Video : आश्‍चर्य..! सूर्याचीवाडीत चक्क पट्टेरी हंस; फ्लेमिंगोचे आगमन लांबले

अंकुश चव्हाण | Monday, 21 December 2020

तलावाच्या दक्षिण बाजूला सुमारे 22 हंसाचा थवा विसावला असून, हिरव्यागार गवतातील किटक, पाणवनस्पतीवर आपला उदरनिर्वाह करीत आहेत.

कलेढोण (जि. सातारा) : उथळ पाणथळ जागा, खाद्याच्या उपलब्धतेमुळे खटाव तालुक्‍यातील सूर्याचीवाडी तलावात पहिल्यांदाच "बार हेडेड गुज' म्हणजेच पट्टेरी हंसांचे आगमन झाल्याने पक्षी मित्र आनंदून गेले आहेत. सुमारे 22 पक्ष्यांच्या या थव्याने तलावाचे सौंदर्य वाढवले असून, बदलत्या हवामानामुळे फ्लेमिंगोचे आगमन लांबले आहे.
 
खटाव तालुक्‍यातील मायणी, येरळवाडी, कानकात्रे व सूर्याचीवाडी या तलावांमध्ये दर वर्षी देशी- विदेशी पक्षी हजेरी लावतात. त्यात फ्लेमिंगोही हजेरी लावतात. गुलाबी थंडीच्या आगमनाबरोबर तलावांत हजेरी लावणाऱ्या पक्ष्यांचे निरीक्षण करण्यासाठी सांगली, कऱ्हाड, कोल्हापूर, पुणे, सोलापूरचे पक्षीप्रेमी येतात. यंदा तलावात मुबलक पाणीसाठा झाल्याने तलावाच्या उथळ, पाणथळ जागेमध्ये अन्नाच्या शोधात असलेले अनेक पक्षी तलावावर दिसत आहेत. त्यात पट्टेरी हंस, चक्रवाक, काळा अवाक, नंदीमुख बदक, काळा शराटी, नदी सुरय, हळदीकुंकू बदक, कोतवाल, काळा शराटी, कोतवाल, खंड्या, स्टील्ट, ग्रे हेरॉन आदी पक्ष्यांचा समावेश आहे. मायणी व येरळवाडी तलावांतील मुबलक पाण्याच्या खोलीमुळे पाणवनस्पती, गवत, किटक यांच्या वाढीस मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे उथळ व कमी पाणवठ्याची सूर्याचीवाडी सध्या रंगीबेरंगी झाली आहे.

अजित पवारांचा डाव; साता-यातील कार्यकर्ते चक्रव्यूहात!
 
तलावामध्ये या वर्षी 17 फेब्रुवारी रोजी सुमारे 80 फ्लेमिंगोनी हजेरी लावली होती. मात्र, यावर्षी लहरी हवामान बदलामुळे फ्लेमिंगोचे आगमन लांबले आहे. यंदा प्रथमच बार हेडेड गुज म्हणजे पट्टेरी हंस आले आहेत. तलावाच्या दक्षिण बाजूला सुमारे 22 हंसाचा थवा विसावला असून, हिरव्यागार गवतातील किटक, पाणवनस्पतीवर आपला उदरनिर्वाह करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Advertising
Advertising