
सातारा : शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश
सातारा : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने दोन वर्षांनंतर प्रथमच जिल्हा परिषदेच्या शाळांचे वर्ग उद्यापासून भरणार आहेत. समग्र शिक्षाअंतर्गत जिल्ह्यातील ८३ हजार २४१ विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी मोफत गणवेश देण्यात येणार आहेत. याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप होणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अनुसूचित जाती-जमातीमधील मुले, दारिद्र्यरेषेखालील मुले यांच्यासाठी समग्र शिक्षाअंतर्गत मोफत गणवेश वाटप करण्यात येते. प्रति गणवेश तीनशे रुपयांप्रमाणे दोन गणवेशासाठी प्रति विद्यार्थी सहाशे रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. गणवेश योजनेची मंजूर तरतूद शाळा व्यवस्थापन समिती स्तरावरून शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने खर्च करावी लागणार आहे. हा निधी शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे.
दरम्यान, कोरोनामुळे मागील दोन वर्षे ऑनलाइन वर्ग भरत होते. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने दोन वर्षांनंतर प्रथमच शाळा जून महिन्यात सुरू होणार आहेत. त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेशाबरोबर पुस्तकेही देण्यात येणार आहेत. यामध्ये जावळी तालुक्यात ३ हजार ७३०, कऱ्हाड तालुक्यात १४ हजार ८०२, कोरेगाव तालुक्यात ६ हजार ३७९, खटाव तालुक्यात ५ हजार ४९, खंडाळा तालुक्यात ८ हजार ७२, महाबळेश्वर तालुक्यात २ हजार २३९, माण तालुक्यात ७ हजार २७०, पाटण तालुक्यात ८ हजार ८११, फलटण तालुक्यात ११ हजार ५९, सातारा तालुक्यात ९ हजार ८५३, वाई तालुक्यात ५ हजार ९७७ असे ८३ हजार २४९ विद्यार्थी मोफत गणवेशाचे लाभार्थी आहेत. यामध्ये ६७ हजार ८३८ मुली, अनुसूचित जाती १ हजार २७४ मुले, अनुसूचित जमाती ९ हजार ५७९ मुले व दारिद्र्यरेषेखालील ४ हजार ५५० मुले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना दोन गणवेश शाळा व्यवस्थापन समितीमार्फत देण्यात येणार आहेत.
Web Title: सातारा शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..