मुख्यमंत्र्यांचा दौरा अन् चक्का जाम आंदोलन; प्रशासनासह पोलिसांवर वाढला ताण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raju Shetty and Eknath Shinde

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध खात्याचे मंत्री हे उद्या (शुक्रवारी) कऱ्हाड दौऱ्यावर आहेत.

Karad Agitation : मुख्यमंत्र्यांचा दौरा अन् चक्का जाम आंदोलन; प्रशासनासह पोलिसांवर वाढला ताण

कऱ्हाड - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध खात्याचे मंत्री हे उद्या (शुक्रवारी) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यातच ऊसाला साडेतीन हजार भाव मिळावा, यासह अन्य मागण्यांसाठी उद्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्यभर चक्का जाम आंदोलनाची हाक दिली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनावर मुख्यंत्र्यांचा दौरा आणि या आंदोलनाचा मोठा ताण आहे. दौरा यशस्वी करुन आंदोलन हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अॅक्शन प्लॅन तयार करुन कंबर कसली आहे. आज मध्यरात्रीपासुनच जिल्ह्यातील सुरक्षा टाईट ठेवली जाणार आहे.

मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर जिल्ह्याचे सुपुत्र एकनाथ शिंदे पहिल्यांदाच कऱ्हाड दौऱ्यावर येत आहेत. त्यासाठी शासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. येथील विमानतळवर आगमन झाल्यानंतर मुख्यंत्री पहिल्यांदा ज्‍येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमीत्त प्रीतिसंगमवारील समाधिस्थळी अभिवादन करतील. . त्यांच्यासमवेत उत्पादन शुल्कमंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, फलोत्पादन व रोजगार हमीमंत्री संदीपान भुमरे, सहकारमंत्री अतुल सावे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्यासह खासदार, आमदार व मान्यवर असतील. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनासह अन्य विविध विकास कामांचे उदघाटन, भुमिपुजन होतील. त्यासाठी दोन दिवसांपासून जिल्हा प्रशासन आणि पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे.

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मागील हंगामात तुटलेल्या ऊसाला एफआरपी व्यतिरिक्त २०० रुपये द्यावेत, यंदाच्या उसाला एकरकमी एफआरपी मिळावी, यासह अन्य मागण्यांसाठी दोन दिवस लाक्षणिक ऊसतोड बंद आंदोलन केले होते. त्यानंतरही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. विविध पातळीवरची आंदोलने करूनही सरकारला जाग येत नसल्याचा आरोप करुन राजू शेट्टी यांनी उद्या (शुक्रवारी) राज्यभर चक्का जाम आंदोलन करून शेतकऱ्यांची ताकद दाखवणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे हे आंदोलन उद्या होणार आहे. या आंदोलनाचाही ताण पोलिस व जिल्हा प्रशासनावर आहे. त्यामुळे मुख्यमंत्री दौरा आणि आंदोलन हे दोन्ही हातळण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी त्यासाठी अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. त्यादृष्टीने त्यांची कार्यवाही सुरु आहे.

बाहेरील जिल्ह्यातूनही कुमक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य मंत्री यांचा जिल्ह्यातील दौरा आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन या पार्श्वभुमीवर बंदोबस्तासाठी मोठी यंत्रणा जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तैनात केली आहे. आंदोलनाच्या महत्वाच्या ठिकाणी आज रात्रीपासूनच बंदोबस्त ठेवला जाईल. जिल्ह्यातील पोलिसांच्या बंदोबस्ताच्या मदतीला बाहेरील जिल्ह्यातीलही फौजफाटा मागवला आहे.