दौलतनगरातील कोरोना सेंटरसाठी गृहराज्यमंत्र्यांचा पुढाकार

दौलतनगरातील कोरोना सेंटरसाठी गृहराज्यमंत्र्यांचा पुढाकार

मोरगिरी (जि. सातारा) : सामाजिक बांधिलकीतून लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यातून कोविड केअर सेंटर उभे करून पाटण तालुक्‍यातील बाधितांवर उपचारासाठी पुढाकार घेतला आहे. केवळ पाच ते सहा दिवसांत हे कोरोना कोविड सेंटर उभे करण्याचे काम झाले. रविवारपासूनच हे सेंटर रुग्णांना उपचारासाठी खुले करण्यात आले आहे, असे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले. 

दौलतनगर (ता. पाटण) येथील कारखाना कार्यस्थळावर पाटण विधानसभा मतदारसंघातील बाधित रुग्णांच्या उपचारासाठी उभारण्यात आलेल्या केअर सेंटर व अद्ययावत रुग्णवाहिकेच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी युवा नेते यशराज देसाई, प्रातांधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार समीर यादव, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रघुनाथ पाटील, ग्रामीण रुग्णालय वैद्यकीस अधीक्षक डॉ. चंद्रकांत यादव, नोडल अधिकारी डॉ. शिकलगार उपस्थित होते.

श्री. देसाई म्हणाले, "बाधितांच्या मृत्यूच्या संख्येत झालेली वाढ चिंताजनक आहे. ऑक्‍सिजन बेड मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी होत आहेत. ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयात 35 ऑक्‍सिजन बेडचे केअर सेंटर सुरू केले. पाटणच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहात 25 ऑक्‍सिजन बेडचे सेंटर सुरू करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. कारखाना कार्यस्थळावर 50 ऑक्‍सिजन बेड आणि 25 नॉन ऑक्‍सिजन बेडचे केअर सेंटर सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. आता ढेबेवाडीचे 35 आणि कारखाना कार्यस्थळावरील 50 या प्रमाणे उपचारासाठी बेड उपलब्ध आहेत. आवश्‍यकता भासल्यास 25 नॉन ऑक्‍सिजन बेड आम्ही ऑक्‍सिजनसह तयार ठेवले आहेत. पाटणचे 25 ऑक्‍सिजन बेड हे येत्या चार ते पाच दिवसांत उपलब्ध होतील. या सेंटरसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेनेचे गट नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे सहकार्य लाभले आहे.'' 

या सेंटरमध्ये एक नोडल अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे 2 वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, खासगी सराव करणारे 16 डॉक्‍टर, 8 नर्स, 3 फार्मासिस्ट, 4 वॉर्ड बॉय, रुग्णवाहिकेसाठी चालक, डेटा ऑपरेटर एक अशा प्रकारे वैद्यकीय पथक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. वैद्यकीय पथकासाठी स्वतंत्र्यपणे राहण्याची व्यवस्था, कोरोना रुग्णांची ऑनलाइन नोंदणीसाठी यंत्रणा उपलब्ध आहे, अशी माहिती त्यांनी दिली. या सेंटरमध्ये दाखल झालेल्या रुग्णांना मंत्री देसाई यांच्याकडून नाश्‍ता, जेवण देण्यात येईल. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com