
काम मुदतीत सुरू न करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका तसेच काम मुदतीत संपलेच पाहिजे.’
Udayanraje Bhosale : आम्ही कधीच राजकारण केलं नाही, 'त्यांना' काळ्या यादीत टाका; उदयनराजेंचा स्पष्ट इशारा
सातारा : ‘पालिकेने नियोजित केलेली विकासकामे पावसाळ्यापूर्वी संपली पाहिजेत. ही कामे सुरू आहेत की बंद आहेत, हे पाहण्यासाठी आम्ही फिरत आहोत. ही कामे मुदतीत पूर्ण न झाल्यास नागरिकांच्या त्रासात भर पडू शकते.
यामुळे कामे दिलेल्या मुदतीत पूर्ण झालीच पाहिजेत. ठेकेदार कोणीही असू, त्यांना राजाश्रय असू द्या. काम वेळेत सुरू करून मुदतीत पूर्ण न करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका,’ अशा सूचना खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी केल्या.
खासदार उदयनराजे यांनी आज शाहूपुरी, शाहूनगरसह हद्दवाढीनंतर पालिकेत आलेल्या विस्तारित भागातील विकासकामांची पाहणी केली. या वेळी त्यांच्यासोबत माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, ॲड. दत्ता बनकर, वसंत लेवे, संग्राम बर्गे, पालिका अधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते.
कामांची पाहणी केल्यानंतर उदयनराजे म्हणाले, ‘राजकारण आम्ही कधी केले नाही आणि करणारही नाही. नागरिकांच्या सुविधेसाठीची कामे प्राधान्याने पूर्ण होणे आवश्यक आहे. ठेकेदाराला त्यासाठी योग्य त्या सूचना करा. कोणताही ठेकेदार असू द्या. त्याला मी नाव घेऊन मोठे करणार नाही. तुमच्या अडचणी काहीही असू द्या. काम पूर्ण झालेच पाहिजे, अशी माझी भूमिका आहे. काम मुदतीत सुरू न करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका तसेच काम मुदतीत संपलेच पाहिजे.’
कामे न झाल्यामुळे त्रास झाल्यास नागरिकांना त्या ठेकेदाराच्या घरी पाठविणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. तुमच्याकडे एवढे पैसे आहेत, तुम्ही मोठे झालात, तुम्हाला एवढा मोठा राजाश्रय आहे, तर करा ना कामे पूर्ण, अशा शब्दांत खा. उदयनराजेंनी नाव न घेता ठेकेदार आणि त्यांची पाठराखण करणाऱ्यांवर टीकाही केली.