मल्हारपेठ-पंढरपूर-गुहागर राज्यमार्गावरील उरुल घाटात मृत्यू झाला स्वस्त!

मल्हारपेठ-पंढरपूर-गुहागर राज्यमार्गावरील उरुल घाटात मृत्यू झाला स्वस्त!

मल्हारपेठ (जि. सातारा) : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळे उरुल घाटात मृत्यू स्वस्त झाला आहे. घाटातील धोकादायक संरक्षण कठड्यांच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे कायम दुर्लक्ष असल्याने अजून किती बळी जाण्याची वाट बघणार, असा सवाल प्रवासी नागरिकांतून विचारला जात आहे. 

महिन्यापूर्वी चिपळूणवरून पुण्याकडे निघालेल्या होंडासिटीचा अपघात होऊनही माहिती नसताना पाण्यात अडकलेले मृतदेह सापडल्यानंतर अपघातग्रस्त गाडीही खोल दरीतच सापडली. पहिल्या वळणावर संरक्षक कठडा नसल्यामुळे गाडी खोल दरीत जाऊन भीषण अपघात झाला होता. यातील दोन्ही युवक जागीच ठार झाले. याच वळणावर मळी घेऊन जाणाऱ्या ट्रकचा दरीत पडून अपघात झाला. यात एकास आपला जीव गमवावा लागला. या पद्धतीने घाटात अनेक छोटे-मोठे अपघात होऊन अनेक जण आत्तापर्यंत गंभीर जखमी झाले आहेत. इतके अपघात होऊनही बांधकाम विभागाला अजूनही त्यावरील मार्ग सापडलेला नाही. 

मल्हारपेठ-पंढरपूर-गुहागर राज्यमार्गावरील पाटण तालुक्‍यातील उरुल घाटमार्ग कोकणला जोडणारा जवळचा मार्ग असल्याने याच घाटातून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची नेहमी वर्दळ असते. गेल्या पाच ते सहा वर्षांत घाटात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अनेक वाहनधारकांचा हा घाट कर्दनकाळ ठरलेला आहे. पूर्व बाजूस मोठी दरी आणि पश्‍चिम बाजूला डोंगर व तीव्र उतार आहे. तसेच अरुंद रस्त्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागते. अनेकवेळा अपघात झाल्यानंतर प्रशासन तेवढ्यापुरते जागे होऊन घाट रस्त्याची दुरुस्ती करते. मात्र, अवघड वळणावरील तुटलेल्या संरक्षक कठड्यांची दुरुस्ती झालेली नसते. घाटात एकही दिशादर्शक फलक नसल्याने बाहेरील वाहनाना अंदाज येत नसल्याने अपघात होत आहे. प्रशासनाने तातडीने गंभीर दखल घेऊन या घाटातील संरक्षक कठडे भक्कम करण्याची गरज आहे. 

दोन वर्षांपूर्वी संरक्षक कठडे तोडून खोल दरीत पडलेल्या ट्रकनंतर झोपी गेलेल्या बांधकाम विभागाने संरक्षक कठडे बांधले असते तर 20 दिवसांपूर्वी याच वळणावर झालेल्या अपघातातील दोन्ही युवक वाचले असते. घाटमार्गाची आता तरी दखल घेऊन बांधकाम विभागाने संरक्षक कठड्यांची दुरुस्ती करावी, अन्यथा लवकरच घाटात रास्ता रोको आंदोलन करणार आहे. 
-रमेश देसाई, माजी उपसरपंच, उरुल 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com