सातारा : थकबाकी अद्यापही ३८ कोटींच्‍या घरात

शहराच्या विविध भागांत पथके कार्यरत; आजअखेर १५ कोटींची वसुली
arrears of Rs 38 crore pending satara
arrears of Rs 38 crore pending satarasakal

सातारा : स्‍थावर मालमत्तांसह इतर सुविधांसाठीच्‍या कराची थकबाकी वसूल करण्‍यासाठी नगरपालिकेची पथके कार्यरत असून हद्दवाढीनंतर पालिकेत आलेल्‍या भागासह मूळ शहराची थकबाकी ‍सद्य:स्‍थितीत ५२ कोटींच्‍या घरात जावून पोचली आहे. गेले दोन महिन्‍यांपासून सुरू असणाऱ्या प्रयत्‍नांमुळे पालिकेच्‍या तिजोरीत वसुलीपोटी १४ कोटी ७० लाखांची भर पडली असून उर्वरित ३८ कोटी वसूल करण्‍यासाठी पालिकेच्‍या हातात फक्‍त नऊ दिवस राहिले आहेत.

सातारा शहरातील मिळकती तसेच नागरिकांना प्रभागनिहाय पुरविण्‍यात येणाऱ्या सुविधांपोटी नागरिकांकडून पालिकेकडून कर वसुली करण्‍यात येते. दोन वर्षांपूर्वी जाहीर झालेला लॉकडाउन व त्‍यानंतरच्‍या इतर तांत्रिक प्रक्रियांमुळे सातारा पालिकेची वसुली रखडली होती. अनलॉक प्रक्रियेनुसार सर्व व्‍यवहार सुरळीत सुरू झाल्‍याने पालिकेने थकबाकी वसुलीवर भर दिला आहे. मूळ शहरातील मिळकतधारकांकडून पालिकेस सुमारे ४४ कोटी रुपयांची येणे बाकी होती. ही थकबाकी वसूल करण्‍यासाठी पालिकेने तीन पथके कार्यरत केली असून थकबाकीदारांच्‍या मिळकती जप्‍त करण्‍याबरोबरच त्‍या ठिकाणचा पाणीपुरवठा खंडित करण्‍याचे काम सध्‍या या पथकांकडून सुरू आहे.

गतवर्षी शासनाने सातारा पालिकेची प्रलंबित असणारी हद्दवाढ मंजूर केल्‍याने शाहूपुरी, विलासपूर या दोन पूर्ण ग्रामपंचायती तसेच शाहूनगर, पिरवाडी व इतर त्रिशंकू भाग पालिकेत आला. या भागातील मिळकतींचे सर्वेक्षण करत त्‍या ठिकाणचे दप्‍तर ताब्‍यात घेण्‍याची प्रक्रिया पालिकेने पार पाडली असून त्‍यानुसार त्‍या भागातील नागरिकांनादेखील कर भरण्‍याच्‍या नोटिसा बजावण्‍यात आल्‍या आहेत. हद्दवाढीनंतर पालिकेत आलेल्‍या भागाची कर वसुली सुमारे नऊ कोटींच्‍या आसपास आहे. मूळ शहर आणि विस्‍तारित भागातील थकबाकीचा आकडा ५२ कोटींच्‍या घरात असून ‍सद्य:स्‍थितीत त्‍यापैकी १४ कोटी ७० लाख रुपये पालिकेच्‍या तिजोरीत वसुलीपोटी जमा झाले आहेत.

दरम्यान, सातारा शहरातील नागरिकांना कास तसेच शहापूर योजनेच्‍या माध्‍यमातून पाणीपुरवठा करण्‍यात येतो. यापोटी नळ जोडणीधारकांकडून पालिकेस नऊ कोटी रुपयांची पाणीपट्टी येणे बाकी आहे. मिळकतकरांबरोबरच पाणीपट्टीदेखील पथके वसूल करत असून आजअखेर एकूण नऊ कोटींपैकी दोन कोटी ४२ लाख रुपये पालिकेने वसूल केले आहेत.

पालिकेच्‍या वतीने थकबाकीदारांना नोटिसा बजावण्‍यात आल्‍या आहेत. या नोटिसा मिळाल्‍यानंतरही थकबाकी न भरणाऱ्यांच्‍या मालमत्ता जप्‍त करण्‍याबरोबरच त्‍या ठिकाणच्‍या नळजोडण्‍या तोडण्‍याचे काम पालिकेकडून हाती घेण्‍यात आले आहे. नागरिकांनी थकबाकी जमा करत पालिकेस सहकार्य करावे.

- अतुल डिसले, वसुली अधिकारी,सातारा नगरपालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com