Mahabaleshwar Market : व्यापाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पालकमंत्र्यांनी दिला 'हा' आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shambhuraj Desai

पालकमंत्र्यांनी पालिकेतील अधिकाऱ्यांना १० जूनपर्यंत अतिक्रमणाची कोणतीही कारवाई न करण्याच्या सूचना केल्या.

Mahabaleshwar Market : व्यापाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पालकमंत्र्यांनी दिला 'हा' आदेश

महाबळेश्वर : येथे अधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी आलेल्या पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्यापुढे शहरातील बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या शिष्ठमंडळाने भेट घेतली. त्यानंतर पालकमंत्र्यांनी बाजारपेठेतील अतिक्रमण काढून घेण्यासाठी १० जूनपर्यंत मुदत दिल्याने व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

महाबळेश्वर बाजारपेठेच्या (Mahabaleshwar Market) सुशोभीकरणासाठी १०० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. बाजारपेठेच्या सुशोभीकरणाचा नियोजित आराखड्यामध्ये व्यापाऱ्यांच्या मिळकतीमधील चार फूट जागा मोकळी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी जोर लावला होता; परंतु या आराखड्याला व्यापाऱ्यांकडून तीव्र विरोध होत होता. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आराखडा बदलून व्यापाऱ्यांच्या मिळकतीचा भाग सोडून गटारापासून नवीन आराखडा तयार करण्याच्या सूचना केल्या होत्या.

याबाबत आराखडा अद्याप तयार न झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), खासदार श्रीकांत शिंदे व पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी नाराजी व्यक्त केली व आराखडा लवकरात लवकर तयार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. दरम्यान, येथे उन्हाळी हंगामाची लगबग सुरू आहे. याच गडबडीत नगरपालिकेने बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना गटारावरील अतिक्रमण काढून घेण्यासंदर्भात नोटीस पाठविल्याने शहरातील व्यापारी ऐन हंगामात गोंधळले.

याबाबत शहरातील व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री शंभूराज देसाई यांची त्यांच्या मतदारसंघात जाऊन भेट घेऊन विनंती केली. वास्तविक व्यापाऱ्यांनी या अगोदरच पालिकेत आराखडा तयार केल्यानंतर सुशोभीकरणाच्या कामाचे स्वागत करून स्वतःहून अतिक्रमण काढण्याचे आश्वासन दिल्याची माहिती पालकमंत्र्यांना दिली. उन्हाळी हंगामात अशी कोणतीही कारवाई करून व्यापाऱ्यांना त्रास देऊ नये, अशी विनंती केली.

याबाबत पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतो, असे आश्वासन दिले होते. आज राजभवन येथे होणाऱ्या बैठकीत येथील व्यापाऱ्यांचे शिष्टमंडळ पालकमंत्र्यांकडे पुन्हा भेटण्यासाठी गेले असता पालकमंत्र्यांनी पालिकेतील अधिकाऱ्यांना १० जूनपर्यंत अतिक्रमणाची कोणतीही कारवाई न करण्याच्या सूचना केल्या. पालकमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाने शहरातील व्यापारी आनंदित झाले असून, आज बाजारपेठेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

बाजारपेठेतील अतिक्रमणाची कारवाई तूर्त थांबविण्यासाठी शहरातून माजी नगरसेवक कुमार शिंदे यांच्यासह हेमंत साळवी, अतुल सलागरे, ॲड. संजय जंगम, केतन यादव, सनी अरोरा, गिरीश नायडू, गिरीश तिताडे, मदन तांबे आदी उपस्थित होते.