दिंडीकऱ्यांनी वाचला समस्यांचा पाढा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा : दिंडी संघटनेची लोणंद तळावर बैठक
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Ceremony Meeting of Dindi Association at Lonand
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Ceremony Meeting of Dindi Association at Lonand

लोणंद - तळावर जागा कमी पडते, वाहतुकीचे नियोजन नसल्याने दिंड्यांचे ट्रक पोचायला वेळ होतो, मुक्त चालणाऱ्यांमुळे शिस्तीत चालणाऱ्या अधिकृत दिंड्यांना त्रास होतो, सरकारनी लावलेल्या स्वच्छतागृहाची अस्वच्छता, अशा अनेक समस्यांचा पाढा दिंडीकऱ्यांनी लोणंद मुक्कामी बैठकीत वाचला. त्याला प्रमुख मानकरी आणि संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे सोहळाप्रमुख अॅड. विकास ढगे-पाटील यांनी उपाययोजना सुचविल्या. तसेच दिंडीकरांनी काही गोष्टींमध्ये एकमेकांमध्ये वेळीच समन्वय साधावा. त्यातून न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जाण्याची वेळ येणार नाही. समस्यांवर सामोपचाराने तोडगा काढावा, असे आवाहन अॅड. ढगे यांनी केले.

लोणंदच्या तळावर श्रीमंत शितोळे सरकार यांच्या पालावर संत ज्ञानेश्वर महाराज दिंडी समाज संघटनेची बैठक झाली. त्याला प्रमुख मानकरी ऊर्जितसिंह शितोळे सरकार, सोहळाप्रमुख ॲड. विकास ढगे, प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, पालखी सोहळा मालक ऋषिकेश आरफळकर, राणूमहाराज वासकर, उद्धव चोपदार, दिंडी समाज संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब गोसावी, सचिव मारुती महाराज कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.

अॅड. ढगे म्हणाले, ‘‘तळावर तंबू लावताना प्रत्येकाने आपल्या शेजारच्या दिंडीकऱ्यांचा विचार केला पाहिजे, आपणच जागा अडवून बसण्याची भूमिका चुकीची आहे. माउलींच्या रथापुढे चालणाऱ्या मोकळ्या समाजाबाबत सर्वानुमते धोरण ठरविण्याची गरज आहे. अपापसातील वाद वेळीच मिटवावेत, ते वाद जास्तीत जास्त देवस्थानच्या पातळीवर सुटतील, असे पाहावे. कोणीही तो वाद न्यायालयात जाईल, असे पाहू नये. एकमेकांचा समन्वयातूनच वारीला अधिक बळकटी देईल. त्यामुळे सर्वांनीच याची काळजी घेतली पाहिजे.’’

ऊर्जितसिंह शितोळे सरकार म्हणाले, ‘‘सोहळ्यात पुढे चालणाऱ्या समाजाबद्दल सर्वानुमते ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे.’’ राणूमहाराज वासकर म्हणाले, ‘‘चैत्र वारीच्या बैठकीत वर्षभराचे विषय पूर्ण होत नाहीत. त्यामुळे वर्षातील चार प्रमुख वाऱ्यांमध्ये चार बैठका घ्याव्यात त्यातील दोन आळंदीत आणि दोन पंढरपूरमध्ये घ्याव्यात. जेणेकरून समस्यांचा निपटारा होईल. त्याचा अंतिम निर्णय चैत्र वारीत करावा.’’ उद्धव चोपदार म्हणाले, ‘‘तळावर जागा कमी पडते हे बरोबर आहे, मात्र, दिंडीकऱ्यांनी तळावर कमीत कमी वाहने आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यामुळे वाहतूक आणि तळावर यंत्रणेवरही ताण पडतो.’’

गोसावी, कोकाटे, भाऊसाहेब फुरसुंगीकर, भागवत चवरे, सोपान टेंबुकर, देविदास ढवळीकर, एकनाथ हांडे यांच्यासह प्रमुख दिंडीकरी-फडकरी उपस्थित होते. मालक आरफळकर यांनी आभार मानले.

आज पहिले उभे रिंगण

माउलींच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांचा लोणंदकरांनी पाहुणचार केला. हरिनामाच्या गजराने लोणंदनगरी दुमदुमून गेली. तळावर पहाटे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी महापूजा केली. लोणंदकरांनी माउलींना वाजतगाजत नैवेद्य आणले. दरम्यान, गुरुवारी दुपारी एक वाजता पालखी सोहळा लोणंदमधून मार्गस्थ होईल. त्यानंतर चांदोबाच्या लिंबाजवळ सोहळ्यातील पहिले उभे रिंगण होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com