आमदार महेश शिंदेंची शिष्टाई असफल; राष्ट्रवादीच्या नेत्याचा 'त्यांना' पाठिंबा! Koregaon Employees Strike | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shashikant Shinde Mahesh Shinde

आम्ही आमच्या काळातील सर्व वेतने अदा करत आलो असून, मागील काळातील जवळपास सहा वेतने देणे बाकी आहेत.

Koregaon Employees Strike : आमदार महेश शिंदेंची शिष्टाई असफल; राष्ट्रवादीच्या नेत्याचा 'त्यांना' पाठिंबा!

कोरेगाव : नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी (Municipality Employees) आठ महिन्यांचे प्रलंबित वेतन अदा करण्याच्या मागणीसाठी कालपासून येथील तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले. दरम्यान, उपोषणकर्त्यांची आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) आणि आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) आदींनी भेट घेऊन त्यांच्या अडचणी समजून घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोडगा निघाला नाही.

नगरपंचायत कर्मचाऱ्यांचे आठ महिन्यांचे वेतन अदा करण्यात आलेले नसल्यामुळे त्यांचे आर्थिकदृष्ट्या हाल सुरू असून, त्यांच्यावर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. अशा पार्श्वभूमीवर कर्मचारी संघटनेने कालपासून येथील तहसीलदार कचेरीसमोर बेमुदत उपोषण सुरू केले. त्यामध्ये १४ कर्मचारी उपोषण करणार असून, उर्वरित कर्मचारी त्यांना पाठिंबा म्हणून लाक्षणिक उपोषण करत आहेत.

उपोषण सुरू झाल्यानंतर आमदार शशिकांत शिंदे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. आकृतिबंधाबाहेरील कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू, अशी ग्वाही देऊन त्यांनी कागदपत्रे देण्याचे आवाहन केले. नगरपंचायत फंडातील निधी इतरत्र वळवला जात असल्यामुळे आज कर्मचारी वेतनापासून वंचित राहिल्याची माहिती आपल्याला मिळाली असून, ही बाब गंभीर असल्याचे नमूद करत उपोषणाला पाठिंबा दिला.

दरम्यान, सायंकाळी आमदार महेश शिंदे, मुख्याधिकारी चैतन्य कोंडे, उपनगराध्यक्ष सुनील बर्गे, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य राहुल बर्गे, माजी नगरसेवक महेश बर्गे आणि नगरसेवकांनी उपोषणकर्त्यांशी संवाद साधला. आम्ही आमच्या काळातील सर्व वेतने अदा करत आलो असून, मागील काळातील जवळपास सहा वेतने देणे बाकी आहेत. कर्मचाऱ्यांना सर्व वेतने अदा करायला पाहिजेत. याबाबत कोणाचे दुमत नाही; परंतु नगरपंचायतीची आर्थिक स्थिती पाहावी लागेल. कोणी काही म्हणो; पण आम्ही आमच्या काळात एक रुपयाही नगरपंचायत निधी इतरत्र वळवलेला नाही, अशी माहिती माजी नगरसेवक महेश बर्गे यांनी दिली.

आमदार महेश शिंदे म्हणाले, ‘‘आम्ही नगरपंचायतीमधील आकृतिबंधाबाहेरील जास्तीतजास्त कर्मचाऱ्यांचे समायोजन कसे होईल, अशा प्रयत्नात आहोत. तद्वत नगरपंचायतीचे उत्पन्न वाढविण्यावर भर देत आहोत. त्याला थोडा वेळ हवा आहे. आज नगरपंचायतीचे वीजबिलावर महिन्याला सुमारे दहा लाख रुपये खर्च होत आहेत. त्यावर उपाय म्हणून आम्ही सोलर प्लांट बसवत आहोत. सप्टेंबर- ऑक्टोबरपर्यंत हे प्लांट सुरू होऊन नगरपंचायतीचे महिन्याला तब्बल दहा लाख रुपये वाचून आपल्याला कर्मचाऱ्यांचे वेतन सहजसुलभ करणे शक्य होणार आहे.’’

तेव्हा आता आज (ता. २६) दोन पगार अदा करूया. त्यानंतर सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला पगार करण्याची व्यवस्था आपण करूया. तोपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांनी सबुरीने घ्यावे. उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन केले. त्यावरती कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष धनंजय पंडित यांनी आम्हाला तीन पगार आज (ता. २६) द्यावेत. दोन पगार एवढ्या वेळेत देऊ असे लिखित द्यावे, अशी मागणी केली. मात्र, ती मागणी अमान्य झाल्याने उपोषण सुरू राहिले आहे.