Satara समस्या सोडविण्यासाठी नागरिकांची मुख्यमंत्र्यांकडं मोठी गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satara

आज तिसऱ्या दिवशी नागरिकांनी आपल्या समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे गर्दी केली

Satara : समस्या सोडविण्यासाठी नागरिकांची मुख्यमंत्र्यांकडं मोठी गर्दी

कास : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गेल्या दोन दिवसांपासून आपल्या मूळ गावी दरे त तांब या ठिकाणी आले असून आज तिसऱ्या दिवशी नागरिकांनी आपल्या समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे गर्दी केली होती. सकाळ पासूनच दरे गावाकडे जाण्यासाठी लोकांची गर्दी सुरू झाली.

बामणोली मधून बोटीतून तसेच काही लोक तराफ्यामधे गाड्या टाकून दरे गावात पोहचले. सकाळ पासून मुख्यमंत्री ही येणाऱ्या सर्व लोकांच्या अडचणी समजून घेत होते. सर्वसामान्य लोकांबरोबरच राजकीय क्षेत्रातील लोकांनीही मुख्यमंत्र्यांकडे आपले प्रश्र्न मांडले. या वेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख उपस्थित होते.

दोन दिवसांपूर्वी आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्या दिवशी पर्यटन विकास संदर्भात जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून सूचना दिल्या. त्यानंतर त्यांचे श्रद्धास्थान असलेल्या उंच डोंगरातील उतेश्वराचे दर्शन घेतले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी भेटायला येणाऱ्या लोकांची गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाला आदेश देऊन कोणालाही नदीच्या पलिकडे सोडू न देण्याचे आदेश देऊन एक दिवस नेहमीच्या गजबजाटातून एकांतात घालवला.

त्यादिवशी मुख्यमंत्री निवांतपणे आपल्या शेतात रमताना दिसले. गोशाळेतील जनावरांना चारा देणे, स्ट्राॅबेरी लागवड, मत्स्य शेतीतील माशांना खाऊ देण्याबरोबरच हळदीच्या शेतात कोळपणी ही त्यानी केली. आज तिसऱ्या दिवशी मुंबई ला जायचे असल्याने लोकांना वेळ दिला होता. त्यामुळे लोकांनी तोबा गर्दी केली होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ओढा कायम आपल्या गावाकडे राहिला आहे. मंत्री असताना ही ते शेतात राबताना दिसले आहेत. पन आज राज्याचा पूर्ण कारभार हातात असताना मुख्यमंत्री गावाकडे येवून एवढा वेळ देतील का अशी शंका असताना त्यांनी आपल्या पदाचा कोणताही बडेजाव न करता नेहमी प्रमाणे शेतात राबून आपन सर्वसामान्यांसाठी च आहोत हे कृतीतून दाखवून दिले आहे. दुपारी मुख्यमंत्री सर्व काम आटोपून हेलिकॉप्टरने मुंबई ला खाना झाले.

पर्यटन विकासासाठी मुख्यमंत्री कायम आग्रही दिसत आहेत. सातारा जिल्ह्यातील सुपुत्र असल्याने त्यांनी निधीची कमतरता भासू देणार नाही असे सांगितले आहे. जिल्हा प्रशासनाने आवश्यक ते प्रस्ताव सादर करून जावली, महाबळेश्वर या दुर्गम तालुक्यासह जिल्ह्याच्या विकासाला गती द्यावी अशी अपेक्षा नागरिकांकडून होत आहे.