मंदिरं उद्यापासून खुली; गोंदवलेतील दर्शनासाठी नावनोंदणी आवश्यक; ऑनलाइन दर्शनाचीही मुभा

फिरोज तांबोळी | Sunday, 15 November 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेल्या समाधी मंदिराची दारे भाविकांना दर्शनासाठी उद्यापासून खुली होत आहेत. या पार्श्वभूमीवर समाधी मंदिर समितीच्या विश्वस्तांनी विशेष खबरदारीच्या उपाययोजना आखल्या आहेत.

गोंदवले (जि. सातारा) : श्री ब्रह्मचैतन्य महाराज समाधी मंदिर उद्यापासून नियोजित वेळेतच दर्शनासाठी खुले होत असून भाविकांच्या सोयीसाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परगावच्या भाविकांना दर्शनासाठी येताना पूर्वकल्पना देऊन नोंदणी करावी लागणार आहे, तसेच गर्दी टाळण्यासाठी  नियमांचे पालन करावे, असे आवाहन मंदिर समितीच्या विश्वस्तांनी केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेल्या समाधी मंदिराची दारे भाविकांना दर्शनासाठी उद्यापासून खुली होत आहेत. या पार्श्वभूमीवर समाधी मंदिर समितीच्या विश्वस्तांनी विशेष खबरदारीच्या उपाययोजना आखल्या आहेत. भाविकांना मंदिरातील सभामंडपातून सकाळी नऊ ते ११ व सायंकाळी पाच ते साडेसहा या वेळेत समाधी दर्शन घेता येईल. तसेच मंदिरातील पूजाअर्चा व उपासनेत भाविकांना सहभागी होता येणार नाही. मंदिर परिसरातही भाविकांना फिरता येणार नाही. परगावाहून येणाऱ्या भाविकांनी मंदिर समितीकडे ०२१६५-२५८२९२ , ९६२३१९७४८५, ८४२११७९५२२, ७७४५०००३२६ या क्रमांकावर संपर्क साधून नावनोंदणी करणे अनिर्वाह आहे. 

सातारा : पर्यटकांच्या गर्दीने टाेल नाक्यांवर 'दिवाळी' 

तसेच मंदिर परिसरात जपाची व राहण्याची सोय कोरोनाकाळात होणार नाही. निवासाची, प्रसादाची व वैद्यकीय सेवा देखील बंदच राहणार आहे. याशिवाय ३० नोव्हेंबरला होणारी पौर्णिमा यात्रा देखील रद्द करण्यात आली असून नेहमीप्रमाणे समाधी मंदिर समितीच्या वेबसाईटवरुन दररोज पहाटे पावणेपाच ते साडेसहा सकाळी दहा ते ११ व संध्याकाळी साडेसात ते सव्वाआठ या वेळेत ऑनलाइन समाधी दर्शन घेता येईल, अशी माहिती विश्वस्तांनी दिली. दरम्यान, उद्या दिवाळी पाडवा असल्याने मंदिर खुले होणाऱ्या पहिल्याच दिवशी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या असून भाविकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही मंदिर समितीने केले आहे.

गेल्या आठ महिन्यांपासून समाधी मंदिर बंद असल्याने परिसरातील दुकानदार मोठ्या संकटात अडकले आहेत. आता मंदिर सुरू होत असल्याने त्यांची पुन्हा दुकाने सुरू करण्याची लगबग सुरू झाली. परंतु याच परिसरात सध्या महामार्गाचे काम सुरू असल्याने अनेकांना दुकानांसाठी अडचणी निर्माण झाल्याचे चित्र आहे. संबंधितांनी हे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी होत आहे.

संपादन : बाळकृष्ण मधाळे