'शरीराला मंदिरच मानतो' (झेन खान)

zen khan
zen khan

उत्तम आरोग्यासाठी माझा मंत्र म्हणजे योग्य तो आहार योग्य त्या प्रमाणात घेणं. स्वच्छ, उत्तम अन्न खा आणि त्यात भरपूर प्रमाणात प्रथिनं आणि फळांचा समावेश करा. शरीरातलं पाण्याचं प्रमाणही कायम राखा. उत्तम तब्येतीसाठी खाण्या-पिण्याच्या चांगल्या सवयी लावून घेणं आणि धूम्रपान व मद्यपानापासून दूर राहणं, या सर्वांत महत्त्वाच्या गोष्टी आहेत. मी जिमला मंदिरच मानतो. त्याचप्रमाणं शरीरालाही मंदिर मानतो. त्यामुळं जिममध्ये जाण्यापूर्वी मी नमस्कार करतो. त्यानंतर वर्कआउट करायला सुरवात करतो.

आरोग्यसंपन्न जीवन आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी केलेले प्रयत्न म्हणजेच वेलनेस. उत्तम आरोग्यासाठी माझा मंत्र म्हणजे योग्य तो आहार योग्य त्या प्रमाणात घेणं. स्वच्छ, उत्तम अन्न खा आणि त्यात भरपूर प्रमाणात प्रथिनं आणि फळांचा समावेश करा. शरीरातलं पाण्याचं प्रमाणही कायम राखा. उत्तम तब्येतीसाठी खाण्या-पिण्याच्या चांगल्या सवयी लावून घेणं आणि धूम्रपान व मद्यपानापासून दूर राहणं, या सर्वांत महत्त्वाच्या गोष्टी आहेत. या गोष्टींचं पालन आपण सर्वांनी केलं, तर नक्कीच आपलं आयुष्य सुंदर अन आरोग्यसंपन्न राहील. त्या दृष्टीनंच मी पहिल्यापासून प्रयत्न करत आहे.

माझ्या दररोजच्या आहारामध्ये सर्वाधिक भाग प्रथिनांचा असतो- जो मला चिकन, मासे, पनीर, डाळ यांतून मिळतो. योग्य त्या प्रमाणात चांगले फॅट्‌सही देणारा आणि अगदी थोडी कर्बोदकं (कार्बोहायड्रेटस) देणारा आहार मला आवडतो. माझं जेवण मोजकं, नियमित आणि ठराविक असतं. सध्या मी केटो डाएट पाळत आहे. फळं आणि पाणी यांचं भरपूर सेवन करणं हे शरीरातील पाण्याचं प्रमाण राखण्यासाठी, विशेषत: उन्हाळ्यात आवश्‍यक आहे. मी दर थोड्या वेळानं पाणी आणि फळं यांचं सेवन करत असतो. त्यामुळं माझं शरीर फ्लेक्‍झिबल राहतं. फळं अन्‌ भरपूर पाणी प्यायल्यामुळं माझा चेहऱ्यावर नेहमीच टवटवीतपणा असतो. कधीच थकवाही जाणवत नाही. त्यामुळं मी नेहमीच आनंदी असतो. मी शक्‍यतो सकाळी अकरा ते एक किंवा रात्रीच्या वेळी वर्कआऊट करतो. कारण, या कालावधीमध्ये आपली बॉडी स्टेबल असते. त्यामुळं त्याचा आपल्या शरीरासाठी जास्तीत जास्त फायदा होतो.

केटो डाएटचा वापर
सध्या मी केटो डाएट पाळत असून, माझ्या अन्नात 75 टक्के वाटा चांगल्या फॅटसचा, 20 टक्के प्रथिनांचा आणि पाच टक्के कर्बोदकांचा आहे. हे मला आरोग्यदायी ठेवण्यासाठी पुरेसं आहे. मी खूप मेहनत घेऊन व्यायाम करत नाही. मोठी वजनंसुद्धा उचलत नाही. मात्र, मी जेव्हा व्यायाम करतो, तेव्हा त्यात कार्डिओ, धावणं, दोरीच्या उड्या मारणं यांचा समावेश असतो. माझा कोणी फिटनेस गुरू नाही; पण मी फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅमला आदर्श मानतो; कारण त्याचं बांधेसूद आणि पीळदार शरीर आहे. योगाभ्यासामुळं अनेक फायदे होतात. त्यामुळं मीही लवकरच योगा सुरू करणार आहे. सध्या मी समाधानी असलो, तरी योगामुळं मला आणखीन समाधान मिळेल, याचा मला विश्‍वास आहे.

