पोटात वाढवलेलं बाळ मला कोरोनाशी झुंजायला बळ देत होतं!

पांडुरंग बर्गे | Sunday, 27 September 2020

माझी परिस्थिती इतर कोरोनाबाधितांपेक्षा वेगळी आहे. मी गरोदर असल्यामुळे सगळेच काळजीने बघायचे. अशी स्थिती असूनही मी खचून न जाता धैर्याने तोंड दिले. त्यासाठी मला खरा आधार व पाठबळ डॉ. राजन काळोखे यांनी दिला. त्यामुळे मी स्वतःला आणि बाळाला जन्म देवून वाचवू शकले, असे हिवरे (ता. कोरेगाव) येथील सौ. अर्चना शशिकांत खताळ यांनी सांगितले.

सातारा : गर्भवतींसाठी कोविड चाचणी अनिवार्य असल्याने मी 23 जून रोजी पेठ किन्हई येथील आरोग्य केंद्रात चाचणी केली असता, मला कोरोनाबाधित घोषित केले. घरची परिस्थिती बेताची. दररोजचे नातेवाईक, ग्रामस्थांनीही दृष्टिकोन बदलून घराकडे पाठ फिरवलेली. एकमेकांत होणारी गरज बंद झाली. धीर तुटला, आत्मविश्‍वास कमी होऊन नकोसे वाटू लागले. नशीब बलवत्तर म्हणून मला डॉ. काळोखे यांचा फोन मिळाला. मी माझी करुण कहानी त्यांना फोनद्वारे कथन केली. त्यांनी घाबरू नका, असे सांगत मला धीर व आधार दिला. तो आजही स्मरणात राहिला. तेथूनच मला बळ मिळाले, असे अर्चना शशिकांत खताळ यांनी सांगितले. 

त्या पुढे सांगू लागल्या, नंतर 108 ऍब्युलन्स बोलावून सातारा येथे सर्वसाधारण रुग्णालयात रात्रीच्या 11 च्या सुमारास पोचले. तेथे अवहेलना नशिबी येत असल्याची जाणीव होत होती. पुन्हा मी डॉ. काळोखेंना फोन केला. त्यांनी दवाखान्यात फोन लावून माझी व माझ्या होणाऱ्या बाळाच्या तपासणीबाबत चर्चा करून मला धीर दिला. भीऊ नका, ठीक होईल. नंतर दुसऱ्या दिवशी मला सर्वसाधारण रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर विलगीकरणात ठेवण्यासाठी कोरेगाव येथे चॅलेंज ऍकॅडमीतील केअर सेंटरमध्ये दाखल केले गेले. मी डॉ. काळोखेंना कधी पाहिले नव्हते अथवा कधीही ओळख नसताना तेथील यंत्रणेसही डॉ. काळोखे यांनी मी गरोदर असल्यामुळे आहार, प्रकृतीबाबत काळजी घेण्यास सांगितले. पोटात वाढवलेले बाळ मला पाहायचे होते. त्याला जन्म देवून मोठे करायचे होते. ही जिद्द मनात ठेवून मी कोरोनाशी दोन हात केले. अखेर कोरोनामुक्त झाले. तेथून मला पाच ते सहा दिवसांत घरी सोडले. 

मनाशी खूणगाठ बांधली अन् कोरोनाला धैर्याने तोंड दिले : पोलिस पाटील प्रशांत कोळी

Advertising
Advertising

पाच सप्टेंबर रोजी मला गरोदरपणाचा त्रास होऊ लागल्यामुळे पहाटे तीन वाजता सातारा येथे सर्वसाधारण रुग्णालयात नेण्यात आले. तेथील अनुभव पुन्हा अजब, अवलेनादायक अनुभव नशिबी आला. अखेर तेथेही डॉ. काळोखे धावून आले. त्यांनी फोन केला अन्‌ उपचार सुरू झाले. अखेर मला कन्यारत्न झाले. मी व माझी कन्या छान आहोत. डॉ. काळोखे यांच्यासारखी माणसे आरोग्य खात्यात दुर्मिळ. इतरांनी त्यांचा आदर्श घेतला तर आरोग्य खात्याकडे बोट दाखवण्याची कोणाची हिंमत होणार नाही. आजारी माणसांचा दुवा त्यांना नक्की मिळेल, असेही त्या शेवटी म्हणाल्या.