शिधापत्रिका परत करण्यास सुरवात; आजी-माजी सैनिकांकडून रेशनकार्ड जमा

उमेश बांबरे
Saturday, 24 October 2020

पुणे विभागीय आयुक्तांनी येत्या दोन महिन्यांत शिधापत्रिकांची पुन्हा तपासणी करण्याची सूचना पुरवठा विभागाला केली आहे. त्यानुसार केशरीसह इतर प्राधान्य कुटुंब लाभार्थी म्हणून काही शिधापत्रिकांवर शासकीय पेन्शनधारक, आजी-माजी सैनिक, चारचाकी वाहनधारक तसेच पाच एकरापेक्षा अधिक जमीन असलेल्यांची नावे आजही कायम आहेत. अशी नावे केशरी शिधापत्रिकेतून वगळण्यात येणार असून, संबंधितांना शुभ्र रेशनकार्ड दिले जाणार आहे.

सातारा : शिधापत्रिकांच्या तपासणीत आगामी काळात कारवाई टाळण्यासाठी पेन्शनधारक, शासकीय नोकर, मोठे शेतकरी व आजी-माजी सैनिकांनी आपापल्या शिधापत्रिका परत करण्यास सुरवात केली आहे. याला सातारा तालुक्‍यात सर्वाधिक प्रतिसाद मिळाला आहे. साताऱ्याच्या तहसीलदार व तालुका पुरवठा निरीक्षकांच्या प्रयत्नांमुळे शिधापत्रिका परत करण्यात सातारा तालुक्‍याने आघाडी घेतली असून, तब्बल 210 शिधापत्रिका परत करण्यात आल्या आहेत. 

पुणे विभागीय आयुक्तांनी येत्या दोन महिन्यांत शिधापत्रिकांची पुन्हा तपासणी करण्याची सूचना पुरवठा विभागाला केली आहे. त्यानुसार केशरीसह इतर प्राधान्य कुटुंब लाभार्थी म्हणून काही शिधापत्रिकांवर शासकीय पेन्शनधारक, आजी-माजी सैनिक, चारचाकी वाहनधारक तसेच पाच एकरापेक्षा अधिक जमीन असलेल्यांची नावे आजही कायम आहेत. अशी नावे केशरी शिधापत्रिकेतून वगळण्यात येणार असून, संबंधितांना शुभ्र रेशनकार्ड दिले जाणार आहे. जे लाभार्थी याकडे दुर्लक्ष करतील, त्यांच्याकडून घेतलेल्या धान्यांची दंडासह वसुली केली जाणार आहे. तसेच फौजदारी गुन्हाही दाखल केला जाणार आहे. 

शाहूपुरी पाणी योजनेचे काम त्वरित पूर्ण करा; शिवेंद्रसिंहराजेंच्या अधिकाऱ्यांना सक्त सूचना

यासंदर्भात "सकाळ'ने वृत्त प्रसिध्द केल्यानंतर सातारा तालुक्‍यातील तब्बल 210 जणांनी शिधापत्रिका परत केल्या आहेत. यामध्ये शासकीय पेन्शनधारक, आजी व माजी सैनिक, मुंबई, पुण्यासह इतर जिल्ह्यांत शासकीय कर्मचारी, ग्रामपंचायत कामगार, पाच एकरांपेक्षा अधिक जमीन असलेले शेतकरी, एमआयडीसीतील कर्मचारी आदींचा समावेश आहे. स्वत:हून या सर्वांनी शिधापत्रिका परत करण्यास सुरवात केली आहे. सातारा तालुक्‍याने यामध्ये आघाडी घेतली आहे. तब्बल 210 जणांनी शिधापत्रिका परत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी तहसीलदार आशा होळकर व पुरवठा निरीक्षक संतोष दळवी यांनी पुढाकार घेतल्यामुळे हे सर्व शक्‍य झाले आहे. 

भाजप कामगार आघाडीची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

...तर खऱ्या लाभार्थ्यांना मिळेल धान्य 

आता सातारा तालुक्‍याप्रमाणे इतर तालुक्‍यांतील अशा लाभार्थ्यांनी स्वत:हून भूमिका घेऊन शिधापत्रिका परत करण्यास सुरवात केल्यास शिधापत्रिका तपासणीची मोहीम शंभर टक्के यशस्वी होऊन खऱ्या लाभार्थ्यांना रेशनवरील धान्याचा लाभ मिळू शकणार आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Begin To Return The Ration Card Satara News