जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुमली हलगी; कलाकारांचा सरकारला अल्टिमेटम!

उमेश बांबरे | Wednesday, 16 September 2020

कोरोनाच्या लॉकडाउनमध्ये सर्व प्रकारचे कार्यक्रम बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे विविध क्षेत्रातील कलाकारांनीही सर्व काम बंद ठेवून कोरोना संसर्ग रोखण्यात शासनास सहकार्य केले. मात्र, त्यानंतर लॉकडाउन शिथिल केले. पण, कार्यक्रमांना बंदी कायम ठेवली आहे. त्यामुळे विविध क्षेत्रातील कलाकारांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न निर्माण झाला.

सातारा : कोरोनामुळे सर्व प्रकारचे कार्यक्रम बंद असल्याने सर्व क्षेत्रातील कलाकारांना जीवन जगणे मुश्‍किल झाले आहे. या कलाकारांना शासनाने तातडीची मदत जाहीर केलेली नाही, त्यामुळे आपल्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील कलाकारांनी आज (ता. १६) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून हलगी वाजवत शंखध्वनी आंदोलन केले. कलाकारांना कोरोना काळातील नुकसानीची तातडीने भरपाई द्यावी, अन्यथा चार ऑक्‍टोबरला विधानभवनासमोर आक्रोश आंदोलन करण्याचा इशारा राज्य कलाकार महासंघाचे अध्यक्ष अनिल मोरे यांनी दिला आहे. 

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात महासंघाने म्हटले की, कोरोनाच्या लॉकडाउनमध्ये सर्व प्रकारचे कार्यक्रम बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे विविध क्षेत्रातील कलाकारांनीही सर्व काम बंद ठेवून कोरोना संसर्ग रोखण्यात शासनास सहकार्य केले. मात्र, त्यानंतर लॉकडाउन शिथिल केले. पण, कार्यक्रमांना बंदी कायम ठेवली आहे. त्यामुळे विविध क्षेत्रातील कलाकारांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न निर्माण झाला. 

...तरच आम्ही पुढाकार घेऊ; मराठा आरक्षणाच्या मुद्यावर उदयनराजेंचे माेठे वक्तव्य

या संदर्भात मंत्री, आमदार, खासदार, अधिकारी यांना निवदेन देऊन किमान कलाकारांना काही नियम व अटींवर कार्यक्रमास परवानगी मिळावी, अशी मागणी केली होती. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर ढोल वाजवा आंदोलन केले होते. त्यानंतरही या कलाकारांबाबत कोणताही निर्णय शासनाने घेतला नाही की नुकसान भरपाई जाहीर केली नाही. त्यामुळे आज या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील कलाकारांनी राज्य कलाकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अनिल मोरे व जिल्हाध्यक्ष रामचंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून शंखध्वनी आंदोलन केले. 

सरकार म्हणतं, एलआयसीचं खासगीकरण नाही; पण हे अर्धसत्यच!

तसेच कलाकारांनी हलगीचा कडकडाट केला. शासनाने तातडीने विविध कार्यक्रमांना परवानगी द्यावी, तसेच कलाकारांना बंद काळातील नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास चार ऑक्‍टोबरला सर्व कलाकारांनी विधानभवनासमोर आक्रोश आंदोलन करण्याचा इशारा श्री. मोरे यांनी दिला आहे. या आंदोलनात कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष जयवंतराव वायदंडे, बाळासाहेब जाधव, सुनील वाडेकर, कैलास जाधव, संजय भिंगारदेवे, सुनील कांबळे, उमेश अवघडे, महेश कदम, शिवाजी वाघमारे, परशुराम साठे, विकास साठे आदींसह जिल्ह्यातील कलाकार उपस्थित होते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे