांची पिशवी कधी डाव्या हातात, तर कधी उजव्या खांद्याला. निम्मा रस्ता पार करेपर्यंत रडवेला झालो. बरं, रस्त्यावरून असं पायी जाताना बघितल्याचं कोणी आई-वडिलांना सांगितलं असतं, तर त्यांना फारच वाईट वाटलं असतं. त्यामुळं मी मान खाली घालून चालत होतो. आणखी पुढं गेल्यावर तीच बस परतीचा प्रवास करताना दिसली. त्याच बसमध्ये बसून राहिलो असतो, तर मी केव्हाच मुक्कामी पोचलो असतो. माझे डोळे पाणावले. हातातल्या ओझ्यानं डोळे, नाक पुसणंही जमेना. स्वतःचाच राग-राग करू लागलो.
घामाघूम होऊन टोकावड्याला पोचलो. तेवढ्यात ‘कल्याण-पोखरी’ बस आली आणि ओझ्यासह स्वतःला बसमध्ये कोंबलं. खिडकीतल्या गार हवेनं डोळे, नाक कोरडं झालं, तसं मनही!

त्या क्षणापासून ठरवलं, कोणत्याही गोष्टीची पूर्वकल्पना, पूर्वज्ञान समजून घ्यायचं. माहीत नसेल, तर विचारायचं. शंका दूर होईपर्यंत थांबायचं. मगच निर्णय घ्यायचा. तेव्हापासून ही चौकशीची सवय लागली. प्रवेश, प्रवास, खरेदी, पर्यटन अशा अनेक प्रसंगांत ही ‘चौकशी’ची सवय खूप उपयोगी ठरली.

विशेषतः अनोळखी ठिकाणी पर्यटनाला गेल्यावर, रात्री-अपरात्री प्रवासाच्या वेळेस या सवयीमुळे भीषण प्रसंगांपासून दूर राहिलो. कधी या ‘चौकस’ बुद्धीची काहींनी कुचेष्टाही केली. मित्रांनी टिंगल केली; पण मी आणि कुटुंबीयांच्या सुरक्षिततेसाठी मी ते आवश्‍यक मानलं. आज पंचवीस वर्षांनंतरही ‘निर्णयप्रक्रिया’ याच पद्धतीनं होते. नवीन माहिती तर मिळतेच; पण माणसांना वाचता येतं, पाहता येतं, भाषेचे गोडवे कळतात. प्रसंगाचं भान येतं. परिणामांचा विचार येतो. चौकस बुद्धीचा अभिमानही वाटतो.
...ही सारी जादू त्या ‘व्हाया’ बसनं केली आणि मला चौकसपणाचा शोध लागला. आइन्स्टाईनला न्हाणीघरात असताना जे सापडलं, ते मला किलोमीटरभर पायपीट करताना सापडलं... एवढाच काय तो फरक!
- शत्रुघ्न ईश्‍वर,
मु. महाज, पो. धसई (ता. मुरबाड, जि. ठाणे)

 

डायरीची संगत, नियोजनाला रंगत
मी   गुन्हे अन्वेषण विभागात (सीआयडी) वेगवेगळ्या पदांवर एकूण २५ वर्षं नोकरी केली आहे. त्या विभागात कोणतंही काम वेळच्या वेळी कसं करायचं, तसंच ज्या दिवसाचं काम त्याच दिवसाला शक्‍यतो कसं करायचं ही चांगली सवय मला लागली. सेवानिवृत्तीनंतरही मी चांगल्या सवयींचं अजूनही पालन करत आहे.
मी दर वर्षी बारा महिन्यांच्या बारा छोट्या डायऱ्या आणतो. त्या डायरीमध्ये रोज कोणती कामं करायची आहेत, याची नोंद करतो. उदाहरणार्थ दूध, भाजी, वीजबिल, किराणा आणणं, वर्तमानपत्राचं बिल देणं, दूरध्वनी बिल भरणं, गॅसची नोंद करणं, गॅस कधी आला, गॅस केव्हा संपला याच्या नोंदी करणं, इस्त्रीचे कपडे टाकणं/आणणं, बचत खातं, आवर्त खातं यांमध्ये पैसे भरणं, एटीएमद्वारा पैसे काढणं, एलआयसीचा हप्ता भरणं, काही कामानिमित्त कागदपत्रांच्या फोटोकॉपी काढणं, लग्न समारंभाला जाणं, नाटक-सिनेमाला जाणं, मोबाईल, इंटरनेट रिचार्ज, टाटा स्काय रिचार्ज, सहलीला जाणं, सकाळी फिरायला/ व्यायामाला जाणं, दुचाकीत पेट्रोल कधी घातलं, गाडी किती किलोमीटर चालली याचीही नोंद करतो. अचानक टीव्ही, लाईट, दूरध्वनी, गॅसची बटनं वगैरे बंद पडली, तर त्या संबंधित मेकॅनिकला बोलावून योग्य ती दुरुस्ती करून घेणं, कधी कधी अचानक रिक्षानं, बसनं प्रवास केला, तर त्याच्या नोंदी पण या डायऱ्यांमध्ये करतो. यामुळं कोणती कामं झाली आणि कोणती कामं करायची आहेत, हे ताबडतोब समजतं. नातेवाइकांच्या/ मित्रांच्या वाढदिवसाच्या नोंदी त्यात करतो ज्यांमुळे त्या त्या दिवशी शुभेच्छा देता येतात. एवढंच नाही, तर प्रत्येक सणावाराला कोणतं पक्वान्न आणायचं याच्याही नोंदी मी करतो. त्यामुळं कोणत्या तारखेला कोणता सण झाला; तसंच आपल्याकडं कधी पाहुणे आले होते याबाबतची माहिती तत्काळ समजते.

कधी कधी सगळी कामं एकाच दिवशी पूर्ण होत नाहीत. ती कामं पुढील दिवशी करावी लागतात. झालेल्या कामांवर ‘टिक’ (बरोबरची खूण) केल्यावर उरलेली कामं कोणती, हे पण लक्षात येतं. रोज कोणता खर्च केला, याचीही नोंद एका वार्षिक डायरीत केली जाते. त्यामुळं कोणतंही काम करायला मला हुरूप येतो. म्हणूनच म्हणावंसं वाटतं
जेथे जातो तेथे, डायरी माझा सांगाती
- मनोहर जोशी, पुणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com