Good News : साताऱ्यात ऑक्‍सिजन बेडसाठी तब्बल 50 लाखांचा निधी; कोरोना बाधितांना मोठा दिलासा

जिल्ह्यातील पाच आरोग्य केंद्रांमध्ये ऑक्‍सिजन बेडच्या उभारणीस मंजुरी मिळाली आहे.
Oxygen Bed
Oxygen Bedesakal

कोरेगाव (सातारा) : जिल्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ऑक्‍सिजन बेडची उभारणी करण्यासाठी तत्काळ निधी देण्याच्या आमदार शशिकांत शिंदे यांच्या मागणीवरून पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पाच आरोग्य केंद्रांमध्ये प्रत्येकी 30 अशा एकूण 180 ऑक्‍सिजन बेडसाठी जिल्हा नियोजन समितीतून 50 लाखांच्या निधीची तरतूद केली आहे. त्यामध्ये वडगाव हवेलीबरोबरच कोरेगाव मतदारसंघातील पुसेगाव, क्षेत्रमाहुली, वडूथ, अंगापूर या आरोग्य केंद्रांचा समावेश असल्याने कोरोना बाधितांना मोठा दिलासा मिळणार आहे.

जिल्ह्यातील पाच आरोग्य केंद्रांमध्ये ऑक्‍सिजन बेडच्या उभारणीस मंजुरी मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर काल जिल्हा परिषदेमध्ये आमदार शशिकांत शिंदे, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, कृषी समितीचे सभापती मंगेश धुमाळ, जिल्हा बॅंकेचे संचालक दत्तानाना ढमाळ, खटाव पंचायत समितीचे माजी उपसभापती संतोष साळुंखे आदींच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत जिल्ह्यासाठी उपलब्ध झालेल्या रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन व कोविड लशीबाबतचा आढावा घेण्यात आला. या वेळी शशिकांत शिंदे यांनी सांगितले, की जिल्ह्यात कोरोना वाढत असून, बाधितांची संख्या 70 हजारांच्या पुढे गेली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.

जिल्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये प्राथमिक उपाययोजना आखण्यासंदर्भात आढावा घेतला जात आहे. मी स्वतः पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्याशी सतत संपर्कात आहे. त्यानुसार पुसेगाव, क्षेत्रमाहुली, वडूथ, अंगापूर आणि वडगाव हवेली या पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोरोना बाधितांच्या प्राथमिक उपचारासाठी विशेष नियोजन केले जाणार आहे. याबाबतची जबाबदारी जिल्हा परिषदेकडे असून, त्याची पूर्तताही झाली आहे.

पालकमंत्री पाटील आणि जिल्हाधिकारी सिंह यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार त्यांनी या पाच ठिकाणच्या कोरोना सेंटरसाठी 50 लाखांचा निधी मंजूर केला आहे. या ठिकाणचे ऑक्‍सिजन बेड कार्यान्वित झाल्यानंतर आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होण्यास आणखी मदत होणार असल्याचे आमदार शिंदे यांनी सांगितले. उपाध्यक्ष विधाते यांनी ग्रामीण भागातील कोरोनाच्या परिस्थितीची माहिती दिली. रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन, कोविड लस तत्काळ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद प्रयत्नशील असून, कोरोना बाधितांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन श्री. विधाते यांनी केले. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनीही जिल्हा परिषदेकडून आखण्यात येत असलेल्या उपाययोजनांची या वेळी माहिती दिली.

Edited By : Balkrishna Madhale

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com