ढेबेवाडीत लालपरीची सेवा पूर्ववत; पाटण आगाराकडून एसटीच्या सर्व फेऱ्या सुरू

राजेश पाटील
Friday, 20 November 2020

पाटण तालुक्‍याचे ठिकाण असल्याने विविध कामानिमित्ताने येथील नागरिकांची पाटणला नित्य ये-जा असते. या मार्गावर सकाळी आठ ते रात्री आठ या कालावधीत पाटण एसटी आगाराच्या अनेक गाड्या धावतात. पाटण आगाराच्या तीन बस रात्री येथे मुक्कामीही असतात. मात्र, मार्चमध्ये लॉकडाउन जाहीर झाल्यापासून बंद झालेली बससेवा सुरळीत न झाल्याने प्रवाशांचे अतोनात हाल सुरू होते.

ढेबेवाडी (जि. सातारा) : लॉकडाउनच्या काळात बंद ठेवलेली ढेबेवाडी-पाटण मार्गावरील एसटी बससेवा आणि येथील बस स्थानकातील वाहतूक नियंत्रक कक्ष पूर्ववत सुरू झाला आहे. दै. "सकाळ'मध्ये या संदर्भातील गैरसोयीचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर पाटण आगाराने तातडीने गैरसोय दूर केल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

तालुक्‍याचे ठिकाण असल्याने विविध कामानिमित्ताने येथील नागरिकांची पाटणला नित्य ये-जा असते. या मार्गावर सकाळी आठ ते रात्री आठ या कालावधीत पाटण एसटी आगाराच्या अनेक गाड्या धावतात. पाटण आगाराच्या तीन बस रात्री येथे मुक्कामीही असतात. मात्र, मार्चमध्ये लॉकडाउन जाहीर झाल्यापासून बंद झालेली बससेवा सुरळीत न झाल्याने प्रवाशांचे अतोनात हाल सुरू होते. ढेबेवाडी- पाटण हे 33 किलोमीटरचे अंतर असताना येथील नागरिकांना कऱ्हाडमार्गे 64 किलोमीटरचा प्रवास करून पाटणला जावे लागत होते. त्यामुळे 45 रुपयांऐवजी 80 रुपयांचा भुर्दंड बसत होता. "सकाळ'ने वृत्ताद्वारे याबाबतची वस्थुस्थिती समोर आणल्यानंतर पाटण आगाराने एसटी बससेवा आणि येथील बस स्थानकातील वाहतूक नियंत्रक कक्ष पूर्ववत सुरू करून प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. 

व्वा! क्या बात है.. नेता हो तो ऐसा; रोहित पवारांच्या मदतीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा

बस स्थानकात पाणी अन्‌ स्वच्छताही नाही... 

एसटीला दिवसभरात लाखभर रुपयांचे उत्पन्न मिळवून देणाऱ्या ढेबेवाडी खोऱ्याचे दळणवळण पूर्णतः एसटीवर अवलंबून आहे. येथील बस स्थानकाच्या नूतनीकरणावर आतापर्यंत मोठा खर्च करण्यात आला असला, तरी काही गैरसोयी अजूनही ठाण मांडूनच आहेत. साफसफाईसाठी स्वतंत्र कामगार नसल्याने बस स्थानकातील अस्वच्छतेचा प्रश्न कायम असून, स्थानकाला स्वतंत्र पाणीपुरवठ्याची व्यवस्था नसल्याने बस सोबत येणारे कर्मचारी, तसेच प्रवाशांवर पाणी- पाणी करण्याची वेळ येत आहे. सध्या वाहतूक नियंत्रक घरातून येताना कर्मचाऱ्यांसाठी पाण्याचे कॅन सोबत घेऊन निघत असल्याची माहिती मिळाली. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: All Rounds Of ST Start From Patan Depot Satara News