
बैलगाडा संघटनेने ही लढाई लढण्यासाठी जिद्दीने प्रयत्न केले. त्यामध्ये अनेकांचा सहभाग होता.
Satara : 'बैलगाडा शर्यत' माझ्यासाठी राजकीय विषय नाही, तर माझ्या अस्मितेचा प्रश्न; काय म्हणाले आमदार लांडगे?
सातारा : बैलगाडा शर्यत (Bullock Cart Race) हा विषय माझ्यासाठी राजकीय विषय नाही, तर माझ्या अस्मितेचा, जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. राज्यात बैलगाडा स्पर्धा ही एक परंपरा असून, ती टिकली पाहिजे, असे मत भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
दरम्यान, वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनचे संस्थापक प्रवीण पिसाळ यांचे नुकतेच निधन झाले. चोराडे (ता. खटाव) येथे त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करून परतल्यानंतर शासकीय विश्रामगृह ते (Mahesh Landge) पत्रकारांशी बोलत होते.
बैलगाडा शर्यतीबाबत सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल होती. त्या याचिकेबाबत बैलगाडा संघटनेच्या वतीने सतत पाठपुरावा सुरू होता. कोणतीही लढाई जिंकायची असेल, तर त्यास सातत्य आणि सगळ्या जमेच्या बाजू लागतात. तशी न्यायालयीन लढाई लढण्याची बाब खर्चिक आहे. बैलगाडा संघटनेने ही लढाई लढण्यासाठी जिद्दीने प्रयत्न केले. त्यामध्ये अनेकांचा सहभाग होता.
न्यायालयीन लढाई जिंकण्यासाठी तज्ज्ञ वकील आणि आर्थिक पाठबळ असावे लागते. हे पाठबळ देण्याचे काम अनेकांनी केले. त्या जोरावर पुढील लढाई यशस्वी झाली. एक समिती स्थापन करण्यात आली. त्या समितीच्या माध्यमातून बारकाईने अभ्यास करून एक अहवाल तयार करण्यात आला. त्या अहवालामुळे बैल पळू शकतो, हा दावा सरकारकडे करण्यात आला.
त्यानुसार सरकारने बंदी उठवल्याचे आमदार लांडगे म्हणाले. दरम्यान, मराठा बांधवांना संघटित करून आर्थिक आणि सामाजिक उन्नतीचे कार्य उभे करणारे दिवंगत मराठा प्रवीण पिसाळ यांच्या कुटुंबीयांना आमदार महेश लांडगे यांनी कर्तव्यनिधी म्हणून ५ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला आणि पिसाळ यांची मुलगी शुभ्रा हिच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याचा मनोदय व्यक्त केला.