Apmc Election : कऱ्हाड बाजार समितीसाठी दुपारी एकपर्यंत चुरशीने ९० टक्के मतदान Apmc Election Karhad Enthusiasm for voting | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाजार समितीच्या निवडणुक

Apmc Election : कऱ्हाड बाजार समितीसाठी दुपारी एकपर्यंत चुरशीने ९० टक्के मतदान

कऱ्हाड : बाजार समितीच्या निवडणुकीच्या मतदानासाठी आज रविवारी सकाळी सात वाजता मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. या निवडणुकीसाठी कऱ्हाड तालुक्यातील नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे यावेळच्या निवडणुकीला मोठे महत्व प्राप्त झाले आहे. सकाळी नऊ वाजल्यापासुनच मतदारांचा ओघ वाढला. त्यामुळे मतदानसाठी रांगा लागल्या होत्या. दुपारपर्यंत तब्बल ९० टक्के मतदान झाले.

कऱ्हाड शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमुळे तालुक्यातील राजकीय समिकरणे बदलली आहेत. सध्या तालु्क्यात काँग्रेस विरुध्द राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप असा सामना होत आहे. त्यामुळे तालुक्यातील माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, माजी सहकारमंत्री आमदार बाळासाहेब पाटील, काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, भाजपचे कार्यकारणी सदस्य अतुल भोसले यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

बाजार समितीच्या सोसायटी मतदार गटात १८६५ मते आहेत, ग्रामपंचायत गटात १९०० मते आहेत, व्यापारी गटात ३७२ मते आहेत. कऱ्हाड तालुक्यातील मसुर, उंब्रज, कोळे, उंडाळे, काले, कऱ्हाड या मतदान केंद्रावर मतदान होत आहे. मतदानास सकाळी सात वाजता उत्साहात प्रारंभ झाला. नऊनंतर मतदारांचा मतदानासाठी येण्याचा ओघ वाढला. त्यामुळे मतदान केंद्रावर रांगा लागल्या होत्या.

सकाळी सात ते नऊ दरम्यान ४१९३ मतदारांपैकी ५३६ मतदारांनी, सकाळी नऊ ते ११ दरम्यान ४१९३ मतदारांपैकी २४५३ मतदारांनी तर सकाळी ११ ते दुपारी एक वाजेपर्यंत ४१९३ मतदारांपैकी ३७४८ मतदारांनी मतदानाच हक्क बजावला. त्यामुळे दुपारी एक वाजेपर्यंत तब्बल ८९.३९ टक्के मतदान झाले.

मतदान केंद्रावर मोठा बंदोबस्त

कऱ्हाड तालुक्यातील निवडणुक ही हॉट बनली आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोणताही अनुचीत प्रकार घडु नये यासाठी पोलिस उपाधिक्षक डॉ. रणजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ शहर पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, तालुका पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी मोठी फौजफाटा मतदान केंद्रावर तैनात केला आहे. स्वतः अधिकारीही मतदान केंद्रावर थांबुन होते. त्यामुळे दुपारपर्यंत कोणताही अनुचीत प्रकार घडला नाही.