पुणे-बंगळूर महामार्गावर मलकापूर हद्दीत अपघात; कालेटेकची महिला जागीच ठार

राजेंद्र ननावरे | Saturday, 31 October 2020

शबाना मुजावर यांच्या डोक्‍याला मार लागल्याने त्या जागीच ठार झाल्या. टेंपोचालकासह दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातानंतर अपघातग्रस्त वाहने महामार्गावरच असल्यामुळे कोल्हापूर-सातारा लेनवरील वाहतूक ठप्प झाली होती. अपघाताची माहिती मिळताच कऱ्हाड शहर पोलिस ठाण्याचे व महामार्ग पोलिस त्वरित घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघातानंतर ठप्प झालेली वाहतूक उपमार्गावरून वळवली.

मलकापूर (जि. सातारा) : कोल्हापूर येथून कऱ्हाडकडे जात असलेल्या छोट्या टेंपोला पाठीमागून अज्ञात ट्रकने धडक दिल्याने टेंपो महामार्गावरच पलटी झाला. नेमके त्याच वेळी कालेटेक येथून कऱ्हाडला जात असलेल्या दुचाकीला धडक झाली. या तिहेरी अपघातात दुचाकीवरील महिला जागीच ठार झाली. टेंपोचालकासह एक जण किरकोळ जखमी झाले आहेत. पुणे- बंगळूर महामार्गावर नांदलापूर गावच्या हद्दीत साडेबारा वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. 

शबाना गौडबादशहा मुजावर (वय 38, रा. कालेटेक, ता. कऱ्हाड) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. अपघातस्थळावरून व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कालेटेक (ता. कऱ्हाड) येथून मुजावर हे दुचाकीवरून (एमएच 11 एडी 4978) कऱ्हाडकडे येत होते. महामार्गावरून येताना नांदलापूर गावच्या हद्दीत हॉटेल अमराई गार्डनसमोर आले असता, कोल्हापूरवरून मोकळी खोकी भरून कऱ्हाडकडे भरधाव वेगात आलेल्या टेंपोला (एमएच 10 सीआर 5736) अज्ञात ट्रकने धडक दिली. धडकेत छोटा टेंपो महामार्गावरच पलटी झाला. या वेळी मुजावर यांच्या दुचाकीला धडक झाली. धडक एवढी जोरात होती, की शबाना मुजावर यांच्या डोक्‍याला मार लागल्याने त्या जागीच ठार झाल्या.

ढेबेवाडी-पाटण प्रवास..घोडं खाईना भाडं; बस स्थानकात सन्नाटा 

टेंपोचालकासह दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातानंतर अपघातग्रस्त वाहने महामार्गावरच असल्यामुळे कोल्हापूर- सातारा लेनवरील वाहतूक ठप्प झाली होती. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग देखभाल विभागाचे कर्मचारी संजय माने, सूरज देवकर, संज्योत खोत, कृष्णा फारने, चेतन पवार यांच्यासह कऱ्हाड शहर पोलिस ठाण्याचे व महामार्ग पोलिस त्वरित घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघातानंतर ठप्प झालेली वाहतूक उपमार्गावरून वळवण्यात आली. मृतदेहासह अपघातग्रस्त वाहनांचा पंचनामा करून वाहने पोलिस ठाण्यात, तर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी देखभाल विभागाच्या रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिला. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे