क्षण ‘युरेका’चा

क्षण ‘युरेका’चा

कॅलेंडरचा असाही उपयोग
‘‘पाठ होता होत नाही म्हणजे काय? संस्कृत श्‍लोक, रूपं, बीजगणित- भूमितीची समीकरणं, भौतिक- रसायनशास्त्राच्या व्याख्या पाठच व्हायला पाहिजेत...’’ माझा मित्र गजानन देशमुख आपल्या मुलावर खेकसत होता. मी बऱ्याच दिवसांनी त्याच्याकडं गेलो होतो आणि दाराबाहेर उभा राहिलो असताना कानावर शब्द पडले.
‘‘कंटाळा येतो पाठांतर करायला बाबा,’’ चिरंजीव रडगाणं गात होते.
‘‘ते काही नाही, पाठांतर केलंच पाहिजे. हो, पण जाताजाता ते गेल्या वर्षीची दोन कॅलेंडर रद्दीत टाक.’’
किलकिलं असलेलं दार मी उघडलं आणि गजाभाऊनं माझं स्वागत केलं. मी चपळाईनं चिरंजीवांच्या हातातली कॅलेंडर ताब्यात घेतली आणि म्हटलं ः ‘‘काय आरडाओरडा चाललाय बापलेकाचा? तसा मी ऐकलाय बाहेरून! हे बघ, मी सुचवतो यावर उपाय.’’
‘‘काय करणार? पाठांतर होतच नाही म्हणतोय हा!’’ गजानं तक्रार मांडली.
‘‘हे बघ, हे मोठं कॅलेंडर एका बाजूनं कोरं आहे,’’ मी माझं बोलणं सुरू केलं. ‘‘प्रत्येक विषयाला एक दोन पानं दे- दहावीत आहेस ना तू? आणि पाठांतर करण्याचा मजकूर सुटीत एकेका पानावर लिहून काढ. कॅलेंडरचं लिहिलेलं पान भिंतीवर पुढं लावून रोज येता-जाता, येरझारा घालताघालता वाचत जा. सहज पाठ होईल.’’
‘‘अरे, चांगला उपयोग होईल या बाद झालेल्या कॅलेंडरचा!’’ गजाचे उद्गार.
‘‘विशेषतः परीक्षेच्या काळात बसूनबसून अंग आळसावून जातं. अशा वेळी कॅलेंडरवरच्या स्वलिखित मजकुराची उजळणी करायची. काय?’’ अस्मादिक.
‘‘छान, छान! पण नुसते छापील आकडे असलेल्या दुसऱ्या कॅलेंडरचा काय उपयोग रे?’’ गजाभाऊंची शंका.
‘‘हे बघ, तुझं नाव, मजला, फ्लॅट क्रमांक, खाली तळमजल्यावर पाहायला मिळाले; पण इथल्या एकाही दारावर फ्लॅट क्रमांक नाहीत,’’ माझी तक्रार. ‘‘मला चार प्रवेशद्वारांपैकी तुझं दार शोधावं लागलं, गजा!’’
‘‘अरे पण ही बिल्डरची कामं आहेत,’’ गजाची सारवासारवी.
‘‘प्रत्येक मजल्यावर चार-चार फ्लॅट्‌स. अशी अकरा मजली इमारत तुझी! नसेल पितळी क्रमांक दारावर लावण्याची त्याची ऐपत...’’ मी माझ्या सवयीप्रमाणं विनोद टाकून म्हटलं. ‘‘आता असं कर. तुझ्या मुलाला हे समाजकार्य करायला सांग. प्रत्येक दारावर मालकांना विचारून या दुसऱ्या कॅलेंडरवरचे क्रमांक दारांवर चिकटव- म्हणजे फ्लॅट नंबर शोधत फिरायला नकोत. शिवाय महिन्यांची अक्षरं कापून खालच्या मजल्यावर मालकांच्या नावावर भाडेकरूंची नावे चिकटवा- म्हणजे भाडेकरूला भेटणं सुकर होईल. भाडेकरूंची नावंही कोणाला माहीत नाहीत. अक्षरं अपुरी पडल्यास स्वहस्ते लिही.’’
‘‘छान,’’ गजाभाऊची दाद. ‘‘बाकीच्या उरलेल्या पानांची नव्या पुस्तकांना कव्हर घालायला सांगतो? बरोबर ना?’’
‘‘बरोबर!’’ मी.
- मधुकर पानसरे, पुणे

