esakal | धोंडी धोंडी पाऊस दे, पैशाला पावली विकू दे!, गावोगावी घातले जातेय पावसाला साकडे
sakal

बोलून बातमी शोधा

Satara

गावागावातील काही कळत्या युवकांना आपल्या घरातील कर्त्या पुरुषाची अर्थात बळिराजाची पावसासाठीची ही अगतिकता पाहावत नसल्यामुळे हे तरुण पूर्वापार चालत आलेली पावसाला साकडे घालण्यासाठीची धोंडी...लहान लहान मुलांना जमा करून काढू लागले आहेत. 

धोंडी धोंडी पाऊस दे, पैशाला पावली विकू दे!, गावोगावी घातले जातेय पावसाला साकडे

sakal_logo
By
पांडुरंग बर्गे

कोरेगाव (जि. सातारा) : पावसाने ओढ दिल्याने हातातोंडाशी आलेली खरीप पिके वाया जाण्याच्या भीतीने बळिराजा हतबल झालेला असून, लवकरात लवकर पाऊस पडावा, जोमात आलेली पिके हाती लागावीत यासाठी कोरोना विषाणूच्या संकटकाळातही गावोगावी लहान-लहान मुले धोंडी धोंडी पाऊस दे, पैशाला पावली विकू दे... मेघराजा पाऊस दे... शेरडं करडं जगू दे...आदी आरोळ्यांद्वारे पावसाचा धावा करत पारंपरिक धोंडी काढत आहेत. 

यंदा जून महिन्यामध्ये वेळेत पावसाचे आगमन झाले. या समाधानकारक पावसाच्या जिवावर बळिराजाने खरीप पेरण्या उत्साहाने केल्या. त्यानंतरही पिकांपुरता पाऊस झाला. पिके जोमात उगवली. त्यानंतर शेतकऱ्यांनी कोळपणी, भांगलणी केली. सध्या पिके फुलोऱ्यात असताना पावसाने ओढ दिल्याने हंगाम वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. पाऊस नसल्यामुळे फळधारणा धोक्‍यात आली आहे. आकाशात काळे ढग जमताहेत, तर लगेच ऊन पडते आहे. कधी अधेमधे पावसाची सर येत आहे, तर लगेचच ऊन पडत आहे. ऊन-पावसाच्या खेळाने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला असून, चांगल्या पावसासाठी आभाळाकडे डोळे लावून बसतो आहे. बळिराजा अगतिक झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. 

गावातील काही कळत्या युवकांना आपल्या घरातील कर्त्या पुरुषाची अर्थात बळिराजाची पावसासाठीची ही अगतिकता पाहावत नसल्यामुळे हे तरुण पूर्वापार चालत आलेली पावसाला साकडे घालण्यासाठी लहान लहान मुलांना जमा करून धोंडी...काढू लागली आहेत. या धोंडीत एका लहान मुलाच्या संपूर्ण शरीराला लिंबाचा पाला गुंडाळून डोक्‍यावर बसण्याच्या पाटावर श्री शिवलिंग ठेऊन त्याला गावात दारोदार फिरवले जाते. या छोटया मिरवणुकीत "मेघराजा पाऊस दे... शेरडं करडं जगू दे...धोंडी धोंडी पाऊस दे, पैशाला पावली विकू दे...धोंडी राहिला शिवेवर पाऊस आला गावावर...कोण म्हणतं येत नाय, आल्याशिवाय राहत नाय' आदी आरोळ्या दिल्या जातात.

धोंडी दारावर आल्यावर घरातील महिला शिवलिंगावर पाणी सोडून पूजन करतात आणि भाजी-भाकरी, चटणी आदी शिधा देतात. गावाची फेरी पूर्ण झाल्यानंतर धोंडीमधील युवकांनी डोक्‍यावर घेतलेल्या घागरीतील पाण्याने गावातील महादेव मंदिरात जावून जलाभिषेक घालून पिंडीला पाण्यात ठेवण्यात येते. अशा प्रकारे देवाला कोंडल्यामुळे पाऊस पडतो, अशी लोकांमध्ये पूर्वापार धारणा आहे. त्यानंतर प्रत्येक घरातून जमा झालेली भाजी-भाकरी मुले एकत्र गोलाकार बसून आवडीने खातात. जोवर पाऊस पडत नाही, तोवर दररोज ही मुले अशा प्रकारे पावसाला साकडे घालत असतात. 

त्रिपुटीत महादेवाच्या पिंडीला जलाभिषेक 

दरम्यान, त्रिपुटी (ता. कोरेगाव) येथील श्रीनाथ सोशल ग्रुप, श्रीनाथ ग्रुप, श्रीनाथ तरुण मंडळ, गावातील तीन मंडळांतील युवकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळत काल रात्री धोंडी काढली. त्यानंतर श्री महादेव मंदिरात जावून महादेवाच्या पिंडीला जलाभिषेक घालून पावसाला साकडे घातले. 
 

loading image
go to top