महाबळेश्वर : साडे सात तासांच्या अथक प्रयत्नानंतर विहीरीतील गव्यास जीवदान
हा गवा विहिरीत बुडून मृत होण्याची शक्यता ओळखून महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांनी दोरखंडाच्या साह्याने या गव्याच्या शिंगाला दोरी बांधून तो पाण्यावर तरंगेल, अशी व्यवस्था केली आहे. या गव्याचे वजन लक्षात घेता वन विभागाने एक टन क्षमतेची हायड्रोलिक क्रेन मागविली हाेती.
महाबळेश्वर : महाबळेश्वर-पाचगणी मुख्य रस्त्यानजीकच्या लिंगमळा येथील ग्रीन वुड सोसायटीतील विहिरीत रविवारी दुपारी साडेतीन वाजता महाकाय रानगवा पडला. या रानगव्याचे वजन अंदाजे एक टनाहून अधिक असून महाबळेश्वर ट्रेकर्सचे (Mahableshwar Trekkers) जवान व वन विभागाची टीम या बचावकार्यात सक्रिय झाली हाेती. रात्री उशिरा या गव्याला विहीरीतून बाहेर काढण्यात यश आल्याने सर्वांना आनंद झाला.
सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचा
महाबळेश्वरपासून चार किलोमीटर अंतरावर पाचगणी मुख्य रस्त्यावर लिंगमळा परिसरात ग्रीन वुड सोसायटी असून या सोसायटीच्या मुख्य प्रवेशव्दाराच्या बाजूलाच 20 फूट रुंदीची विहीर आहे. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास वेण्णा नदीच्या पात्रात एक रानगवा पाणी पिण्यासाठी आला होता. मुख्य रस्ता ओलांडून तो पुन्हा जंगलात जात असताना ग्रीन वुड सोसायटीसमोरच अज्ञात वाहनाची त्याला धडक बसली. वाहनाच्या धडकेमुळे बिथरलेला गवा ग्रीन वुड सोसायटीमध्ये घुसला. मात्र, सोसायटीच्या संरक्षक भिंतीमुळे त्याला बाहेर पडणे मुश्कील झाले. वाट मिळेल या उद्देशाने गवा विहिरीच्या दिशेने गेला. दरम्यान, सोसायटीमध्ये गवा घुसल्याची खबर वन विभाग व पोलिसांना मिळाली. पोलिस व वन कर्मचारी तातडीने सोसायटीमध्ये दाखल झाले. त्यांनी गव्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याला बाहेर पडण्याचा रस्ता सापडला नाही. रस्ता सापडत नसल्यामुळे विहिरीच्या अवतीभवती तो फिरत राहिला. त्यातच हा गवा पाण्याने भरलेल्या या विहिरीत पडला.
महाबळेश्वर : वनसदृश्य मिळकतींची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध; आक्षेपासाठी कागदपत्र दाखल करा!
वन विभागाने याबाबतची माहिती महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांना दिली. ट्रेकर्स टीम तातडीने दाखल होत दुपारी चार वाजण्याच्या सुमारास बचावकार्यास सुरुवात झाली. विहिरीवर लोखंडी जाळी असल्याने त्याला विहिरीबाहेर काढण्यात अडचणी आल्या. कोल्हापूर येथून आपत्कालीन व्यवस्था पाहणारी तज्ज्ञांची टीम पाचारण करण्यात आले. ही टीम येण्यासाठी काही काळ वेळ लागणार असल्याने ट्रेकर्स टीमकडून विहिरीवरील लोखंड जाळी कापून विहिरीवरील भाग मोकळा करण्यात आला. सायंकाळनंतर अंधार असल्याने बचावकार्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. अखेर रात्री साडे अकराच्या सुमारास गव्याला वाचविण्यात यश आले. या बचावकार्यात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसह महाबळेश्वर ट्रेर्कसचे सुनील भाटिया, नगरसेवक कुमार शिंदे, अनिल केळगणे, नीलेश बावळेकर, प्रशांत आखाडे, संजय शिंदे, देवेंद्र चौरसिया, संदेश भिसे यांच्यासह अनिल भिलारे, अंकुश बावळेकर आदी सक्रिय हाेते. रानगव्याला पाहण्यासाठी विहीर परिसरात मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे पोलिस व वन विभागाने मुख्य प्रवेशद्वार बंद केले होते.
पर्यटकांनाे! महाबळेश्वर, पाचगणीला फिरायला निघालात? मग हे वाचाच
गव्याला काढण्यासाठी हायड्रोलिक क्रेनचा वापर
हा गवा विहिरीत बुडून मृत होण्याची शक्यता ओळखून महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांनी दोरखंडाच्या साह्याने या गव्याच्या शिंगाला दोरी बांधून तो पाण्यावर तरंगेल, अशी व्यवस्था केली आहे. या गव्याचे वजन लक्षात घेता वन विभागाने एक टन क्षमतेची हायड्रोलिक क्रेन मागविण्यात आली हाेती.
Edited By : Siddharth Latkar