आरोग्यसंपन्न शरीर आणि आरोग्यदायी जीवनशैलीसाठी मानसिक आरोग्य चांगलं राखणं अतिशय महत्त्वाचं आहे. मानसिक आरोग्य राखण्यासाठी मी बराच वेळ सायकल चालवतो आणि धावायला जातो. बेबंद, अरबटचरबट खाणं, धूम्रपान आणि अल्कोहोलचं सेवन यामुळं तुमच्या शारीरिक आरोग्याची नासाडी होते. त्यामुळं या गोष्टी मी कधीच करत नाही. शेवटी आपलं शरीर अन्‌ आरोग्य कसं ठेवायचं, हे आपल्याच हातात असतं. त्यामुळं प्रत्येकानं आपलं शरीर मंदिरासारखं सुंदर ठेवावं.

फिट होण्याचं आव्हान
सध्या मी "स्टार प्लस' या दूरचित्रवाहिनीवर "एक भ्रम ः सर्वगुणसंपन्न' या मालिकेत एका लष्करी अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. त्यासाठी मला शरीरावर थोडं मांस दाखवावं लागलं. ते केल्यामुळं माझं वजन वाढलं. मात्र, त्याचा परिणाम माझ्या व्यक्तिरेखेवर व्हायला लागला. मी जेवढा जाड होतो, त्याच्या दुप्पट स्क्रीनवर दिसू लागलो. त्यामुळं मला लष्करी अधिकाऱ्यासारखी फिट बॉडी करण्याचं आव्हान होतं. ते आव्हान मी पेललं अन्‌ अगदी फिट झालो. त्यासाठी मी केटो डाएट पाळत असून, माझे स्नायू पीळदार करीत आहे.

"खतरों के खिलाडी' आणि "नामकरण' या शोमध्ये मी स्टॅमिनावर वर्कआऊट केलं. त्यासाठी योग्य प्रशिक्षकाकडून दीड महिने ट्रेनिंगही घेतलं. फ्री वेट एक्‍सरसाइजवर भर दिला. त्याचा फायदा मला शोसह वैयक्तिक आयुष्यातही मोठ्या प्रमाणात झाला. अनेकदा मी सायकलिंगही करतो. प्रत्येकाची शरीरयष्टी वेगवेगळ्या स्वरूपाची असते. कोणाची शरीरसंपदा लवकर आकर्षक होते, तर कोणाची उशिरा होते. या सर्व गोष्टींचा संबंध आपला आहार अन्‌ दैनंदिनीवर अवलंबून असतो. त्यामुळं मी माझ्या स्वतःची विशेष काळजी घेतो. आपल्या आहारातल्या पदार्थांवरही आपलं शरीर तंदुरुस्त बनणं अवलंबून असतं. अयोग्य आहार घेतल्यास विपरीत परिणामही होतात. त्यामुळं आरोग्याला ज्या गोष्टी बाधक आहेत, त्या आहारातून नक्कीच टाळाव्यात. शक्‍यतो आपल्या आहारात जास्त प्रमाणात गोड वा मैद्याचे पदार्थ येऊ देऊ नयेत. कारण, असे पदार्थ पचायला जड जातात. त्याचा परिणाम आपल्या शरीरावर नकळतपणे होत असतो.

खरं तर मी जिमला मंदिरचं मानतो. त्याचप्रमाणं शरीरालाही मंदिर मानतो. त्यामुळं जिममध्ये जाताना मी नमस्कार करतो. त्यानंतर वर्कआउट करायला सुरवात करतो. अनेक जण वर्कआऊट करताना फोटो सेशन करणं वा गाणी ऐकणं अशा गोष्टींमध्ये मग्न असतात. अनेकांचं लक्ष एक्‍झरसाइजवर नसतं. त्याचा परिणाम त्यांना भोगावाच लागतो. त्यामुळं मी ज्यावेळी एक्‍झरसाईज करायला लागतो, त्यावेळी मोबाईल पूर्ण बंद करतो. त्यामुळं माझं मन विचलित होत नाही. परिणामी, माझा व्यायायमही खूप चांगल्या पद्धतीनं होतो.

जी व्यक्ती भरपूर मेहनत घेत असते, ती माझ्या दृष्टीनं आदर्श असते. मग ती व्यक्ती म्हणजे आमच्या युनिटमधला एखादा तंत्रज्ञ असेल, बॉडीबिल्डर असेल किंवा रोजची भाकरी मिळविण्यासाठी भर उन्हात अंगमेहनत करणारा कामगार असेल! शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अशी माणसं तुमच्या-माझ्यापेक्षा खूप चांगली असतात.
(शब्दांकन : अरुण सुर्वे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com