भास्कराय नमः
स  दतीस वर्षं नोकरी केल्यावर सेवानिवृत्तीचा दिवस उगवला. या प्रदीर्घ कालखंडात अपरंपार कष्ट, धावपळ झाली. पहिल्यांदा शिक्षिका, नंतर मुख्याध्यापिका आणि शेवटी सेवानिवृत्तीच्या वेळी पर्यवेक्षिका या पदावर काम करून निवृत्त झाले. सेवानिवृत्तीच्या वेळचा हा प्रसंग. सेवानिवृत्त होण्यापूर्वी साधारणपणे दोन-तीन महिने माझे गुडघे दुखू लागले होते. पर्यवेक्षिका असल्यामुळं वेगवेगळ्या शाळांना भेटी देणं, मीटिंग्ज घेणं, ऑफिसला रिपोर्ट देणं या कामांमुळं फार धावपळ, दगदग होई आणि गुडघे फार दुखत. थोडक्‍यासाठी या पायांचं दुखणं का उद्भवलं, असं वारंवार मनात येई. शेवटी लंगडतच सेवानिवृत्तीचा कार्यक्रम पार पडला. ‘आता विश्रांती घ्या’ इथपासून ‘जरा बघा आता त्या पायांकडे’ इथपर्यंत सर्व सल्ले ऐकले.
घरी राहिल्यानंतर विविध औषधं, गोळ्या, खूप प्रकारचे उपचार केले. वेगवेगळी तेलं चोपडली; पण उपयोग शून्य. एक दिवस गंमत झाली. त्या दिवशी मला उठायला सकाळचे सहा वाजले. रोज पाच वाजता उठायचा माझा नित्यक्रम. चक्क एक तास उशीर! गडबडीत उठले. खिडकीचा पडदा सरकवून खिडकी उघडली. सूर्यकिरणांनी मस्तपैकी घरात उडी घेतली. सूर्यदेवाला नमस्कार केला आणि काय चमत्कार! एका मस्त कल्पनेनं डोक्‍यात उडी मारली. मला खरंच ‘युरेका युरेका’ म्हणावसं वाटलं. ‘शुभस्य शीघ्रम’ म्हटलं आणि सूर्यदेवाला नमस्कार घातला. एकच नाही. त्रिवार साष्टांग दंडवत घातला. पायांना थोडंसं; पण मनाला फार बरं वाटलं. दुसऱ्या दिवसापासून रोज प्राणायाम आणि त्यानंतर सूर्यनमस्कार घालण्याचा प्रयत्न करू लागले. पायांनी तक्रार केली नाही असं नाही; पण तिकडं दुर्लक्ष केलं. आठवडाभर रोज अगदी सावकाश असे तीनच सूर्यनमस्कार घातले. त्यानंतर पुढच्या आठवड्यात एक नमस्कार वाढवला. चारच नमस्कार आठवडाभर घातले. असं करत हळूहळू सूर्यनमस्कारांची संख्या वाढवत गेले. पायांची (गुडघ्यांची) तक्रार हळूहळू कमी होत आहे, असं मला जाणवलं. बरं वाटलं. चालताना त्रास होई, तो कमी वाटू लागला. त्यामुळं सूर्यनमस्कारानंतर थोडंसं फिरणं चालू केलं. वाटेत देवीचं, हनुमानाचं आणि रामाचं अशी मंदिरं लागतात. तिथं जाऊन देवदर्शनही करून येते. त्यामुळं शरीराबरोबर मनही प्रसन्न होतं. ‘सुख देवासी मागावे- दुःख देवाला सांगावे’ या गाण्याच्या ओळी आठवल्याशिवाय राहिल्या नाहीत. हा क्रम आजतागायत चालू ठेवला आहे. गावाला जावं लागलं, तरीही सूर्यनमस्कार थांबवायचे नाहीत, हा नेमच केला आहे.
आता मला सेवानिवृत्त होऊन साडेतीन वर्षं झाली आहेत. सूर्यनमस्कार आता १५ घालते. पाय (गुडघे) मुळीच दुखत नाहीत. जिने चढ-उतार करणं असो, किंवा नुसतं चालणं असो- कुरकुरत नाहीत. तब्येत उत्तम आहे. ज्या क्षणी मला हे सुचले तो ‘युरेकाचा क्षण’ सदैव स्मरणात राहील, नव्हे त्या क्षणाची आणि सूर्यदेवाची मी अत्यंत ऋणी राहीन. माझा नातू आणि नातसुद्धा नमस्कार घालतात. यापेक्षा आणखी मोठी ‘पेन्शन’ कोणती? आता मी खऱ्या अर्थानं ‘माझ्या पायावर’ उभी आहे बरं!
- जयश्री लेंभे, निगडी, पुणे

‘स्मार्ट’ माठ
उन्हाळा म्हटलं, की समोर येतो तो आंबा, वार्षिक परीक्षा, हल्ली आयपीएल, गार पाणी आणि पाणी थंडगार करणारा ‘माठ.’ काही म्हणा- नुसतं ‘माठ’ असं मनात आलं तरी गार वाटतं. आता तुम्ही म्हणाल रेफ्रिजरेटरच्या जमान्यात कोण माठ वापरतो? पण तुम्ही पुण्यात कोथरूड डेपोपासून बावधनपर्यंत फेरफटका मारलात, तर असंख्य माठ विकायला असल्याचं लक्षात येईल. रेफ्रिजरेटरमध्ये पाणी कितीही थंडगार होऊ देत- माठात नैसर्गिकपणे थंड झालेलं आणि किंचित खापराचा किंवा मातीचा वास असलेलं पाणी ‘अमृतातेही पैजा जिंके!’

