Satara News : पुर्वजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या गडकिल्ल्यांचा इतिहास जपायला हवा; समिर शेख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chhatrapati Shivaji Maharaj history of forts should preserved Sameer Shaikh satara

Satara News : पुर्वजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या गडकिल्ल्यांचा इतिहास जपायला हवा; समिर शेख

फलटण शहर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत आपण जन्म घेतला हे आपणास मिळालेले वरदान आहे. ज्यावेळी 'आपले किल्ले आपली जबाबदारी', उपक्रम आपण राबवित असतो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचाच विचार पुढे नेत असतो.

गडकिल्ले हे आपल्या पुर्वजांच्या पराक्रमाची साक्ष देतात त्यामुळे हा इतिहास सर्वांनी मिळून जपायला हवा असे प्रतिपादन सातारा जिल्हा पोलिस अधिक्षक समिर शेख यांनी केले. ताथवडा फलटण येथील किल्ले संतोषगड येथे 'आपले किल्ले आपली जबाबदारी' या उपक्रमांतर्गत गडाची स्वच्छता करण्यात आली.

यानंतर ताथवडा येथील श्री गाडगे महाराज प्राथमिक, माध्यमिक आश्रमशाळा व मागासवर्गीय विद्यार्थी वसतीगृह येथे मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी पोलिस उपअधिक्षक तानाजी बरडे, प्रभारी पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, मारुती महाराज शिंदे, सरपंच दशरथ शिंदे यांच्यासह लोणंद, शिरवळ पोलिस ठाण्याचे अधिकारी यांची उपस्थिती होती.

जेव्हा आपण घरातुन बाहेर पडतो तेव्हा या शिवकालीन संतोषगडाची सावली आपल्या डोक्यावर पडते, परंतू ती सावली नसुन इतिहासाचा आशिर्वाद आहे आणि तो ताथवडा येथील ग्रामस्थांना लाभला आहे हे मोठे भाग्य आहे असे सांगुन शेख म्हणाले,

आपण आपल्या मुलांना परीवाराला गडकिल्यांवर न्यायला हवे कारण पुढच्या पिढीला हा इतिहास माहिती झाला तरच ती तो जोपासेल व गडकिल्ल्यांचे संवर्धन करेल अन्यथा हे किल्ले व आपल्या पुर्वजांच्या पराक्रमाचा इतिहास काळाच्या पडद्याआड जाईल त्यामुळे आम्ही जो उपक्रम सुरु केला आहे तो सर्वांनी मिळून निरंतरपणे सुरु ठेवावा अशी अपेक्षा समिर शेख यांनी यावेळी व्यक्त केली.

संतोषगड पर्यटणाचे केंद्र बनावे !

संतोषगडाची शीवकालीन भूमिका महत्वाची होती. या गडाची भव्यता जोपासण्यासाठी सर्वांनी एकत्रित येवून किल्ल्यासाठी चांगले काम हाथी घ्यावे. पुरातत्व विभागाच्या सहकार्याने या किल्ल्याला भक्कम बनवावे.

गडावर जाणारी पायवाट नीट बनवावी. पर्यटकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करुन द्याव्यात त्यामुळे संतोषगडाला पुर्ववैभव प्राप्त होवून तो पर्यटणाचा केंद्रबिंदू बनेल यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे असे आवाहन पोलिस अधिक्षक समिर शेख यांनी केले.

दरम्यान या उपक्रमात सुमारे आठशेपेक्षा जास्त लोकांनी सहभाग नोंदविला. २० जणांचा एक असे समूह करुन स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यावेळी सहाशे किलो कचरा गडावरुन गोळा करण्यात आला. यावेळी मोहन जाधव यांनी संतोषगडाची प्रत्यक्ष परीपुर्ण माहिती समिर शेख यांना दिली. या उपक्रमात पोलिस दलातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासह ताथवडा व परीसरातील शिवप्रेमी व दुर्ग प्रेमी मोठ्या संखेने सहभागी झाले होते.