झिरपवाडी रुग्णालयाची घोषणा ढगात; रामराजेंच्या निर्णयाची अंमलबजावणी शून्य

झिरपवाडी रुग्णालयाची घोषणा ढगात; रामराजेंच्या निर्णयाची अंमलबजावणी शून्य

कोळकी (जि. सातारा) : झिरपवाडी (ता. फलटण) येथे अनेक वर्षे धूळ खात पडून असलेल्या ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीमध्ये जनता, सार्वजनिक संस्था भागीदारी तत्त्वावर (पब्लिक प्रायव्हेट पार्टिसिपेशन) कोविड, तसेच इतर संसर्गजन्य आजारांसाठी रुग्णालय सुरू करण्याबाबत महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनात दोन महिन्यांपूर्वी झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आजअखेर इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरू झालेले दिसत नाही. शासनाने तालुक्‍यातील जनतेच्या आरोग्याशी चालवलेला खेळ त्वरित थांबवावा व रुग्णालय त्वरित सुरू करावे, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. 

विधान भवनात झालेल्या बैठकीस रामराजेंसह आरोग्यमंत्री राजेश टोपे, आमदार दीपक चव्हाण, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव, राष्ट्रीय आरोग्य अभियान आयुक्त एन. रामास्वामी, आरोग्यसेवा संचलनालय संचालिका डॉ. तायडे, फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, साताऱ्याचे जिल्हा शल्य चिकित्सक उपस्थित होते. फलटण तालुक्‍यातील रुग्णांची संख्या मध्यंतरी वाढत होती. फलटण येथील शेती शाळा, जुने लेडीज होस्टेल, जुने मिनार हॉटेल ही ठिकाणे शासनाने अधिग्रहीत केली होती, तरीही बेड अपुरे पडू लागल्याने फलटणमधील काही खासगी दवाखाने शासनाने ताब्यात घेतले होते. एक नामांकित हॉस्पिटल अधिग्रहीत करण्यावरून वादही निर्माण झालेला होता. अखेर ते हॉस्पिटल शासनाने सील केले होते. दुसऱ्या बाजूला शासनाचे स्वतःचे झिरपवाडीच्या गिरवी रस्त्यावर असलेले ग्रामीण रुग्णालय केवळ वापराविना पडून होते. मात्र, शासन खासगी दवाखान्यांमागे लागत असल्याने त्या वेळी तालुक्‍यातील नागरिक आश्‍चर्य व्यक्त करत होते. 

सर्व सोयींनी सुसज्ज असलेले हे ग्रामीण रुग्णालय बरेच वर्ष वापरात नसल्यामुळे इमारतीची दारे, खिडक्‍या तुटल्या आहेत. शासन कोविडसाठी प्रचंड खर्च करत आहे. जर या ग्रामीण रुग्णालयात किरकोळ दुरुस्ती आणि स्वच्छता, रंगरंगोटी केली तर कोरोना रुग्णांना उपचारासाठी सातारा आणि पुण्याला जाण्याची आवश्‍यकता न उरता या ठिकाणी उपचार होऊ शकतील व तालुक्‍याचा कायमचा प्रश्न निकाली निघेल. या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने दोन महिन्यांपूर्वी केलेल्या घोषणेचा गांभीर्याने विचार करून झिरपवाडीचे हे ग्रामीण रुग्णालय त्वरित सुरू करावे, अशी मागणी तालुक्‍यातील जनतेमधून केली जात आहे. 

फलटण तालुक्‍यामध्ये दिवसेंदिवस रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता खासगी दवाखाने पुरणार नाहीत. हे ग्रामीण रुग्णालय सुरू झाले, तर आरोग्य प्रशासनाला निश्‍चित सहकार्य लाभेल.'' 
- डॉ. सुभाष गुळवे 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com