आमच्या घरातही पूर्वीपासून माठ वापरतात. दोन वर्षांपूर्वी शेवटला माठ घेतला तो अजून सेवा देत होता; पण परवा त्याचा सेवा द्यायचा ‘घडा भरला’ आणि तीर्थरूपांकडून तो फुटला. समस्त कुटुंब हळहळलं. मी आणि आई संध्याकाळी नवा माठ घेऊन आलो. आपल्या कार्यकाळात माठ फोडून सरकारी तिजोरीवर तीनशे रुपयांचा ताण आणल्याबद्दल ‘माठ’ खातं बाबांकडून काढून आईनं माझ्याकडं दिलं. म्हणजे आता माठाची स्वच्छता आणि वेळच्या वेळी तो भरून ठेवणं हे काम मला करावं लागणार होतं. तसं हे किरकोळ काम होतं. मीही झटकन कार्यभार स्वीकारला; पण मला कुठे ठाऊक होतं हा माठ मला पुढं इतका त्रास देणार आहे ते!
त्याचं असं झालं, की पुढल्याच आठवड्यात माझ्या मुंबईच्या भाचीचा- सईचा वाढदिवस होता. तो पुण्यात करायचं ठरलं. यथावकाश तो दिन उगवला. पावभाजीचा बेत ठरला. माझी बहीण, मेव्हणे, त्यांचे आई-वडील, माझे आई-बाबा आणि कॉलनीतली लहान मुलं असा ग्रुप जमला. सगळी तयारी झाली आणि लक्षात आलं, की माठ रिकामा झालाय. माठातलं पाणी वापरात असल्यामुळं रेफ्रिजरेटरमध्ये पाणी नव्हतं. मी ॲक्वागार्ड सुरू करून त्याचा पाइप माठात सोडला आणि सर्वांबरोबर हॉलमध्ये येऊन बसलो. केक कापला गेला. फोटोग्राफी झाली आणि या सर्व गडबडीमध्ये आमच्या लाडक्‍या माठाला मी पूर्णतः विसरलो. माझी बहीण किचनमध्ये गेली आणि जोरात किंचाळली, तेव्हा माझ्या लक्षात आलं, की किचनमध्ये पूर आलेला असणार. मी घाबरतच किचनमध्ये शिरलो. ओट्यावर पाणी, ट्रॉलीमध्ये पाणी, ओट्याखाली पाणी!!! आता माझ्या डोळ्यात पाणी आलं- कारण ‘माठ’मंत्री या नात्यानं मला या समस्येवर उपाययोजना करायची होती. मग काय पॅंट फोल्ड केली. बादली आणि फडकं घेतलं आणि पाणी भरायला सुरवात केली. बच्चे कंपनी मामाला पाहून खी-खी करत होती. भाऊजींनी, सगळं दिसत असूनही ‘‘काय रे, काय करतोयस?’’ असं खोचकपणे विचारलं. मी (स्वगत) ‘‘दिसत नाही का?’’ (प्रकट) ‘‘माठ ओव्हरफ्लो झालाय’’ असं म्हणालो, तर म्हणतात कसे ः ‘‘अरे जाऊ दे ‘माठ’च तो. स्मार्ट असता तर नसता ओव्हरफ्लो झाला.’’

सगळं आवरून झाल्यावर मी माठाकडं गंभीर नजरेनं पाहिलं. त्याचं ते गोंडस गरगरीत शरीर पाहून माझा राग थोडा शांत झाला. आपलीच चूक आहे, यात माठाचा काही दोष नाही. त्याला बोलता आलं असतं तर त्यानं सांगितलंच असतं, असा विचार माझ्या मनात आला.
युरेका!!! या माठाला बोलतं केलं तर?...
हाडाचा इंजिनिअर मी. लगेच कामाला लागलो. यूट्युब किंवा इंटरनेटवर दैनंदिन जीवनातल्या किती तरी समस्यांवर उपाय सापडतो. दुसऱ्या दिवशी यूट्युबवर वॉटर लेव्हल इंडिकेटरचा व्हिडिओ पाहिला. लगेच प्लॅस्टिक बॉल, एक बझर, नऊ व्होल्टची बॅटरी, इंजेक्‍शन अशी साहित्याची जमावजमव केली आणि शंभर रुपयांत वॉटर लेव्हल इंडिकेटर बनवला. बादलीमध्ये यशस्वी चाचणी पण घेतली. आता माठ भरत आला, की स्वतःच बझर वाजवून ‘ॲलर्ट’ करेल. आई आणि बाकी मंडळी कोल्हापूरला महालक्ष्मीच्या दर्शनाला गेली होती, त्यामुळं आम्हाला कोणी हटकलं नाही. ते घरी आल्यावर त्यांना हा प्रयोग दाखवला आणि भाऊजींना म्हणालो, ‘‘आमचा माठ आता स्मार्ट झाला.’’
- सुजित काळे, पुणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com